आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नोवाक’ नावाची वृत्ती (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगायोग किंवा ‘शॉर्टकट’मुळे कोणत्याही क्षेत्रातले शिखर कदाचित गाठता येईल; परंतु सर्वोच्च स्थानी मुक्काम ठोकायचा, तर सातत्य आणि अथक प्रयत्नांना पर्यायच नसतो. जय-पराजय हाच अविभाज्य भाग असलेल्या क्रीडा क्षेत्रात तर हे सत्य अधिकच क्रूर असते. खेळाच्या मैदानावर इतिहास, परंपरा, जुनी कामगिरी वगैरेंचा उपयोग काडीइतकाही नसतो. मैदानातला प्रत्येक क्षण नवा. सामन्यागणिक स्वतःला नव्याने सिद्ध करून दाखवावे लागते. अगदी शेतकऱ्यासारखे. अतिवृष्टी, दुष्काळ, कीड-रोग, पडते बाजारभाव या तलवारी जशा शेतकऱ्याच्या डोक्यावर तसेच जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यातून अचानक येत आव्हान देणारे नवे ‘टॅलेंट’, शारीरिक दुखापती, अवचित हरपणारा सूर, तगडे प्रतिस्पर्धी, पंचांचे सदोष निर्णय या संकटांची ओझी खेळाडूंच्या खांद्यावर असतात. केवळ खडतर मेहनतीच्या बळावर क्रीडा क्षेत्रात अव्वल होता येत नाही. आहार, व्यायामाची काटेकोर शिस्त खेळाडूंना पाळावी लागतेच; मात्र हे वेगळेपण ठरत नाही. आजच्या प्रत्येक खेळाडूला हे मंत्र-तंत्र उपलब्ध होऊ शकतात. ‘जेता’ आणि ‘जगज्जेता’ यातला फरक निश्चित करणारी बाब असते ती म्हणजे खेळाडूची मनोवृत्ती. अटीतटीच्या क्षणी न डगमगणारी एकाग्रता आणि मोक्याच्या क्षणी उत्तुंग कामगिरी नोंदवू शकणारी मानसिक-शारीरिक ताकद हीच सामान्य खेळाडूला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनवते. मग तो ‘रेसिंग’च्या दुनियेतला ड्रायव्हर मायकेल शूमाकर असो, फुटबॉलवर जादुई पदलालित्याचे मोरपीस फिरवणारा लिओनेल मेस्सी असो की चित्त्यासारखा सुसाट युसेन बोल्ट. टेनिस जगताचा सध्याचा सम्राट नोवाक योकोविक हा याच श्रेणीतला अव्वल खेळाडू आहे. टेनिस विश्वातला ‘ऑलटाइम ग्रेट’ म्हणून स्वतःचे नाव कोरण्याच्या दिशेने नोवाकची गेली पाच वर्षे घोडदौड सुरू आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी किंवा ऑस्ट्रेलियासारख्या संपन्न आणि कमालीची क्रीडा संस्कृती असलेल्या देशातून नोवाक आलेला नाही. आग्नेय युरोपातल्या सर्बियाचा हा टेनिसपटू. लहानपणी रॅकेट हातात धरली, तेव्हा सर्बियात नोवाकला टेनिसचे पुरेसे प्रशिक्षणही उपलब्ध नव्हते; पण टेनिसपटू होण्याची त्याची जिद्द होती. युरोपातली हाडे गोठवणारी थंडी, बोचरा पाऊस, हिमवर्षाव असल्याने आठ-नऊ वर्षांच्या नोवाकच्या टेनिसप्रेमात अडथळे आले नाहीत. टेनिसप्रेमापोटी जर्मनीतल्या म्युनिच येथे तो ये-जा करत राहिला; पण रॅकेटवरची पकड त्याने ढिली पडू दिली नाही. आशा जिवंत ठेवली तरी पुढे जात राहू, यावर नोवाकचा विश्वास नव्हता. स्वतःवरचा विश्वास त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. स्वतःवरच विश्वास नसेल, तर साधे स्वप्न गाठतानाही दमछाक होते. आत्मविश्वास डळमळला की संकटांचे डोंगर होतात.
शतकांचे शतक ठोकणारा सचिन तेंडुलकर म्हणत राहिला की, ‘स्वप्नांचा पाठलाग करा.’ वयाच्या बेचाळिसाव्या वर्षीही दुहेरी टेनिस गाजवणारा लिएंडर पेस काय सांगतो तर ‘नेव्हर से डाय’. कोट्यवधींच्या गर्दीतून वाट काढत ‘विश्वविजेता’ होणे महाकर्मकठीण असते. नोवाक ते करू शकला, कारण स्वप्ने सत्यात उतरत असल्याची दृश्ये तो लहानपणापासून पाहत आला. खेळाडूच का! स्वप्ने खरी होत असल्याचे प्रत्येकाला पाहता यायला हवे. “आयुष्यात ‘आकर्षणाचा नियम’ नावाची एक चीज असते. स्वप्नात जे दिसते, जे विचार मनात रुंजी घालतात ते सगळे खऱ्या आयुष्यात उतरतेच. जीवन असेच पुढे जात असते,” हे नोवाकचे तत्त्वज्ञान आहे.
महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांकडे स्वप्ने पाहण्याचे दारिद्र्य नाहीच. कधी कोरडे ढग स्वप्नांचा चुराडा करतात. पडेल बाजारभावांमुळे कधी स्वप्ने धुळीस मिळतात. कधी सावकारी पाशात स्वप्नांचा गळा घुसमटतो. टेनिस कोर्टाचा राजा होताना नोवाकनेही असंख्य अडचणींचा सामना केला. मनाची एकाग्रता टिकवण्यासाठी त्याने ध्यानधारणेचा आधार घेतला. म्हणून त्याच्या भावनाच मेल्या असे नव्हे. आजही कोर्टवर तो चिडतो; पण संयम गमावत नाही. जगात क्रमांक एकवर असूनही रॉजर फेडररइतके टेनिस चाहत्यांचे प्रेम त्याच्या वाट्याला नाही. राफेल नदालइतके ‘फॅन फॉलोअर्स’ त्याला नाहीत. फेडररची नजाकत नोवाककडे नाही. नदालची आक्रमक ताकदही त्याच्याकडे नाही, तरीही नोवाक अविचल असतो. फेडरर-नदालच्या दोन ध्रुवीय सुवर्णकाळातही तो स्वतःचे अस्तित्व निर्माण करतो. २०१२ ची ‘ऑस्ट्रेलियन ओपन फायनल’ कोण विसरेल? टेनिसच्या इतिहासातला सर्वाधिक काळ रंगलेला तो सामना होता. तब्बल पाच तास ५३ मिनिटे घाम गाळून नोवाकने नदालला नमवले. २०११ पासून तब्बल १८ ‘फायनल्स’मध्ये धडकण्याचे सातत्य नोवाकने दाखवले. यापैकी १० ग्रँडस्लॅम त्याने खिशात टाकल्या. अठ्ठावीसवर्षीय नोवाकचे सातत्य पाहता फेडररची १७ ग्रँडस्लॅमची सार्वकालिक महान कामगिरी तो झाकोळणार असल्याची चर्चा टेनिस विश्वात रंगते आहे. आत्मविश्वास, संयम आणि अथक प्रयत्नांची सांगड घालत शांतपणे आव्हाने मोडीत निघालेल्या "नोवाक' प्रवृत्तीचा हा दबदबा आहे.