आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय हो सत्या! (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जगातील खरे बदल यंत्र आणि तंत्रज्ञानाने झाले आहेत, असे जे म्हटले जाते ते विसाव्या शतकाच्या अखेरीस पुन्हा खरे करून दाखवणा-या, जगातील सर्वात श्रीमंत ठरलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांची निवड ही अनेकार्थाने आनंददायी घटना आहे. सत्या हे मूळ आंध्र प्रदेशातील बेगमपेठचे. तेथे आज नव्या राज्याच्या स्थापनेमुळे अस्वस्थता असली आणि गरिबीच्या व्याख्येवर भारतात रणकंदन सुरू असतानाही ही निवड आनंददायी आहे. अमेरिकेसारख्या भांडवलदारी देशातील एका श्रीमंत कंपनीतील हे एक सर्वाधिक महत्त्वाचे पद. गेल्या दोन दशकांत भारतीय वंशाच्या इंद्रा नुयी, अजय बांगा, अंशू जैन, पीयूष गुप्ता यांच्यासारख्या अनेकांनी बहुराष्‍ट्रीय कंपन्यांत जबाबदारीची पदे भूषवली आहेत. म्हटले तर तो त्यांच्या वैयक्तिक करिअरचा विषय आहे आणि कंपन्यांची नफेखोरी वाढण्यासाठीच हे सर्व चाललेले असते. मात्र, गेली काही वर्षे या कंपन्या जगाचा आर्थिक व्यवहार ज्या वेगाने ताब्यात घेत आहेत, ते पाहता या बदलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. सॅमसंगसारखी कोरियन कंपनी दर सेकंदाला चार लाख 36 हजार रुपये कमावते आणि त्या कंपनीचे फोन भारतात सर्वत्र दिसू लागले आहेत. हा संबंध जरी आपल्या लक्षात आला तरी ‘जय हो सत्या’ असे का म्हणायचे, याविषयी वाद राहत नाही.
भारत हा जगातला सर्वात तरुण देश आहे आणि भारतीय तरुणांना जगभर मागणी आहे, हे तर आता सर्वज्ञात आहे. मात्र, ज्या बहुराष्‍ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांशिवाय आधुनिक व्यवहारांचे पान हलत नाही त्या कंपन्यांचे सारथ्य भारतीय तरुण करत आहेत. हा बदल निश्चितच दखलपात्र आहे. सत्या नाडेला हे फक्त 46 वर्षांचे आहेत. परकीय चलन आपल्या मायदेशी आणून रुपया स्थिर ठेवण्यात या तरुणांचा मोठा वाटा आहे. असे परकीय चलन किंवा जगभर मागणी असलेली डॉलररूपी संपत्ती मायदेशात आणण्यातही भारतीय तरुणांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी भारतातच राहून देशाची सेवा करायला हवी, हा विचारही आता मागे पडला आणि जागतिक व्यासपीठ ही अपरिहार्यता झाली. त्या संदर्भानेही या निवडीकडे पाहिले पाहिजे. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि स्टीव्ह बॉलमेर यांच्यानंतर 78 अब्ज डॉलरचा महसूल असलेल्या कंपनीचे हे पद नाडेला यांच्याकडे आले आहे. तब्बल 22 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे एक हजार 364 अब्ज रुपये, एवढा तर तिचा नफा आहे. भारतातील पाच हजार कर्मचा-यांसह एक लाख 32 हजार लोक तेथे काम करतात. नाडेला गेली 22 वर्षे म्हणजे 1992 पासून मायक्रोसॉफ्टमध्ये आहेत आणि कालपर्यंत त्यातल्या 20 अब्ज डॉलरच्या क्लाउड कॉम्प्युटिंगचा व्यवसाय व्हाइस प्रेसिडेंट म्हणून ते सांभाळत होते. त्यांना सुमारे साडेचार कोटी रुपये इतका पगार होता. त्यांचा नवा पगार अजून जाहीर झालेला नाही. मायक्रोसॉफ्टचा व्यवसाय स्मार्टफोन आणि टॅब्लेटमुळे जगभर कमी होत असल्याने स्टीव्ह बॉलमेर यांनी तेथील मार्केटच्या दबावामुळे सहा महिन्यांत हे पद खाली करण्याची घोषणा केली होती.
तेव्हापासूनच नव्या सीईओंचा शोध सुरू होता. या क्षेत्रातील बहुराष्‍ट्रीय कंपन्यांच्या सीईओंनी या स्पर्धेत उडी घेतली नसती तरच नवल. फोर्डचे अ‍ॅलन आणि नोकियाचे स्टीफनसारखे दिग्गज हेही त्यात होते. त्या स्पर्धेत नाडेला निवडले गेले आहेत. नाडेला यांच्या निवडीसंबंधी जी माहिती बाहेर आली आहे, ती पाहिल्यावर कॉर्पोरेट विश्व सध्या काय विचार करते आहे हेही लक्षात येते. ‘परंपरा महत्त्वाच्या नाहीत, मला इनोव्हेशन्स हवी आहेत,’ असे नाडेला आपल्या सहका-यांना पहिल्या पत्रात म्हणतात. कारण मोबाइल, इंटरनेटच्या स्पर्धेत विंडोज, वर्ल्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, आउटलूक एक्स्प्रेस अशा सर्व उत्पादनांकडे नव्या दृष्टीने पाहण्याची वेळ आली आहे. आज वैयक्तिक संगणकात म्हणजे पीसीमध्ये 90 टक्के विंडोज वापरले जात असले तरी स्मार्टफोनमध्ये ते केवळ चार टक्के, तर टॅब्लेटमध्ये अगदीच किरकोळ प्रमाण आहे. पिसीचे प्रमाण वेगाने कमी होते आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या दृष्टीने ते मोठेच आव्हान आहे. अशी माहिती तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या जगातील नवनवी आव्हाने नाडेला यांच्यासमोर आहेत. जगाला ग्राहक करा, हा कॉर्पोरेट जगाचा मंत्र असतो. तो मंत्र मायक्रोसॉफ्टनेही जपला आहे. त्यालाच ते बदल म्हणतात. त्यामुळे अशा उंचीवर बसलेली माणसे काय विचार करतात हे महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवरही नाडेला यांच्या निवडीकडे पाहिले पाहिजे. कारण ज्या बेगमपेठमध्ये सत्या नावाचा मुलगा क्रिकेट खेळत होता त्याच मुलाचे सासरे वेणुगोपाल यांनी आंध्रात राजकीय निर्णय म्हणून गरीब जनतेला दोन रुपये किलो दराने तांदूळ देण्याची सरकारी योजना आणली होती. माहिती तंत्रज्ञानात अतर्क्य झेप घेणा-या या जगात प्राथमिक, पायाभूत अशा क्षेत्रातही इनोव्हेशनसाठी मोठा वाव आहे. त्यातही आपल्याला काही केले पाहिजे, असे विचार जगाच्या व्यासपीठावर काम करणा-यांच्या मनात येतच असतील. जगातल्या सर्वात श्रीमंत पदावर दीर्घकाळ विराजमान असलेल्या बिल गेट्स यांनाही फाउंडेशन स्थापन करून अशी कामे करावी वाटली, त्या रांगेत आपले नाडेलाही जाऊन बसतील, अशी आशा करूयात. जय हो सत्या!