आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बॉडीलाइन बॉलिंग’(अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार राजकारणात आले नसते तर त्यांनी काय केले असते? काही जण म्हणतात की ते क्रिकेटपटू झाले असते. पण गोलंदाज की फलंदाज? बहुतेकांच्या मते, ते क्रिकेटपटू नसतानाही इतके गुगली, इतके बाउन्सर्स राजकारणात टाकत असतात आणि अनेक वेळा इतकी बॉडीलाइन गोलंदाजी करीत असतात, की ते खरोखरच क्रिकेटमध्ये उतरले असते तर त्यांनी भल्याभल्यांच्या विकेट्स काढल्या असत्या. पवार भारताच्या क्रिकेट संघात गोलंदाज असते तर विश्वचषक कायम भारतातच राहिला असता. मग भारताला ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज कोणाचीच धास्ती वाटली नसती. शिवाय मग पवारांना क्रिकेटमधील कर्तबगारीबद्दल केव्हाच ‘भारतरत्न’ दिले गेले असते. खरे म्हणजे पुढे ते पुन्हा सचिनला देणे अडचणीचे झाले असते! राजकारणात आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात राहूनही त्यांनी बीसीसीआय आणि एमसीएच नव्हे, तर आयसीसीमध्येही जी फील्डिंग लावली आणि जी गोलंदाजी केली, तिचा सर्व कप्तानांनी सखोल अभ्यास करायला हवा. एकही चेंडू ‘नो बॉल’ टाकायचा नाही, स्वत:च्या योजनेनुसार ‘वाइड बॉल’ टाकायचा आणि फलंदाजाचे लक्ष विचलित झाल्यावर गुगलीने त्याची दांडी उडवायची, हे तंत्र त्यांनी बीसीसीआय व एमसीएत परिणामकारकरीत्या वापरले आहे. हे तंत्र पुरेसे यशस्वी झाले नाही, तर क्रिकेट नियंत्रण समितीने घातलेले नियम धाब्यावर ठेवून थेट ‘बॉडीलाइन बॉलिंग’ करून फलंदाजाला घायाळ करायचे वा धमकावायचे, ही पवारांची अफलातून शैली राहिली असती. परंतु नियतीने पवारांना क्रिकेटऐवजी राजकारणात आणले. त्यामुळे पवारांनी त्यांची अंगभूत फिरकी गोलंदाजी शैली राजकारणात आणली.
गेल्या सुमारे 40 वर्षांत त्यांनी भल्याभल्या फलंदाजांना गारद केले आहे. काँग्रेसचा चार राज्यांत दारुण पराभव झाल्यानंतर पवारांनी आता परत ‘बॉडीलाइन अ‍ॅटॅक’ काँग्रेस पक्षावर केला आहे. वरवर पाहता तो ‘अ‍ॅटॅक’ राहुल गांधींवर केला आहे असे वाटेल. सध्या राहुलवर टीका करणे ही ‘इंटेलेक्च्युअल’ वा ‘कल्चरल’ फॅशन आहे. मीडियाने तर या पराभवाचे खापर पूर्णत: राहुल गांधींवर फोडले आहे. जणू काही बाकी सर्व काँग्रेस नेते व कार्यकर्ते प्राण पणाला लावून काँग्रेससाठी लढत होते; पण अरेरे! राहुल गांधींनी काही मदतच केली नाही! वस्तुस्थिती ही आहे की, काँग्रेस नेते स्वत:च्या मस्तीत, कार्यकर्ते छोटी-मोठी पदे वा तिकिटे मिळवण्याच्या धडपड-खटपटीत आणि आमदार-मंत्री सत्तेत मश्गूल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता राहुलच्या नावाने पावती फाडणे सोयीचे आणि सोपे असले तरी काँग्रेसवाल्यांनी आपण गेल्या 10 वर्षांत काय केले, याचाही हिशेब पक्षाला द्यावा. परंतु खुद्द काँग्रेसमध्ये वातावरण राहुलच्या विरोधात जात असलेले पाहून शरद पवारांनी त्यांचा बॉडीलाइन बॉल राहुलच्या दिशेने फेकला आहे. परंतु शरद पवार जेवढी गोलंदाजी मैदानावर करतात, तेवढीच ते मैदानाबाहेर निदान पॅव्हेलियनमध्ये करतात. त्यांचा राहुलच्या दिशेने टाकलेला बॉडीलाइन बॉल हा खरे म्हणजे सोनिया गांधींच्या दिशेने टाकला आहे. पवारांना माहीत आहे की, सोनिया गांधींना घायाळ केल्याशिवाय महाराष्ट्रात आणि देशात त्यांचे राजकारण पुढे जाऊ शकत नाही.
1999 मध्ये राहुल गांधी राजकारणाच्या परिघावरही नव्हते. परंतु पवारांनी तेव्हा सोनिया गांधींच्या ‘विदेशी’ जन्माचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना त्या एकमेव मुद्द्यावर झाली आहे. विशेष म्हणजे 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस कार्यकारिणीने जो एकमताचा ठराव केला, त्यात सोनिया गांधींनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असे आग्रहपूर्वक म्हटले होते. जर सोनिया गांधींनी त्या ठरावाला मान देऊन काँग्रेसच्या नेत्यांची विनंती मान्य केली असती, तर 1991 मध्येच सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या असत्या. त्या ठरावाला शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा होता. सोनियांचा विदेशी जन्म पवारांना तेव्हा आठवला नाही. पुढे 1998 मध्ये पवारांच्या पुढाकाराने सोनिया गांधींच्या सभांचे महाराष्ट्रातील आयोजन केले गेले.
सोनियांच्या नंदुरबार व जळगाव सभांचे वर्णन करताना पवारांनी ‘अभूतपूर्व’ आणि ‘ऐतिहासिक’ अशी विशेषणे लावली होती. तेव्हा सोनियांच्या विदेशी जन्माचा मुद्दा भाजपने उपस्थित केला होता. परंतु 1998 मध्ये आलेले वाजपेयी सरकार वर्षभरानंतर गडगडले. तेव्हा सोनिया गांधी कदाचित पंतप्रधान होतील, असे पवारांना वाटले आणि पवारांनी बंडाचा झेंडा फडकावला. पण आता असे जाहीर झाले आहे की, तेव्हासुद्धा सोनिया गांधी स्वत: डॉ. मनमोहन सिंग यांचेच नाव सुचवणार होत्या. पुढे प्रभू चावला व वीर संघवी अशा दिल्लीच्या दिग्गज पत्रकारांनी जाहीर केले की, त्यांना सोनिया गांधींच्या या भूमिकेची पूर्ण माहिती होती. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आत्मचरित्र लिहून जगाला सांगितले की, सोनिया गांधींनी आपल्याकडे पंतप्रधान होण्याची इच्छाही व्यक्त केली नव्हती आणि आपणही (म्हणजे स्वत: श्री. कलाम) त्यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केला नव्हता. तरीही पवारांनी त्या मुद्द्यावरून स्वत:चा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या मुद्द्याखेरीज पवारांकडे वेगळा पक्ष स्थापण्यासाठी काहीही नव्हते. त्या वेळचा हा ‘बॉडीलाइन अ‍ॅटॅक’ सोनियांवर होता. काँग्रेस पक्षाचा 1999 मध्ये पराभव होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी हेही एक कारण आहे. परंतु मनात दीर्घद्वेष न ठेवता सोनियांनी 2004 मध्ये भाजपविरोधी आघाडीत पवारांना सामील करून घेतले. काँग्रेस आघाडीवर 2004 मध्ये बहुमत मिळवून सरकार स्थापण्याची वेळ आली तेव्हा पवारांनी पाहिले की, सव्वातीनशे खासदारांनी सोनिया गांधींना पंतप्रधान होण्यासाठी समर्थन दिले आहे. मग पवारांनी त्यांचा तो एकमेव मुद्दा बाजूला ठेवून सोनियांच्या पंतप्रधानपदाच्या शपधविधीसाठी लेखी पाठिंबा दिला. पण त्यांची ती मजबुरी होती; इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी आघाडीच्या अंतर्गत सुप्त-गुप्त विरोध चालूच ठेवला. पुढे 2009 च्या निवडणुकीच्या वेळेस पवारांनी परत फील्डिंग लावली. पण तेव्हा तर काँग्रेसला तब्बल 206 जागा मिळाल्या आणि पवारांच्या गुगलीवर काँग्रेसने षटकार ठोकला. आता पवारांनी राहुलला लक्ष्य करून सोनिया गांधींवर बॉडीलाइन गोलंदाजी केली आहे. खरोखरच पवार क्रिकेट नियामक मंडळाच्या राजकारणात यायच्याऐवजी पूर्वीच क्रिकेट खेळायला मैदानात उतरले असते तर विश्वचषक तहहयात भारतातच राहिला असता. बहुतेक संस्थांमध्ये पवार तहहयात असतात!