आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधुनिक ज्ञानर्षी (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय परंपरेनुसार ऋषी या संज्ञेची व्याख्या ऋषि: दर्शनात् (ज्यांना ज्ञानाचा साक्षात्कार होतो) अशीकेली जाते. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनाने आधुनिक युगातले सर्वार्थाने ‘ज्ञानर्षी’ (ज्ञानेन ऋषि:) व्यक्तिमत्त्व लोप पावले, असे म्हणावे लागेल. सुमारे पासष्ट वर्षांचा अथक संशोधनाचा, प्रवासाचा, चिंतनाचा, लेखनाचा जणू यज्ञच डॉ. ढेरे यांनी मांडला होता. लोकसाहित्य, संत साहित्य, इतिहास, दैवतशास्त्र, संप्रदाय, लोकदैवत यांच्या मुळांपर्यंत आपली अभ्याससाधने आणि ज्ञानपिपासा घेऊन ढेरे यांनी हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवला होता. आज लौकिक अर्थाने हा यज्ञ शांतवला असला तरी प्रत्येक पिढीतील ज्ञानसाधकासाठी हा यज्ञ सदैव आवाहन करत राहील, यात शंका नाही. वेद वाङ््मयाचे श्रेय आपली ज्ञानपरंपरा ऋषींना देते, कारण ऋषींना वेद साक्षात ‘दिसले’, असे मानले जाते. असे ‘दिसणे’ साध्य होण्यासाठी व्यक्तीजवळ लागते ती ज्ञानपिपासा, निष्ठा, सचोटी, प्रामाणिकपणा, सर्वस्व झोकून देण्याची तयारी, प्रसंगी विरोध सोसण्याचे धाडस, प्रवाहाविरुद्ध जाण्याचे आत्मबल आणि स्वत:च्या कामाविषयीचा आत्मविश्वास. डॉ. ढेरे हे उपरोक्त सारा गुणसमुच्चय अंगी बाणवलेले दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते. धर्म, तत्त्वज्ञान, लोकसाहित्य, संस्कृती हे समूहमनात पिढ्यान््पिढ्या रक्ताइतके वाहत असलेले विषय, डॉ. ढेरे यांनी आपले अभ्यासविषय मानले. या दुर्लक्षित विषयांचा तारा समोर ठेवून तब्बल ६० पेक्षा अधिक वर्षांची समिधा अर्पून हा तारा त्यांनी त्याच्या तेजोमयतेसह नव्याने समूहमनासमोर आणला. लौकिक दृष्टीने पाहता, ढेरे यांनी निवडलेले विषय मानव्य विद्याशाखेचे घटक मानले जातात आणि अलीकडच्या तंत्रस्नेही काळात मानव्य ही सर्वाधिक दुर्लक्षित ज्ञानशाखा मानली जाते. नव्या काळातली माध्यमस्नेही तंत्रानुनयी लोकप्रियता, प्रतिष्ठा, सन्मान या शाखेकडे फिरकतही नाहीत. पण अत्यंत जाणीवपूर्वक हीच शाखा निवडून डॉ. ढेरे यांनी आपल्या कर्तृत्वाने या शाखेचे लेखन आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘दखलपात्र’ बनवले. त्यांचे संशोधन, लेखन, निष्कर्ष इतके मूलगामी आणि क्रांतिकारी होते की अनेक विदेशी अभ्यासकांनाही ते समजून घ्यावेसे वाटले आणि त्यांनी वेळोवेळी डॉ. ढेरे यांच्याकडे मार्गदर्शनासाठी धाव घेतली. आपल्या संस्कृतीच्या, धर्माच्या, श्रद्धांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आहेत, त्या कशा निर्माण झाल्या, कशा विकसित होत गेल्या आणि दृढमूल कशा झाल्या, याचा सप्रमाण अभ्यास ढेरे यांनी आपल्या संशोधनपर लेखनातून शिस्तबद्ध, तर्कसुसंगत रीतीने समोर आणला. श्रीविठ्ठल एक महासमन्वय, करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी, श्रीतुळजाभवानी, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, श्रीपार्वतीच्या छायेत, लज्जागौरी, लोकसंस्कृतीचे उपासक, त्रिविधा, दत्त संप्रदायाचा इतिहास, श्रीव्यंकटेश्वर, श्रीकालहस्तीश्वर..अशी त्यांच्या संशोधनपर लेखनाची कित्येक उदाहरणे सांगता येतील. डॉ. ढेरे यांच्या समग्र ग्रंथसंभाराकडे नजर टाकल्यास एक वैशिष्ट्य जाणवते आणि ते म्हणजे संशोधनपर लेखनात बऱ्याचदा आढळून येणारा रुक्षपणा वा नीरसता यांचा संपूर्ण अभाव.

एरवी साहित्यप्रांतात संशोधनपर लेखन आणि सर्जनशील लेखन, असे कप्पे पाडलेले दिसतात. पण असे कप्पे करणे योग्य नाही, हे डॉ. ढेरे यांनी आपल्या लेखनातून दाखवून दिले. ऋषिकुळाशी नाते सांगणाऱ्या डॉ. ढेरे यांनी त्याच परंपरेने दिलेला ‘चरैव इति’ हा मंत्रोपदेशही तंतोतंत पाळलेला दिसतो. उपनिषदांनी गुरू-शिष्य संवादातून हा मंत्र दिलेला आहे. ‘तू सदैव प्रवास कर, भ्रमण कर, तुला कळेल’, असा चरैव या मंत्राचा अर्थ आहे. डॉ. ढेरे आयुष्यभर हा मंत्र सिद्ध करत राहिले. एकेका हस्तलिखितासाठी, लोककथेसाठी त्यांनी हजारो मैलांची भ्रमंती केली. खेडोपाडी, गावोगावी, वाड्यावस्त्यांवर फिरून, तेथील ग्राम लोकदैवतांचे अनुबंध जाणून घेतले. परंपरेशी त्यांचे संदर्भ सप्रमाण जोडून दाखवले आणि संशोधनाच्या, अभ्यासाच्या नव्या वाटा निर्माण केल्या. महत्त्वाचे म्हणजे ज्ञानसाधनेला अनेकदा चिकटून येणारा अहंकाराचा वारा त्यांनी स्वत:ला जराही स्पर्शू दिला नाही. सदैव शांत, हसतमुख, समतोल असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व राहिले. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हे समर्थवचन ते यथार्थतेने जगले. आसपास बोकाळलेल्या साहित्यिक राजकारणापासून ते सदैव दूर राहिले. कुठल्याच चर्चासत्रे, परिसंवादांना त्यांची उपस्थिती नसे. आपण एकदा स्वीकारलेली वाट ते अखेरपर्यंत चालत राहिले. कुठल्याही तडजोडी त्यांनी स्वीकारल्या नाहीत. अभिनिवेश ठेवला नाही. ‘न हि ज्ञानेन सदृशम् पवित्रमिह विद्यते’ या वचनानुसार त्यांनी अखंड ज्ञानसाधना केली आणि चालतेबोलते विद्यापीठ बनले. या ज्ञानसाधनेचे दृश्य रूप त्यांनी निर्माण केलेल्या आणि संकलित केलेल्या ४० हजारांच्या ग्रंथसंग्रहाच्या रूपाने नव्या पिढीसमोर उभे आहे आणि हा संग्रह युवा हस्तस्पर्शाची प्रतीक्षा करत राहील, यात शंका नाही.
बातम्या आणखी आहेत...