आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत बंद (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत सुरू असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या क्रिकेट कसोटीतील पहिल्या डावात सचिनने 74 धावा केल्या असल्या तरी तो दुस-या डावात नक्कीच शतक करील, अशी तीव्र इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. जरी त्याने दुस-या डावात शतक केले नाही तरी त्याला माफ करण्याची मानसिक तयारीही कोट्यवधी भारतीयांनी केलेली आहे. जवळजवळ दोन तपांच्या क्रिकेटमधील देदीप्यमान कारकीर्दीनंतर सचिन तेंडुलकर आपल्या सर्वांची कायमची रजा घेतोय, हे वास्तव आता फार दूरचे नाही. त्यामुळे सचिनच्या अखेरच्या इनिंग्जची प्रत्येक दृश्ये, त्याची प्रत्येक धाव ही सर्वांच्या आयुष्याचा भाग बनली आहे. गेले दोन दिवस संपूर्ण देश सचिनच्या निवृत्तीची दृश्ये पाहण्यासाठी टीव्हीकडे डोळे लावून बसला आहे. लोकांच्या दैनंदिन व्यवहारावर सचिनच्या निवृत्तीचे सावट पडलेले दिसत आहे. देशभरातील हिंदी-इंग्रजी-प्रादेशिक भाषेतील टीव्ही न्यूज चॅनल, इंटरनेटवरील वृत्तपत्रांच्या आवृत्त्या, शेकडो इंटरनेट न्यूज पोर्टल, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअपसारखा सोशल मीडिया सचिनच्या प्रत्येक रनचा पाठलाग करताना दिसतोय. देशातील सर्व महानगरे, छोटी शहरे, ग्रामीण भाग सचिनच्या खेळाकडे आनंद आणि दु:ख अशा व्यामिश्र भावनेतून पाहतोय. ज्या मुंबईत सचिनचा जन्म झाला, जिथे त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली, त्या मुंबईत तो निवृत्ती घेत असल्याने अख्खी मुंबापुरी आतून उदास झालेली वाटतेय. लोकलमधून रोज वाहणारे गर्दीचे लोंढे दोन दिवस अदृश्य झालेले दिसत आहेत. हॉटेलमधील गि-हाइकांची संख्या घटलेली दिसत आहे. पदपथांवरची गर्दी कमी झालेली दिसत आहे. रस्त्यावरचा रोजचा ट्रॅफिक जॅम दिसत नव्हता.
बेस्टच्या बस रिकाम्या पळत होत्या. ऑफिसमधील कर्मचा-यांची उपस्थितीही तुरळक होती. आतापर्यंत मुंबईने अनेक राजकीय तसेच कामगार आंदोलनाच्या निमित्ताने बंद पाहिलेले आहेत. शिवसेनेच्या मुंबई बंदला लोक घराबाहेर पडत नसत. राज ठाकरेंच्या अटकेवेळी मुंबईने दहशतीखाली बंद अनुभवला होता. बॉम्बस्फोट तर मुंबईने अनेक पाहिले आहेत; पण दुस-या दिवशी मुंबई त्याच तडफेने धावताना दिसत होती. गेल्या वर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर तर या शहराने आपले सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. पण मुंबईने सचिनसाठी कधी बंद पाळला नव्हता. आजपर्यंत या शहराचे जनजीवन ठप्प करण्यासाठी धाकदपटशा, दहशतीचा जोर लावावा लागत असे. त्यासाठी लाखोंच्या राजकीय सभा, मोर्चा, प्रक्षोभक भाषणे असे नेपथ्य लागत असे. पण यापैकी काहीही दिसत नाही. सध्याची मुंबई बंदची स्थिती ही दहशतीच्या सावटाखाली नव्हे; तर तो लाडक्या सचिनच्या क्रिकेटमधील अद्वितीय कामगिरीला सलाम आहे. त्याच्या निवृत्तीमुळे मनात निर्माण झालेली हुरहुर आहे. उद्या सचिनच खेळत नसल्याने हातातील कामे गडबडीने आवरत, धावत-पळत कोणाचा खेळ पाहण्यासाठी घर गाठायचे, हा मूलभूत प्रश्न केवळ मुंबईकरांच्या मनात नसेल तर सर्वच भारतीयांच्या मनात असेल. त्यामुळे उद्या भासणारी सचिनची अनुपस्थिती पचवण्यासाठी त्याने अखेरच्या सामन्यात शतक करावे, आणखी एक नवा विश्वविक्रम करावा, असा आशावाद साहजिकच देशात पसरला आहे. शिवाय या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होतो, हे पुढील पिढीला सांगण्याची प्रौढीही त्यामागे आहे. देशातील कोणतेही महानगर, छोटी-मोठी शहरे, ग्रामीण भारत बघा या शहर-गावांमधील विविध सरकारी-खासगी कार्यालये, कंपन्या, ऑफिस, रस्त्यावरील दुकानांमध्ये सचिनची अखेरची खेळी सर्वांना पाहता यावी म्हणून टीव्हीची सोय करण्यात आलेली आहे. सचिनचे हे कोट्यवधी अनामिक चाहते सचिन बॅट घेऊन मैदानात उतरल्यानंतर आणि त्याचा खेळपट्टीवर जम बसल्यानंतर आपली कामे काही काळ बाजूला ठेवून टीव्हीसमोर गोळा झाले नसते तरच नवल! या चाहत्यांना त्यांच्या मालकांनी काही काळ कामातून दिलेली मोकळीक हे सचिनवरचे त्यांचे अव्यक्त-निरतिशय प्रेम म्हणावे लागेल.
सचिनच्या बॅटमधील धावांमुळे कंपनीचा नफा घसरला किंवा महत्त्वाच्या बैठका रद्द झाल्या तरी बेहत्तर; पण ज्या सचिनने आपल्या जगण्याला अर्थ दिला, आपल्या आयुष्याला आनंदाचे चार क्षण दिले, कट्ट्यावरचे वाद रंगवले, त्या सचिनप्रति आपणही आपला वेळ द्यावा, अशी ही सार्वत्रिक भावना आहे. बरं, या पाच दिवसांच्या भारत बंदमुळे देशाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले, अशा बातम्या देण्याची कोणाची हिंमत आहे? न्यूज चॅनलवाल्यांनाही त्यांच्या चर्चासत्रांत सचिनने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले, असे म्हणता येणार नाही. हे असे अविश्वसनीय वातावरण या देशाने फार क्वचितच अनुभवले असेल. न्यूयॉर्क टाइम्सने तर सचिनची लोकप्रियता, त्याचे प्रत्येक भारतीयाच्या हृदयाशी असलेले भावनिक नाते आणि त्याची निवृत्ती याची तुलना महात्मा गांधींच्या करिश्म्याशी केली आहे. काही विदेशी वृत्तपत्रांमध्ये तर ‘सचिन फिनामिना’चे विश्लेषण करताना पत्रपंडितांना आधी भारतीयत्व म्हणजे काय आहे, हे सांगावे लागत आहे. सचिन आणि भारत हे समीकरण इतके गुंतागुंतीचे आहे, की त्याची मांडणी करण्यासाठी सामाजिक शास्त्रांनाही अनेक सिद्धांत मांडावे लागतील. सचिनच्या निवृत्तीच्या निमित्ताने झालेला भारत बंद हा कोणाचा निषेध नाही तर ती भारताच्या एकात्मतेची-अखंडत्वाची प्रतिक्रिया आहे. ज्या देशात सध्या फॅसिझम पसरताना दिसतोय, त्याच देशात सर्व जाती-धर्मांचे लोक सचिन नावाच्या अद्भुत रसायनापुढे नतमस्तक होताना दिसत आहेत. या भारत बंदला कोणतेही गालबोट लागण्याची शक्यता दिसत नाही, उलट या आगळ्यावेगळ्या भारत बंदची इतिहासात ठळक नोंद होईल.