आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial On Prime Minister Manmohan Singh Press Conference

वाचाळांना कानपिचक्या (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा शुक्रवारी पत्रकारांबरोबरचा संवाद जरी हसत-खेळत झाला, तरी एक गोष्ट कुणाच्याच नजरेतून सुटली नसावी. त्यांची ही पत्रकार परिषद म्हणजे मीडियासमोर केलेले निर्वाणीचे निवेदन होते. बहुतेक पत्रकारांचा त्यांच्या निवेदनाने अपेक्षाभंग झाला; कारण निर्वाणीचे निवेदन करतानाही डॉ. सिंग यांची मन:स्थिती स्थितप्रज्ञवत होती आणि तरीही त्यांची प्रसन्नता जराही ढळली नाही. पत्रकारांना (विशेषत: टीव्हीवाल्यांना) सतत काही तरी सनसनाटी, नाट्यमय, प्रक्षोभक हवे असते. एखादे साधे विधानही वादग्रस्त करून दाखवायची किमया पत्रकारांना साध्य झाली आहे; परंतु ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशासाठी ते घातक ठरेल’, या विधानापलीकडे कोणतेही वादग्रस्त उद्गार त्यांनी काढले नाहीत. त्यामुळे नाराज झालेल्या टीव्हीवाल्यांनी लगेचच पंतप्रधानांची पत्रकार परिषद ‘कुचकामी’, ‘प्रभावहीन’ आणि ‘गद्य’ झाल्याचा निर्वाळा देऊन टाकला.
डॉ. सिंग यांना विचारलेले काही प्रश्न अश्लाघ्य आणि असभ्यही होते. उदाहरणार्थ, ‘तुम्ही राजकारणात गती नसलेले पंतप्रधान आणि निष्कारण अवास्तव महत्त्व दिले गेलेले अर्थतज्ज्ञ आहात, असे म्हटले जाते; त्यावर काय प्रतिक्रिया आहे?’ असे विचारल्यावर त्यांना कसे कोंडीत पकडले, असा त्या पत्रकाराचा व एकूणच त्या पत्रकार परिषदेचा पवित्रा होता; परंतु डॉ. मनमोहन सिंग यांचा तोल ढळला नाही आणि त्यांनी सभ्यताही सोडली नाही. गेली चार वर्षे मीडियाने (मुख्यत: टीव्ही न्यूज मीडियाने) पंतप्रधानांची इतकी खिल्ली उडवली आहे, इतके अश्लील व हिंस्र हल्ले सोशल मीडियामार्फत चढवले आहेत आणि इतकी अवास्तव (वा खोटी) आकडेवारी दाखवून डॉ. सिंग यांनी देश कसा खड्ड्यात घातला आहे, असे गोबेल्स शैलीत सांगितले आहे की त्यांच्या जागी दुसरी कोणतीही व्यक्ती हतप्रभ झाली असती. परंतु, डॉ. मनमोहन सिंग यांनी मी काय केले, याचा लेखाजोखा इतिहास मांडील; मीडिया किंवा स्वयंभू भाष्यकार नव्हे, हे स्पष्ट शब्दांत सांगितले. आपल्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत म्हणजे 2004 ते आज लोकांचे व्यक्तिगत व कौटुंबिक उत्पन्न किती वाढले, जीवनशैली व राहणीमान चलनवाढीपेक्षाही अधिक सुस्थित कसे झाले, हे त्यांनी स्पष्ट व थेट सांगितले. वस्तुत: तेथे आलेल्या सर्व पत्रकारांच्या व परिषद टीव्हीवर पाहणा-या-ऐकणा-या सर्वांकडे आता मोबाइल फोन (दर सहा महिन्यांनी येणा-या नव्या मॉडेल्ससहित), मोटारी वा मोटरबाइक्स, नवे फ्लॅट (आणि इंटिरिअर!) आले आहेत.
पण सध्या या मध्यम व नवमध्यमवर्गाने मोदींची कास धरल्यापासून देशाचे वाटोळे झाले आहे, असे ठरवून टाकले आहे. ही आत्मफसवणूक व्यापक प्रमाणावर करायला लावण्यात मोदींना यश आले आहे, हे खरे असले तरी डॉ. सिंग यांच्या निवेदनावर शांतपणे विचार करणा-यांना त्यांचे निवेदन पटू शकेल. 2004मध्ये सत्तेत आल्यापासून डॉ. मनमोहन सिंग यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सोयींचा विस्तार, मनरेगा, कर्जपुरवठा, कृषीमालाला रास्त दर, आरोग्य, शिक्षण यावर लक्ष केंद्रित केल्याने देशाचा आर्थिक विकास वेगाने होऊ लागला. याच ग्रामीण विकासामुळे भारत अन्नधान्य, साखर, फळे, भाज्या, दूध व पोल्ट्री उत्पादनांची जगाला निर्यात करू लागला. आर्थिक विकास हा सर्वसमावेशक असावा वा त्याचे लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत, ही आर्थिक मांडणी डॉ. मनमोहन सिंग अनेक वर्षे करत आले आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली. आज जीवनशैलीचा विचार करता ग्रामीण व शहरी भारत यांच्यातील अंतर फार कमी राहिलेले आहे. ज्या वस्तू शहरात मिळतात, त्या ग्रामीण भागात मिळण्याची शक्यताही वाढली आहे. त्यातच गेल्या दहा वर्षांत संपर्क क्रांतीमुळे भारतातील सर्व शहरे ग्रामीण भागाला जोडली गेली आहेत. ग्रामीण भारताचा हा बदलता आर्थिक चेहरा ही डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणाची मोठी कमाई आहे. यूपीए-1 सरकारच्या कारकीर्दीच्या अखेरीस शेतक-यांना कर्जमाफी देताना त्यांनी छोट्या शेतक-यांना त्याचा लाभ कसा होईल, याकडे लक्ष दिले. त्यामुळे यूपीए-2 सरकार सत्तेवर आले. विकास हा केवळ मोटारगाड्या, मोबाइल किंवा फ्लॅट घेण्याइतपत मर्यादित नसतो, तर अर्थव्यवस्थेत विविध आर्थिक संधी उपलब्ध व्हाव्या लागतात. डॉ. मनमोहन सिंग यांच्या साडेनऊ वर्षांच्या कारकीर्दीत गरिबी झपाट्याने खाली येऊन ती 13 टक्क्यांपर्यंत आली.
एवढ्या झपाट्याने गरिबीची टक्केवारी खाली झाल्याचे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना खासगीत व सार्वजनिक पातळीवर उदारपणेही कोणी देत नाही. केवळ टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्यांची ढाल पुढे करत डॉ. सिंग यांच्या कार्याचे मूल्यमापन केले जात आहे. हेच विरोधक 2004-09 या वर्षांतल्या भारताच्या आर्थिक विकासाबद्दल जाणूनबुजून मौन बाळगतात. 2008-10मध्ये जग आर्थिक मंदीतून जात असताना भारतामध्ये मात्र उद्योगधंद्यांना किंवा सामान्यांना त्याची झळ बसली नाही. याची कारणे काय असावीत, याबाबतही इलेक्ट्रॉनिक माध्यमे खल करताना दिसत नाहीत. राजकारणात विरोधकांच्या आरोपांना त्यांनी दिलेले महत्त्व, भ्रष्टाचारविरोधात त्यांनी प्रत्यक्ष केलेली कारवाई व आपल्या कारभारात नेहमीच दाखवलेला पारदर्शकपणा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशाचे अखिलेश यादव, प. बंगालच्या ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान, तामिळनाडूच्या जयललिता आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी त्यांच्या कार्यकाळात कधी दाखवला का? याचीही शहानिशा ही माध्यमे करत नाहीत. खरे तर सभ्यता, सुसंस्कृतपणा, नेमस्तपणा व संसदीय लोकशाही मूल्यांची पाठराखण या सद्गुणांची सदोदित अपेक्षा डॉ. सिंग यांच्याकडून ठेवणा-यांनी स्वत: मात्र टग्यांसारखे राजकारण केले. या दुटप्पीपणाबद्दल मीडियाने मोदींना, येदियुरप्पांना, ममता बॅनर्जी यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न तसूभरही केले नाहीत. मोदींनी गुजरातचा केलेला आर्थिक विकास कंठाळी स्वरात सांगणा-या मीडियाने गेल्या दहा वर्षांतला बदलता भारत लोकांपर्यंत जाणूनबुजून पोहोचवला नाही. मीडियाचा हा सगळा फॅसिस्ट शक्तींना बळ देणारा प्रचार दुर्दैवाने आयुष्यभर लोकशाही मूल्यांची पाठराखण करणा-या व्यक्तीच्या विरोधात झाला. 2004मध्ये सत्तेवर आल्यानंतर डॉ. सिंग यांनी देशाला एक सामर्थ्यवान महासत्ता होण्याचे वचन दिले होते. या वचनाला प्रामाणिक राहत त्यांनी एक अब्ज लोकसंख्येमध्ये आपण एक महासत्ता बनू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या साडेनऊ वर्षांच्या कारकीर्दीचे हे यश आहे. हे यश त्यांनी सांगताना कोणता मानभावीपणा केला नाही. उलट सध्याच्या आक्रस्ताळी आणि उद्धटपणे वागणा-या वाचाळ मीडियाला त्यांनी अत्यंत शांतपणे व सभ्यतेने कानपिचक्या दिल्या.