आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटीसोशल मीडिया! (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारा भारत मोदीमय करण्यासाठी आभासी जगाचा म्हणजेच सोशल मीडियाचा सर्वात विखारी वापर होत आहे, हे या घटकेचे उघड गुपित आहे. देशातील जवळपास 12 ते 13 कोटी तरुण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानास पात्र ठरणार आहेत. यातील शहरी भागात राहणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करणारा आहे. या तरुणवर्गाला हरत-हेने वश करण्यासाठी सत्य-असत्य, नैतिक-अनैतिक, योग्य-अयोग्य कशाचीही चाड न बाळगता फेसबुक-ट्विटर-यूट्यूब-व्हॉट्सअ‍ॅप आदी नावांनी सुरू असलेल्या ऑनलाइन चावड्यांवर ताबा मिळवण्याचा भाजपमधील मोदी समर्थकांनी जोरदार प्रयत्न चालवला आहे. चलाख आयटी कंपन्यांमार्फत दुधारी अस्त्र बनलेल्या सोशल मीडियाच्या गैरवापराचे ‘कोब्रा पोस्ट’ने नुकतेच उघडकीस आणलेले प्रकरण हे त्याचे ताजे आणि चिंताजनक असे उदाहरण आहे.
शोधपत्रकार अनिरुद्ध बहल यांच्या ‘कोब्रा पोस्ट’ने ‘ऑपरेशन ब्ल्यू व्हायरस’ नावाने प्रसारित केलेल्या माहितीपटाद्वारे देशातल्या फारसा नावलौकिक नसलेल्या दोन डझनहून अधिक आयटी कंपन्या काही कोटी रुपयांच्या बदल्यात विशिष्ट राजकीय नेत्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी वा डागाळण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर करत असल्याचा थेट दावा केला आहे. असे करताना परदेशातले आयपी अ‍ॅड्रेस ताब्यात घेत राजकीय नेत्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी बनावट फेसबुक वा ट्विटर अकाउंट तयार करून समर्थकांची संख्या वाढत चालल्याचा आभास निर्माण केला जात आहे. याच पद्धतीने अधिकृत कंपन्यांचे नव्हे तर जोडणी केलेले संगणक वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून विरोधी नेत्यांची प्रतिमा डागाळण्याचा सर्रास प्रयत्न होत आहे. मूळ स्रोतापर्यंत पोहोचता येऊ नये, यासाठी या कंपन्या प्रॉक्सी कोड वापरून दर तासाला आपले लोकेशन बदलत आहेत. यातील ब-याचशा कंपन्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ते ज्या पक्षाचे सर्वेसर्वा बनले आहेत, त्या भारतीय जनता पक्षासाठी आपली तंत्रचलाखी प्राधान्याने पणाला लावत असल्याचाही आरोप ‘कोब्रा पोस्ट’ने या प्रकरणात सामील असलेल्या आयटी कंपन्यांचा हवाला देऊन केला आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये केवळ मोदींचेच नाव का येत आहे, असाही प्रश्न बहल यांना करण्यात आला आहे. मात्र, आम्ही कुणालाही ठरवून लक्ष्य केलेले नाही. या आयटी कंपन्या मोदींव्यतिरिक्त इतर पक्षांतल्या नेत्यांसाठी काम करत असतीलही, पण सोशल मीडियामार्फत अलीकडच्या काळात व्यक्तिगत वा पक्षपातळीवर भलामण आणि बदनामी करण्यासाठी ज्या काही मोहिमा राबवल्या जात आहेत, त्यात भाजप आघाडीवर आहे, हे आजचे वास्तव स्टिंग ऑपरेशनद्वारे बाहेर आल्याचे ‘ कोब्रा पोस्ट’चे म्हणणे आहे.
‘कोब्रा पोस्ट’चे म्हणणे काहीही असले तरीही, या प्रकरणामागे काँग्रेसच्या ‘डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट’चा हात असल्याची विनाविलंब टिप्पणी भाजपचे बोलघेवडे दरबारी नेते अरुण जेटली यांनी केली आहे. मोदींच्या बेफाट लोकप्रियतेमुळे लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यातून येत असलेल्या नैराश्यामुळे काँग्रेसने ‘कोब्रा पोस्ट’ला पुढे करून बदनामीची छुपी मोहीम चालवल्याची टीका भाजपचे दुसरे दरबारी नेते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. येथे मुद्दा मोदींची लोकप्रियता वाढल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकल्याचा नसून, गेल्या काही महिन्यांत अनुभवास येत असलेल्या माहिती स्वातंत्र्याच्या दडपशाहीचा आणि मत स्वातंत्र्यास बाधा आणणा-या अतिक्रमणाचा आहे. किंबहुना, याच दडपशाही वृत्तीचा ‘कोब्रा पोस्ट’ने पर्दाफाश केला आहे. यापूर्वीसुद्धा मोदींची स्तुती करण्यासाठी वा मोदी विरोधकांवर जहरी टीका करण्यासाठी बनावट नावाने काही लाख फेसबुक-ट्विटर अकाउंट उघडले गेल्याचे आणि त्यासाठी पेरू आदी द.अमेरिकेतील देशांतले आयपी अ‍ॅड्रेस सूत्रबद्धरीत्या ताब्यात घेतल्याचे आरोप झाले होते. असो.
पंधराव्या शतकाच्या मध्यावर गुटेनबर्ग तंत्राचा वापर करून चर्चची एकाधिकारशाही असलेले पवित्र बायबल छापील स्वरूपात लोकांपुढे आले आणि त्या घटनेमुळे माहिती स्वातंत्र्याचे नवे पर्व सुरू झाले. त्यानंतर रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट आणि आता सोशल मीडिया असा माध्यम प्रवास घडत माहिती स्वातंत्र्याचा परीघ उत्तरोत्तर विस्तारत गेला. परस्पर मानवी संवाद हा या प्रक्रियेचा मुख्य हेतू होता आणि विसाव्या शतकातले माध्यम तत्त्वज्ञ मार्शल मॅक्लुआन यांनी म्हटल्याप्रमाणे, माहिती स्वातंत्र्याचा संकोच न करणारा संवादविस्तार हे त्याचे महत्त्वाचे सूत्र होते. एरवी, प्रत्येकास संवाद स्वातंत्र्य हवे असते. परंतु या स्वातंत्र्याची त्यास भीतीही वाटत असते आणि असुरक्षितताही. याच असुरक्षिततेचा गैरफायदा उठवत सोशल मीडियाचे रूपांतर विखार पसरवणा-या कॉर्पोरेट कम्युनिकेशन सिस्टिममध्ये करण्यात मोदी समर्थकांना यश आले आहे. लोकांनी काय बघायचे-काय बघायचे नाही, काय वाचायचे-काय वाचायचे नाही आणि काय ऐकायचे-काय ऐकायचे नाही याचे निर्णय ही यंत्रणा घेऊ लागली आहे. याच यंत्रणेचा वापर करत आज अनेक आयटी कंपन्या फेसबुक-ट्विटरच्या माध्यमातून धमक्यावजा इशारे देणारा मजकूर प्रसारित करत जनसमूहांवर दहशत पसरवू पाहत आहेत. मोदींचा विषय निघाल्यावर 2002 च्या गुजरात दंगलींची चर्चा करू नका, एका मर्यादेपलीकडे ‘स्नूपगेट’ प्रकरणाची वाच्यता करू नका, असाही या कंपन्या आणि या कंपन्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणा-या मीडियाचा आक्रमक आग्रह आहे. वस्तुस्थिती इतकी स्पष्ट असताना भाजपचा आविर्भाव मात्र असा आहे की, जणू त्यांच्याच संवाद स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. एकूणच मूळ विषयाला बगल देत चर्चा व्यक्तिकेंद्रित ठेवण्याची, पर्यायाने ती उधळून लावण्याची चलाखी याही वेळी भाजपने व्यवस्थित साधली आहे.