आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial On Pakistan Ex President Parvez Musharraf

मुशर्रफ कोंडीत (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अटक होण्याच्या भीतीपोटी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख व अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना इस्लामाबाद येथील उच्च न्यायालयातून पलायन (?) करावे लागले, हा त्यांच्या राजकीय कोंडीचा आणखी एक पुरावा म्हणायला हवा. मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येचा आरोप आहे, तसेच त्यांच्यावर पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसह 60 इतर वरिष्ठ न्यायाधीशांना अवैधपणे सेवेतून बरखास्त करण्याचाही आरोप आहे. हे सर्व आरोप ग्राह्य धरून पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मुशर्रफ यांच्यावर निवडणूक लढवण्यासही बंदी घालून त्यांचे राजकीय भविष्य अंधकारमय केले आहे. मुशर्रफ चार वर्षे लंडनमध्ये विजनवासात होते. तेथून ते मीडियाला मुलाखती देत आपल्यावरचे सर्व आरोप खोटे आणि राजकीय सूडापोटी करण्यात आल्याचा दावा करत. मुशर्रफ यांच्या स्पष्टीकरणात तथ्य आहे, असे पाकिस्तानमधील जनतेला आणि कोणत्याही राजकीय पक्षाला वाटत नाही. मुशर्रफ यांनी आपल्या नऊ वर्षांच्या राजवटीत पाकिस्तानातील सर्व लोकशाही संस्था आणि प्रशासन यांचा विश्वास गमावलेला आहे. पाकिस्तानमधील लष्करी गटही त्यांच्या बाजूने असल्याचे चित्र नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानात पुढील महिन्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत त्यांची राजकीय कोंडी करण्याचे, त्यांच्या विरोधात खटले सुरू झाले आहेत. मुशर्रफ यांचे गेल्या 24 मार्चला पाकिस्तानातील आगमन नाट्यमय नसले तरी अपेक्षित होते. लंडनमध्ये चार वर्षे विजनवासात काढल्यानंतर त्यांचे राजकीय महत्त्व पाकिस्तानच्या राजकारणात फारसे उरले नव्हते. त्यांनी ‘आॅल पाकिस्तान मुस्लिम लीग’ या नावाचा पक्ष स्थापन केला असला तरी त्यांना मानणारा असा ‘मासबेस’ पाकिस्तानात नाही. पण मुशर्रफ हे राजकीय महत्त्वाकांक्षेने जसे पछाडलेले आहेत तसे ते ‘अमेरिकेचे हस्तक’ म्हणून कार्यरत आहेत, असे मानले जाते. 1999 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुशर्रफ श्रीलंकेच्या दौ-यावरून परत येत असताना त्यांना लष्करप्रमुखाच्या पदावरून पदच्युत केले. पण त्या वेळी मुशर्रफ यांनी विमानातूनच खेळी करून मोठ्या धूर्तपणे सत्तेची सूत्रे हाती घ्यायला सुरुवात केली. नवाज शरीफ यांना फासावरच चढवायचा त्यांचा बेत होता. पण नवाज शरीफ यांना सौदी अरेबियाने आश्रय दिला. त्यानंतर मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 अशी नऊ वर्षे पाकिस्तानची सत्ता उपभोगली. 2007 मध्ये सौदी अरेबियाच्याच दबावामुळे नवाज शरीफ पाकिस्तानात परत आले होते. त्या वेळी पाकिस्तानच्या राजकारणात बेनझीर भुत्तो यांनी मुशर्रफ यांच्या विरोधात आक्रमकरीत्या राजकीय आघाडी उघडली होती. मुशर्रफ यांना शह मिळावा म्हणून बेनझीर भुत्तो यांच्या आघाडीत नवाज शरीफ सामील झाले होते. या दोघांनी पाकिस्तानात ठिकठिकाणी दौरे करून मुशर्रफ यांच्या विरोधात जनमत तापवले होते.

मुशर्रफ यांनी याच काळात पाकिस्तानच्या न्याययंत्रणेच्या विरोधात दंड थोपटले होते. त्यांनी पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांसह इतर 60 वरिष्ठ न्यायाधीशांच्या पोलिस चौकशीचा आदेश दिला होता व त्यांना पदावरून बरखास्त केले होते. मुशर्रफ यांचा हा आदेश वास्तविक त्यांची मोठी राजकीय घोडचूक ठरली. कारण या आदेशामुळे मुशर्रफ यांच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष, प्रशासन आणि जनमत एकत्र आले. त्याचा परिणाम म्हणून मुशर्रफ यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. मुशर्रफ यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला हा मोठा धक्का होता, तसा तो अमेरिकेलाही होता. कारण मुशर्रफ यांच्या हातातून सर्व राजकीय सूत्रे जाऊन पाकिस्तानमध्ये पुन्हा लोकशाही सरकार येण्याची शक्यता बळावली होती आणि तालिबान बंडखोरांना ताब्यात ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांचे पाय धरावे लागणार होते (सध्याचे लष्करप्रमुख कयानी आणि अमेरिका यांच्यातील संबंध फारसे सौहार्दाचे नाहीत). याच कालावधीत निवडणूक प्रचारावेळी बेनझीर भुत्तो यांची दुर्दैवी हत्या झाली. या हत्येने पाकिस्तानचे राजकारण अराजकाकडे लोटले गेले आणि तेथे लष्करशाहीचे ढग पुन्हा दाटून आले. बेनझीर भुत्तो यांच्या हत्येच्या कटात मुशर्रफ यांचा हात असल्याचे त्या वेळी आरोप झाले होते. बेनझीर भुत्तो यांच्या हत्येमुळे पाकिस्तानमधील जनमत बेनझीर यांचे पती आसिफ अली झरदारी यांच्या बाजूने वळले व ते देशाचे अध्यक्ष झाले. बेनझीर यांच्या हत्येचा आरोप, न्याययंत्रणेविरोधात उचललेली पावले यामुळे मुशर्रफ यांना लंडनमध्ये राजकीय आश्रय घ्यावा लागला होता. लंडनमध्ये विजनवासात असताना मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये परतण्याबाबत लॉबिंग सुरू केले होते. त्यांच्यावर अमेरिकेचा वरदहस्त होताच. त्यामुळे मुशर्रफ यांचे पाकिस्तानात येण्याचे प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे दिसताच तालिबानने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानातील विविध मानवाधिकार व लोकशाहीवादी सामाजिक संस्थांनीही मुशर्रफ यांच्या विरोधात नव्याने न्यायालयात खटले दाखल केले होते. आता एका प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने मुशर्रफ यांच्यापुढे शरणागतीशिवाय कोणताही अन्य मार्ग नाही किंवा पाकिस्तान सरकार त्यांना निवडणुका होईपर्यंत स्थानबद्ध करेल किंवा मुशर्रफ यांना अमेरिका किंवा लष्कराच्या मदतीने पुन्हा पाकिस्तानबाहेर जावे लागेल. मुशर्रफ यांना अटक झाल्यास पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी लष्करशहाला अटक केल्याची नोंद होईल. ही घटना पाकिस्तानच्या लोकशाही प्रक्रियेला जेवढे बळ देणारी आहे तितकीच ती पाकिस्तानचे लष्कर आणि लोकशाही यंत्रणा यांच्यातील संघर्ष चिघळवणारीही घटना आहे. हिंदुस्थानच्या फाळणीबरोबर स्वातंत्र्य मिळालेल्या पाकिस्तानात प्रथमच पाच वर्षे लोकशाही सरकार टिकून पुढील महिन्यात रीतसर निवडणुका होत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या सर्व राजकीय व प्रशासकीय तसेच न्यायालयीन व लष्करी संस्था अस्थिर झाल्या आहेत. अस्वस्थ, अस्थिर व अराजकी स्थितीत आपण नेपोलियनच्या अवतारात येऊन सत्तेची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेऊ, असे मांडे मुशर्रफ मनात खात होते. आता नजरकैदेत बसल्या बसल्या तो भ्रम ते कुरवाळू शकतील!