आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणी आणि शुभेच्छा (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही नव्या पर्वाची सुरुवात व्हावयाची असेल तर त्यासाठी अगोदर कशाची तरी अखेर होणे गरजेचे असते. विशेषत: कालचक्र किंवा दिनमानाच्या बाबतीत बोलायचे झाले तर शेवटातूनच नव्याचा प्रारंभ होत असतो. त्यानुसार आज 31 डिसेंबर म्हणजे कॅलेंडरवरचा वर्षातला अखेरचा दिवस. हा दिवस संपून जसजशी सांज चढत जाईल, तसतसे नववर्ष स्वागताच्या उत्साहालादेखील उधाण येईल. पण त्या वेळीही चालू वर्ष संपत असल्याची एक आंतरिक हुरहुर राहीलच. त्यातूनच मग कळत नकळत वर्षभरातील ठळक घटनांचे सिंहावलोकन मनातल्या मनात सुरू होईल अन् या वर्षाने आपल्याला काय दिले, काय हिरावून घेतले, काय झाले आहे, आणखी काय व्हायला हवे होते, त्याचा हिशेब आपसूकच मांडला जाईल. खरे तर त्यात फार काही मतलब नसेल, पण तरीही माणूस मुळातच हिशेबी (कॅलक्युलेटेड) असल्याने अशी सगळी मांडामांड अपरिहार्य ठरते. आता सरत्या वर्षाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय पातळीपासून अगदी स्थानिक स्तरापर्यंत अनेकविध घटना-घडामोडींचा उल्लेख करता येईल. त्याचप्रमाणे राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आदी क्षेत्रांबरोबरच अर्थकारणाच्या दृष्टीनेदेखील हे वर्ष निश्चितपणे स्मरणात राहील.
सोन्याच्या भावाचे नवनवे उच्चांक, शेअर बाजाराचा सातत्याने वरखाली होणारा आलेख आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची कधी नव्हे एवढी घसरलेली पत या यंदाच्या अर्थकारणातील तीन ठळक नोंदी म्हणाव्या लागतील. त्यातही रुपयाचे झालेले अवमूल्यन व त्याचे आपल्या एकूणच जीवनावर झालेले ‘साइड इफेक्ट्स’ प्रथमत: विचारात घ्यावे लागतील. रुपयाची पत आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीची घसरल्यामुळे सर्वच स्तरांवर प्रचंड वाढलेली महागाई, त्यातून भूक, भय, भ्रष्टाचाराचे अधिक तीव्रतेने पुढे आलेले मुद्दे, त्याच्याभोवती फिरणारे राजकारण आणि त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सगळ्याच क्षेत्रांवर होणारा परिणाम याचा विचार करता हे वर्ष ख-या अर्थाने उलथापालथीचे ठरले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
अर्थकारणावरच समाजकारण व राजकारणाचा डोलारा ब-याच अंशी अवलंबून असल्यामुळे गेल्या वर्षभरात आपल्या आसपासच्या परिस्थितीवर अत्यंत झपाट्याने त्याचे प्रतिबिंब उमटले. त्यातला सगळ्यात नजरेत भरण्याजोगा विषय अर्थातच राजकारणाचा. महागाई, भ्रष्टाचार आणि अर्थकारणाशीच निगडित असलेला भौतिक विकास हे मुद्दे कधी नव्हे एवढ्या प्रकर्षाने देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. गुजरातमधील आपल्या तथाकथित विकासाच्या मॉडेलचा मुद्दा घेऊन नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली. संघ आणि भाजपनेदेखील लोकांचा मूड ओळखून धर्माभिमान, मंदिर उभारणी यासारखे मुद्दे तूर्त काहीसे बाजूला ठेवून विकासपुरुष म्हणून मोदींचे पद्धतशीर ‘मार्केटिंग’ सुरू केले. मीडिया मॅनेजमेंट व सनसनाटी विधाने याच्या आधारे मोदींनीही या काळात आपले पुरेपूर ‘ब्रँडिंग’ करून घेतले. किंबहुना, याच बळावर ते नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांतील निवडणुकीच्या प्रचारात उतरले आणि भाजपला त्यातील तीन राज्यांत विजयश्री संपादन करता आली. पण एवढे होऊनही संघ-भाजप वा मोदी यांच्या या प्रयत्नांवर झाडू फिरवला तो आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी. भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेल्या केजरीवाल यांनी पहिल्याच प्रयत्नात थेट दिल्ली काबीज केली अन् मोदींवरचा फोकस थेट त्यांच्यावर स्थिरावला.
मोदी आणि केजरीवाल यांचा नवोदय हे जसे या वर्षातील राजकारणाचे ठळक वैशिष्ट्य ठरले, तसे सत्ताधारी काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना ‘प्रोजेक्ट’ करण्याची अहमहमिका लागल्याचेही पाहायला मिळाले. देशांतर्गत राजकारणात असे स्थित्यंतर होत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे राजकारण ढवळून टाकले ते एडवर्ड स्नोडेन नामक एका तंत्रज्ञाने. सीआयए या अमेरिकी गुप्तहेर संघटनेचा एकेकाळचा कर्मचारी व कालांतराने नॅशनल सिक्युरिटी एजन्सी अर्थात एनएसएचा कंत्राटदार असलेल्या स्नोडेनने सर्वसामान्यांच्या ‘प्रायव्हसी’वर सुरक्षेच्या नावाखाली अमेरिकी सरकार कसा घाला घालते, त्याची जाहीर वाच्यता करून संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडवून दिली. परिणामी दुस-या देशात आश्रित म्हणून राहण्याची पाळी आज त्याच्यावर ओढवली. मात्र, तरीसुद्धा त्याची ही कृती वर्षभरात सर्वाधिक चर्चेत राहिली ती त्यातील व्यक्तिस्वातंत्र्याशी निगडित मुद्द्यामुळे. त्यातून नव्या जमान्याचा मोकळीक, खुलेपणा आणि एकुणातच पुरोगामित्वाकडे असलेला ओढा अधोरेखित झाला. पण त्याच्याशी विसंगत आणि प्रतिगामित्वाकडे घेऊन जाणारी अशी एक मनाला चटका लावणारी घटना आपल्याकडे घडली, ती म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन हेच जीवनध्येय मानलेल्या नरेंद्र दाभोलकर यांची झालेली हत्या. त्यातही लाजिरवाणी बाब म्हणजे वर्षाची अखेर आली तरी अद्याप दाभोलकरांच्या मारेक-यांचा छडा लागणे तर सोडाच; साधा मागमूसदेखील यंत्रणेला लागू शकलेला नाही. त्यावर उतारा म्हणून राज्य सरकारने अनिष्ट प्रथा-परंपरांविरोधात कायद्याच्या बडग्याचे उचललेले पाऊलसुद्धा म्हणावे तेवढे दिलासादायक नाही. सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रांत अशा घटना-घडामोडी घडत असताना अन्य क्षेत्रांपैकी सगळ्यात चर्चेत राहिली ती सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली निवृत्ती.
केवळ क्रिकेटप्रेमीच नव्हे तर समस्त देशवासीयांसाठी सचिनची निवृत्ती हा मनाला हुरहुर लावणारा विषय ठरला. त्याच्या निवृत्तीला लाभलेले ‘भारतरत्न’ किताबाचे कोंदण मात्र त्यातल्या त्यात समाधान देऊन गेले. सरत्या वर्षातल्या इतरही अनेक ठळक घडामोडींची नुसती नोंद करायची म्हटली तरी रकानेच्या रकाने भरतील; पण त्यातून ‘नॉस्टॅल्जिया’च्या भावनेपलीकडे फार काही हाती लागणार नाही. साहजिकच त्यामध्ये फार रममाण होण्यापेक्षा नववर्षाचा उष:काल काय घेऊन येतो, ते पाहणे निश्चितपणे अधिक औत्सुक्याचे आणि औचित्याचेही ठरेल. तेव्हा, सरत्या वर्षाच्या अखेरीस सर्वांना नववर्षासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!