आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यातील असामान्य (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसाधारण आणि अतिशय सामान्य म्हणून समजल्या जाणा-या कौटुंबिक आणि आर्थिक वातावरणात जन्मले आणि वाढले, तरीसुद्धा ज्यांनी केवळ स्वत:चे अंगभूत गुण, श्रम आणि निष्ठेने आपल्या कलाकौशल्यांची जपणूक केली आणि स्वत:च देशाचे एक प्रतीक बनले, अशांची नावेच जर घ्यायची झाली तर लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची नावे घेता येतील. सचिनने पैसे किती मिळवले, किती उत्पादनांच्या जाहिराती केल्या, कोणत्या उत्पादनाचा तो मॉडेल होता या गोष्टी गौण आहेत. जवळजवळ दोन तपांच्या कारकीर्दीत त्याने भारतीय क्रिकेटच्या तीन पिढ्यांची स्थित्यंतरे होताना पाहिली. क्रिकेटमधील बदलाचे सारे आविष्कार पाहिले. कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट आणि ट्वेंटी-20 क्रिकेट या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखवले.
सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी सचिनची तुलना करून काहींनी सचिन किती तोकडा आहे हे सिद्ध करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला होता. पण दस्तुरखुद्द डॉन ब्रॅडमन यांनीच जेव्हा सचिनच्या कौशल्याला स्वत:च्या कौतुकाचे प्रशस्तिपत्र दिले त्या वेळी ही सारी मंडळी गप्प बसली. भारताच्या या ‘डॉन’च्या वाट्याला असे टीकाकार अनेकदा आले. परंतु नम्रता, सभ्यता, संयम कधीही न सोडणा-या या मर्यादा पुरुषोत्तमाने कुणालाही उलट उत्तर दिले नाही. पैसा मिळतो म्हणून दारू आणि सिगारेट या समाजाचा -हास करणा-या वस्तूंची जाहिरात कधीही केली नाही. मैदानावर प्रत्येक वेळी आपल्या कर्तृत्वाने इतरांपेक्षा आपण वेगळे असल्याचे सिद्ध करणा-या या विक्रमवीराच्या कर्तृत्वाला तमाम क्रिकेट विश्वाने नेहमीच कुर्निसात केला. मात्र कीर्तीच्या शिखरावर पोहोचूनही तो कायम विनम्र राहिला. सर्वसामान्यांना तो आपल्यातील एक आहे असे वाटण्याइतपत सामान्य राहिला. वडिलांच्या मृत्यूनंतर इंग्लंडहून मायदेशात ज्या आवेगाने धावत आला त्याच वेगात देशाचे कर्तव्य पार पाडण्याकरिता पुन्हा क्रीडांगणावर हजर राहिला. एवढेच नव्हे तर स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून मैदानात उतरला, शतक ठोकले आणि ते वडिलांना अर्पण करून देशकर्तव्यपूर्तीची श्रद्धांजलीही वाहिली. ज्या मातेने तो खेळत असताना एकही सामना पाहिला नाही, त्या मातेला आपला अखेरचा 200 वा कसोटी सामना अर्पण करणारा हा आदर्श कुठल्या पिढीतला मानायचा? आजच्या काळात कुणी कुणाला ओळखत नाही. अशा काळात प्रत्येक कर्तृत्वाची उंची गाठल्यानंतर वडिलांच्याप्रति आदर व्यक्त करण्याची संस्कृती अभावानेच पाहायला मिळते. संस्कृतीचे उपासक म्हणवणा-यांनादेखील या संस्कारांचे पालन करता आले नाही. अशा काळात एक युवक तमाम समाजापुढे आपल्या वर्तणुकीचादेखील आदर्श ठेवून जातो हे कौतुकास्पद आहे.
फलंदाजी, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि डावपेच याबाबतचे क्रिकेटच्या मैदानावरचे त्याचे कौशल्य अनुकरणीय आणि आदर्श आहेच. त्यापेक्षाही त्याला सर्वसामान्यातून असामान्य करणारी त्याची वर्तणूक वंदनीय आहे. ज्या काळात बाद असतानाही नाबाद असल्याचा आविर्भाव करत पॅव्हेलियनमध्ये परतणा-या क्रिकेटपटूंची पिढी वाढत आहे, त्याच काळात सचिनने बाद नसतानाही पंचांचे निर्णय शिरसावंद्य मानण्याचा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. त्यापेक्षाही प्रत्येक खेळाडूने शिकण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे त्याचा वक्तशीरपणा. सरावाआधी हजर होणारा, सरावासाठी पुरेसा वेळ देणारा असा क्रिकेटपटू सापडणे दुर्मिळ आहे. चाळिशीत आल्यानंतरही, त्याची सरावासाठी वेळेआधी हजर राहण्याची आणि सराव संपला तरीही काहीतरी योगदान देत राहण्याची वृत्ती सापडणे कठीण आहे. त्याने क्रिकेट एके क्रिकेट हा एकमेव ध्यास घेतला. त्यासाठी सारे काही अर्पण केले. क्रिकेटपटूंच्या पिढीत अभावाने आढळणारी आणखी एक गोष्ट याने जिवापाड जपली आहे, ती म्हणजे स्वत:च्या ‘किटबॅग’वरचे प्रेम. कीर्तीच्या शिखरावर पोहोचण्याचा मार्ग खडतर असतो. त्या मार्गावरून चालताना आपण सर्व आयुधांसह सुसज्ज असायला हवे हा संदेश त्याने तमाम क्रिकेटपटूंना दिला आहे. त्याबाबत एका क्रिकेटप्रेमी व्यक्तीने सांगितलेली एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते. 1993 सालची ही घटना आहे. मुंबईत एक प्रतिष्ठेचा पुरस्कार घेण्यासाठी सचिन एका समारंभाला उपस्थित राहिला होता. पुरस्कार वितरण होते त्या हॉलबाहेर त्याने गाडी उभी केली होती. पुरस्कार घेऊन बाहेर आल्यानंतर सचिनला तेथे गाडी दिसली नाही.
लहान मुलासारखा तो रडायला लागला. त्या वेळी त्या व्यक्तीने त्याला विचारले, का रडतोस? त्यावर सचिन म्हणाला होता, ‘मला गाडी चोरीला गेल्याचे दु:ख नाही, परंतु त्यातील माझे क्रिकेट किट गेल्यामुळे मला अतिशय वेदना झाल्या आहेत. आता मला सराव करायचा होता. त्यासाठी काही गोलंदाजही बोलावले होते.’ सचिन चर्चगेटनजीकच्या कर्नाटक स्पोर्टिंग ग्राउंडवर सराव करणार होता आणि योगायोग असा की, तेथील वाहतूक पोलिसांनी आपल्या वाहनतळावर त्याची गाडी आणली होती. गाडी मिळाल्यानंतर तो आनंदाने नाचायला लागला. त्याची आवडती बॅटही त्याला परत मिळाली होती. आपल्या आयुधांवर एवढे प्रेम केल्यामुळेच आज सचिन मोठी उंची गाठू शकला. रागाने बॅट फेकणारे आजचे काही क्रिकेटपटू पाहिले की सचिनमधील वेगळेपण लक्षात येते. क्रिकेटमधील सारे उच्चांक, विक्रम, मानमरातब त्याच्या पायाशी लोळण घेत असताना त्याने कधीही गर्व केला नाही. स्वत:ची टिमकी वाजवली नाही. त्याच्यातील असे अनेक सुप्त गुण न सांगताच प्रत्येक क्रिकेटरसिकाला दिसत गेले. त्यामुळेच प्रत्येकाच्या हृदयात त्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले. आता सचिन रमेश तेंडुलकरच्या निवृत्तीमुळे यापुढे या सा-या आदर्श परंपरा थांबणार आहेत. सचिनला सतत पाहण्याची आपली सवय तुटणार आहे. अनेकांना यापुढे भारतीय संघाची फलंदाजी पाहताना चुकल्यासारखे वाटेलही.
भारतीय संघातील त्याचे सहकारीही एका मार्गदर्शकाला मुकणार आहेत. क्रिकेट हा खेळ यापुढेही कायम सुरू राहीलच, मात्र या खेळात सचिन ज्या क्षेत्राची निवड करणार आहे तेथे नव्या आदर्शांची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. तो आदर्श कदाचित क्रिकेट प्रशिक्षण क्षेत्रातला असू शकेल, क्रिकेट समालोचन क्षेत्रातील असू शकेल. क्रिकेटमधील नव्या आविष्काराची ती नांदी ठरू शकेल. सचिनची निवृत्ती नव्या आशा, उमेदीची, नावीन्याची असेल.