आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी भरला ‘बॅकलॉग’ (संपादकीय)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाभोवती सध्या देश फिरतो आहे, त्यामुळे ते कायम्हणतात याकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले असणे साहजिक आहे. देश-विदेशात त्यांचे भाषण झाले नाही आणि ते दूरचित्रवाणीवर दिसले नाही, असे होत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी टीव्हीच्या पडद्यावर सतत असतात. तरीही काही कळीच्या विषयांवर त्यांचे मत काय आहे, हे कळत नाही. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हेही पत्रकारांशी किंवा वाहिन्यांशी बोलण्यास तयार नव्हते आणि मोदी यांनी तोच मार्ग निवडला आहे. मात्र, सोमवारी मध्येच एका खासगी दूरचित्रवाहिनीला मुलाखत देऊन मोदींनी तो बॅकलॉग भरून काढला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर भाजपचे बहुचर्चित नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एकच हल्ला चढवला होता. अर्थमंत्री अरुण जेटली आणि अर्थ मंत्रालयातील महत्त्वाचे अधिकारी यांनाही आपले लक्ष्य केले होते. या घडामोडी ताज्या असताना त्याविषयी मोदींना काय म्हणायचे आहे, याविषयी प्रचंड कुतूहल होते. स्वामींच्या तोंडातून मोदीच बोलत आहेत, अशी चर्चा सुरू होती. मोदींनी स्वामींचे नाव घेता व्यवस्थेपेक्षा मोठे कोणीच नसते, हे तर स्पष्ट केलेच; पण गव्हर्नर रघुराम राजन यांना देशाविषयी आस्था आहे, ते देशावर प्रेम करतात. त्यांच्या देशभक्तीविषयी शंका घेण्याचे कारण नाही, अशी राजन यांची पाठराखण केली आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. अर्थात, स्वामी यांनी आरोप करताच मोदी यांनी त्यांना थांबवले नाही की स्वामी हे हाताबाहेर गेले, हे अजून स्पष्ट झालेले नाही. स्वामी यांनी केलेल्या आरोपांनंतरच राजन यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. सरकार आणि राजन यांचे संबंध चांगले नसल्याचे अनेकदा समोर आले असून त्यांची पाठराखण करण्यास मोदी यांनी उशीर केला, असेच आता म्हणावे लागेल. स्वामी यांनी जेटली यांच्यावर नाव घेता टीका करण्यास सुरुवात केली आहे, याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरकारमध्ये फट वाढत चालल्याचे मानले जाते आहे. मोदींच्या या मुलाखतीत तसे काही जाणवले नसले तरी व्यवस्था ही सर्वश्रेष्ठ आहे, हे त्यांचे मत यासंदर्भात बोलके आहे.

अर्थात, हा एक भाग सोडला तर पंतप्रधानांनी या मुलाखतीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर जी मते व्यक्त केली, ती अधिक महत्त्वाची आहेत. उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप जातीयवादाला जवळ करतो की काय, अशी काही लक्षणे दिसू लागली आहेत. छोट्या-छोट्या राज्यांतील निवडणुकीत प्रचारसभा घेण्यात सक्रिय राहिलेले मोदी उत्तर प्रदेशात सभा घेणार नाहीत, असे होणार नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जातीयवादाचा संबंधच येत नाही, विविध समस्यांवर विकास हेच उत्तर आहे, हे मोदींचे विधान या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे. माध्यमातील आपली प्रतिमा आणि आपण खूप वेगळे आहोत, हे इतर देशांच्या नेत्यांना कळले असून त्यामुळे आपले त्या नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत, असे सांगून त्यांनी माध्यमे खरे चित्र उभे करत नाहीत, असा आरोप केला आहे. बहुतांश माध्यमे राजकारणाबाबत सध्या अतिशय नकारात्मक भूमिका बजावत आहेत, हे दररोज दिसतेच आहे. पाकिस्तानशी आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, पण पाकिस्तानकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आपल्या सैनिकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले, हे चांगले झाले. सरकार पाकिस्तानशी नरमाईने वागत असल्याचा जो समज झाला होता, तो त्यामुळे दूर होईल. आपल्या पुढाकारामुळे भारताची बाजू जगासमोर गेली असून पाकिस्तानची जागतिक व्यासपीठावर कोंडी होत असल्याचे सांगून त्यांनी या पुढाकाराचे समर्थन केले आहे. अमेरिका आदी देशांचा मोदी यांनी अलीकडेच झंझावाती दौरा केला आणि एनएसजीच्या सदस्यपदावर भारताचा अधिकार असल्याचे जागतिक नेत्यांना पटवून दिले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. विशेषतः चीनने सुरुवातीस अडथळा आणला असला तरी चीनला पटवून देण्यात आपण यशस्वी होऊ, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. मोदी ज्या आत्मविश्वासाने जगाला ‘शेकहँड’ करत आहेत, ते पाहता तो योग्यच म्हटला पाहिजे. जीएसटी विधेयक राज्यसभेतही लवकरच मंजूर होईल, हे सांगताना हे विधेयक काँग्रेसच्या मदतीशिवाय मंजूर करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले. काळ्या पैशांविषयी काँग्रेसने एसआयटी नेमण्यास उशीर केला आणि आपण सत्तेवर येताच ती नियुक्त केली. त्यामुळे परदेशात गेलेला काळा पैसा परत आणण्यात आणि काळा पैसा निर्माणच होणार नाही, अशी व्यवस्था आणण्यात आपण कटिबद्ध आहोत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. पण हे आपण कसे करणार, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
बातम्या आणखी आहेत...