आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभ्रम वाढवणारी माहिती (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशीद आणि अजमेर शरीफ बॉम्बस्फोटांच्या घटनांत आरोपी असलेल्या स्वामी असीमानंद यांच्या अंबाला कारागृहातील तथाकथित चार टप्प्यांतील मुलाखतीमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुस्लिमबहुल असलेल्या भागात 2006 ते 2008 दरम्यान जे बॉम्बस्फोट झाले, ते राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने झाले, या घटनांची माहिती सरसंघचालक मोहन भागवत आणि इंद्रेशकुमार यांना होती, त्यांच्याशी गुजरातमधील डांग भागात 2005 मध्ये आपली भेट झाली होती आणि त्या वेळी या नेत्यांनी अशा घटना घडवून आणण्यासाठी आशीर्वाद दिला होता, असा दावा असीमानंद यांनी या मुलाखतीत केल्याचे ‘कारवाँ’ या इंग्रजी मासिकात प्रसिद्ध झाले आहे. लीना गीता रघुनाथ नावाच्या बातमीदाराने असा दावा केला आहे की, गेल्या दोन वर्षांत त्या असीमानंद यांना चार वेळा भेटल्या आणि त्यांची मुलाखत घेतली. या अंकात प्रसिद्ध झालेल्या प्रदीर्घ मुलाखतीची सुरुवात ‘स्वामीजी को बुलाव’ अशी आहे. ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातील प्रमुख दहा प्रश्न असे : पहिला प्रश्न ही मुलाखत सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर का प्रसिद्ध करण्यात आली? दुसरे म्हणजे तुरुंगात अशी मुलाखत घेतली जाऊ शकते काय? तिसरे म्हणजे असीमानंद यांनी आतापर्यंत आपले जबाब अनेकदा बदलले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीवर किती विश्वास ठेवायचा? चौथे म्हणजे या मुलाखतीच्या आधारे काही कारवाई केली जावी अशा ज्या मागण्या केल्या जात आहेत त्यासंबंधी प्रशासनाचे धोरण काय असणार आहे? पाचवे म्हणजे या विषयावर वादळ माजल्यावर मासिकाने अशा मुलाखती झाल्याचे, मात्र त्याच्या ऑडिओ टेपचा दर्जा चांगला नसल्याचे म्हटले आहे. मग या टेप पुराव्यासाठी वापरल्या जाऊ शकतात काय? सहावा प्रश्न असा की, देशातील सर्वोच्च तपास यंत्रणांनी तपास केल्यावर तपासात इतक्या त्रुटी राहू शकतात हे मान्य करायचे काय? सातवा प्रश्न म्हणजे सर्वसामान्य भारतीय नागरिकांचे जीव घेणा-या विषयांचे राजकारण आपल्या देशात किती दिवस चालू राहणार आहे? आठवा प्रश्न म्हणजे अशा नाजूक विषयात देशाच्या गृहमंत्र्यांनी इतक्या तातडीने आणि त्याला काही रंग येईल असे बोललेच पाहिजे का? नववा प्रश्न असा समोर येतो की, जाती-धर्माच्या आधारावर एकमेकांना पाण्यात पाहणा-या कडव्या हिंदू, मुस्लिम आणि इतर धार्मिक संस्था-संघटना या देशाचे स्वरूप कधी समजून घेणार आहेत? आणि शेवटचा दहावा प्रश्न म्हणजे विश्वास ठेवावा अशी व्यवस्था आम्ही एक देश म्हणून कधी निर्माण करणार आहोत? याचदरम्यान दुसरी एक महत्त्वाची घटना समोर आली आहे.
इशरत जहाँ नावाची मुंब्रा येथील 19 वर्षांची मुलगी आणि इतर चार जणांना ते ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा संशय घेऊन जिवे मारल्याच्या घटनेत ‘आयबी’चे माजी विशेष संचालक राजिंदरकुमार आणि इतर तिघांवर आरोप दाखल केले आहेत. या घटनेत गुजरात पोलिसांना शस्त्रे पुरवली आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप राजिंदरकुमार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुजरातमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेची माहिती गुजरातचे त्या वेळचे गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही होती, असा जबाब पोलिस अधिका-यांनी दिल्याने खळबळ माजली होती. मात्र, या ताज्या आरोपपत्रात अमित शहा यांच्या नावाचा उल्लेख नाही. इशरत आणि इतर चार जणांनी गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप ठेवून ही चकमक झाली होती. ती चकमक बनावट असल्याचे नंतर समोर आले. अशा बनावट चकमकीच्या घटनेत ‘आयबी’ अधिका-यावर आरोप ठेवले जाण्याची ही पहिलीच घटना असावी. हे सर्व गंभीर यासाठी आहे की, एका निरपेक्ष प्रशासनाच्या अधिपत्याखाली आपल्या देशाचा कारभार चालला आहे, या जनतेच्या मनातील समजालाच यामुळे तडा जातो आहे. प्रशासकीय निर्णयात जाती-धर्माच्या आणि राजकीय पक्षांच्या निकषांना काही स्थान असता कामा नये, या तत्त्वाविषयी कोणताही वाद असण्याचे कारण नाही. अशी भेदभावमुक्त प्रशासकीय व्यवस्था आपण स्वीकारली आहे आणि तीवर या देशातील 125 कोटी जनतेचा विश्वास राहावा असे प्रयत्न सतत केले गेले पाहिजेत. त्यामुळे समोर येणा-या कोणत्याही माहितीच्या आधारे कायद्याच्या चौकटीत चौकशी झालीच पाहिजे याविषयीही कोणा भारतीय नागरिकाच्या मनात शंका असता कामा नये. मात्र, ही माहिती ज्या पद्धतीने समोर येते आहे आणि ती प्रशासनाच्या समोर येण्याआधीच माध्यमांत पसरते आहे ते लक्षात घेता तिच्या हेतूंविषयी शंका घेतली जाऊ शकते.
अर्थात, आपल्या जातीय आणि धार्मिक समूहांचे खरे प्रश्न हाती न घेता त्यांना फितवून त्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणा-या कट्टर हिंदू आणि मुस्लिम संघटनांचा बंदोबस्त करण्याची खरी वेळ आली आहे. आजच्या जागतिकीकरणात देशातील तरुण पिढी सर्वांना समान संधी आणि भेदभावमुक्त आयुष्याचे स्वप्न पाहत असताना देशाला मागे नेणा-या घटना सतत समोर येत आहेत. एक संभ्रमाचे वातावरण सतत तयार केले जाते आहे. अशा संभ्रमात ‘मी’ आणि ‘आपण’ असे कोणीच पुढे जाऊ शकत नाही हे आपल्या देशातील धुरीणांना कळेल तो सुदिन.