आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साळसूद पतंगबाजी (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरे-वाईट राजकारण हा लोकशाही प्रक्रियेचा पाया असतो आणि प्राणही. क्षेत्र राजकारणाचे असो, समाजकारणाचे असो वा कलेचे; जेव्हा ही प्रक्रिया तळागाळापर्यंत झिरपलेली असते, तेव्हा ‘आम्ही राजकारण करत नाही’, ‘आम्हाला राजकारणातले काही कळत नाही’, या म्हणण्याला काडीचाही अर्थ नसतो. करून-सवरून कुणी साळसूदपणाचा आव आणला तरीही कृतीमध्ये दडलेले राजकीय हेतू लपून राहत नसतात. संक्रांतीच्या निमित्ताने गुजरातच्या पतंग संस्कृतीचे दर्शन घडवताना नरेंद्र मोदींच्या बाबतीत नेमके हेच घडले. पण संस्कृतीच्या बुरख्याआडून राजकारण करण्याचा आणि विशिष्ट समाजात आपली प्रतिमा उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न अंमळ फसलाच. सहज नव्हे, तर जुळवून आणलेले योग हे त्या घटनेचे वैशिष्ट्य ठरले.
खरे तर चहुबाजूंनी देशातले राजकीय वातावरण तापले असताना हे विशेषत्वाने नमूद करणे न लगे. असो. विरोधकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदेश देण्यासाठी मोदींच्या गुजरात सरकारने बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय स्टार सलमान खानची (मला मुस्लिमद्वेष्टा म्हणतात का, घ्या मी सगळ्यांचा लाडका सलमानलाच वश करतो, अशा छुप्या आविर्भावासह!) निवड करून निवडणुकीचा प्रचार, संक्रांत आणि सलमानच्या आगामी ‘जय हो’ नामक सिनेमाचे प्रमोशन हे तिन्ही योग सहजगत्या जुळवून आणले. एरवीसुद्धा नियोजनात काटेकोर असलेल्या मोदींच्या मीडिया मॅनेजमेंटने हे योग जुळवून आणताना काही आडाखे, काही गणिते मांडली असणार. म्हणजे, मीडियासमोर जाताना मोदींनी काय बोलायचे-काय टाळायचे, सलमानने काय बोलायचे-काय टाळायचे, एवढेच नव्हे, मीडियाने काय विचारायचे- काय विचारायचे नाही, याचीही सूत्रबद्ध आखणी आणि त्यानुसार रंगीत तालीमही झाली असणार. पण ज्याच्या भरवशावर हा सगळा अंक बेतण्यात आला, तो सलमान खान स्वभावाने पडला एकदम दबंग. रिहर्सल त्याच्या स्वभावाला आणि अभिनयशैलीला जराही न मानवणारी.
हिशेबी वागण्या-बोलण्याची ख्याती इंटुक म्हणून फिल्म इंडस्ट्रीत फेमस असलेल्या आमिर खानची. तो एका सीनसाठी 50-100 वेळा रिहर्सल करणार. मनासारखे होत नाही तोवर करतच राहणार आणि ‘परफेक्शनिस्ट’ ही त्याला मिळालेली उपाधी किती सार्थ आहे, हे पुन:पुन्हा इतरांना पटवून देणार; पण सलमानची दुनियाच वेगळी. ‘दिमाग’पेक्षा ‘दिल’चा कौल घेणारी. उत्स्फूर्तता हा त्याचा स्थायीभाव. तुम्ही त्याला काहीही सांगा, कितीही चांगले डायलॉग लिहून द्या, फायनल टेक देताना हा तुमचे सगळे म्हणणे, विनंत्या-सूचना खुंटीवर टांगणार आणि स्वत:ला हवे तसेच दृश्य देणार. सलमानभाई, सीन ठीक नही हुआ, थोडा रिहर्सल करे... असे त्याला सांगण्याची कुणाची टाप नाही. जो है सो है. असेच काहीसे बहुधा मोदींनी भरवलेल्या पतंगोत्सवातही घडले. किंबहुना, गेल्या वर्षभरात प्रथमच आपल्यापेक्षा या देशात कुणी तरी लोकप्रिय आहे, याची जाणीव मोदींना सलमानच्या उपस्थितीमुळे झाली. एरवी, डिझायनर्स वेअरमधले एकटे मोदीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. ते बोलत असतात तेव्हा कानात तेल घालून मोदींचे शब्द ऐकले जातात. त्यांच्याच अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन प्राधान्याने टिपल्या जातात; पण येथे राजकीय पतंगबाजी करण्याच्या नादात मोदींनी मीडियाच्या साक्षीने उडवायला घेतलेला पतंग दोन फुटांपेक्षा जास्त उडाला नाही आणि मोदींच्या आखीव-रेखीव अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शनकडे कुणाचे फारसे लक्षही गेले नाही. अशा वेळी लक्षात राहिले, ते सलमानच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ इमेजमुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात आलेले अवघडलेपण आणि सलमानचा मीडियाशी चाललेला संवाद आवरता घेण्यातली त्यांची अधीरता. उभे आयुष्य वांद्र्यात धतिंग करण्यात घालवलेल्या सलमानचा पतंग मात्र सहज आकाशात उंच उडाला. त्याच्याच पतंगबाजीने सर्वात जास्त टाळ्या आणि शिट्याही घेतल्या.
आपण कुणासोबत आहोत, याचे फारसे दडपण न घेता सलमानने पतंग महोत्सव साजरा केला. ते करताना मीडियाचाही त्याने व्यवस्थित पचका केला. मोदींबद्दल तुझे मत काय, मोदींना तुझे समर्थन आहे का, मोदी पंतप्रधान झालेले तुला आवडणार का, अशा आशयाचे प्रश्न मीडियाने त्याला विचारले. पण, मीडियाने कितीही भरीस पाडले तरीही त्या प्रश्नांची मोदी समर्थकांना अपेक्षित असलेली उत्तरे त्याने दिली नाहीत. प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटेल अशा नेत्याला मत द्यावे, प्रत्येक मुख्यमंत्र्याने मोदींचा आदर्श ठेवावा, मोदींच्या नशिबात असेल तर तेच घडावे, अशी स्मार्ट उत्तरे देऊन उत्स्फूर्तपणासोबतच आपल्याला थोडेफार राजकीय भानसुद्धा आहे, याची हलकीशी चुणूकही सलमानने दाखवली. त्यातले मोदींना नशिबात असेल तेच मिळावे, हे सलमानचे वाक्य, लावाल तो अर्थ निघणारे आहे. ‘टिनपाट नट’ असलेला सलमान किंवा सलमानच्या कुटुंबातल्या सदस्यांची लायकी काय, हा येथे काही विद्वान पत्रपंडितांचा प्रश्न असू शकतो; पण मोदींनी लावलेल्या राजकीय जाळ्यात हा टिनपाट अडकला नाही, हे वास्तव या विद्वानांस नाकारता येणार नाही. धर्माने मुस्लिम असले तरीही एकाच वेळी गणेशोत्सव-रमझान आणि ख्रिसमस मनोभावे साजरा करणारे सलमानचे कुटुंब सर्वधर्मसमभाव प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी ख्यातकीर्त आहे. याचा त्यांना सार्थ अभिमानही आहे. तो यापूर्वी अनेकदा सलमान वा वडील सलीम खान यांच्या बोलण्यातून झळकलेलाही आहे. अशा वेळी सलमानने पतंग महोत्सवाच्या आडून का होईना, जाहीरपणे मोदींची बाजू घेणे वा मोदींना समर्थन देणे टाळणे, यात खरे तर आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. या फसलेल्या प्रयोगानंतर ‘खरे तर राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी सलमानला बोलावलेच नव्हते. हा तर ‘स्युडो सेक्युलरां’च्या डोक्यातला नासका विचार आहे’, असेही मोदी समर्थक म्हणतील. पण मग पतंग महोत्सवाला प्रमुख पाहुणा सलमान खानच का, मोदींनी पूर्वी या ना त्या निमित्ताने उपकृत केलेले अजय देवगण वा अक्षयकुमार नामक फेमस नट का नाहीत, अगदी गेलाबाजार गुजरातचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर अमिताभ बच्चन का नाही, या प्रश्नाचेही उत्तर त्यांना द्यावे लागेल.