आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल आणि संघ (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध सुरू केलेला वाद, एकदा माघार घेतल्यानंतर पुन्हा सुरूठेवण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. महात्मा गांधींच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता, असे राहुल गांधी निवडणूक प्रचारात म्हणाले. हा प्रचार नवीन नाही. महात्माजींचे मारेकरी, अशी संघ परिवाराची प्रतिमा काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर बनवली आणि त्याला मुलामा देण्याचे काम वर्षानुवर्षे काँग्रेस डाव्या पक्षांनी सुरू ठेवले. याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न संघाकडून फारसा झाला नाही.
एक तर माध्यमे, चर्चा, वादविवाद यापासून फटकून राहण्याची संघाची संस्कृती आहे. बौद्धिक सव्यापसव्य संघाला झेपत नाही. संघाला माध्यमांमध्येही कुणी पुसत नव्हते. वादविवादांपेक्षा चिवटपणे काम करत राहण्याचा मार्ग संघाने स्वीकारला. या चिवटपणाचे फळ संघाला मिळाले संघ स्वयंसेवक असल्याचे अभिमानाने सांगणारी व्यक्ती पंतप्रधानपदी निवडून आली. याबरोबर संघाचा आत्मविश्वास वाढला. महात्माजींचे मारेकरी ही हेटाळणी थांबवली पाहिजे, अशा भावनेतून राहुल गांधींच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली. तक्रारदार कुंटे यांनी चिवटपणे विषय लावून धरल्याने न्यायालयाने राहुल गांधींवर नोटीस बजावली आणि तो राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला. निवडणुकीतील प्रचार कधी कसा अंगाशी येईल, हे सांगता येत नाही. प्रचारातील १५ लाख रुपये मोदींची झोप आजही उडवत आहेत. तोच प्रकार राहुल गांधींबाबत झाला. प्रकरणाने गंभीर वळण घेतल्यावर खटला टाळण्यासाठी राहुल गांधींचा आटापिटा सुरू झाला; पण त्यातून सुटका होईना. शेवटी मागील आठवड्यात त्यांनी माघार घेतली महात्माजींच्या हत्येशी संघाचा संबंध नसल्याचे कबूल करून खटल्यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, राहुल गांधी यांनी तसे प्रतिज्ञापत्रक लिहून द्यावे, असा आग्रह याचिकाकर्त्यांकडून धरण्यात आला. याला राहुल गांधी तयार झाले नाहीत. दरम्यान, राहुल गांधींची शरणागती ही काँग्रेसच्या आजपर्यंतच्या प्रतिमेला तडा देणारी आहे या शरणागतीचा वापर संघ प्रशस्तिपत्रकाप्रमाणे करील, अशी धास्ती काँग्रेस नेत्यांना वाटू लागली. संघावर तुटून पडणारे डावे टीकाकारही अस्वस्थ झाले. संघविरोध ही राजकीय अपरिहार्यता आहे, असे राहुल गांधींच्या लक्षात आले त्यांनी पुन्हा घूमजाव करून संघाविरोधात न्यायालयीन लढा लढण्याचा निर्धार केला आहे. राहुल गांधींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेस नेत्यांना हायसे वाटले. कपिल सिब्बल यांच्या चेहऱ्यावरून ते लक्षात येत होते.

राहुल गांधींचा हा निर्णय एका बाजूने अतिशय योग्य आहे. महात्माजींच्या हत्येमागे खरोखर कोण होते याबाबत तटस्थ निर्णय पुन्हा एकदा न्यायालयाद्वारे मिळू शकेल. संघाचा त्यामध्ये हात नाही, असे न्यायालयाने पूर्वी स्पष्ट केले आहे. ऐतिहासिक पुरावे तसेच सांगतात. नथुराम गोडसेंवर चालवलेल्या खटल्याची कागदपत्रेही ही वस्तुस्थिती मांडतात. मात्र, इतिहास हा प्रवाही असतो. नवी माहिती, नवी कागदपत्रे पुढे येत असतात. त्यांची छाननी होऊन काही नवे पुरावे पुढे आले गांधी हत्येमधील संघाची भूमिका नव्याने तपासता आली तर त्याचे स्वागत केले पाहिजे. न्यायालयात ही परीक्षा होणार असल्याने त्याच्या तटस्थेबद्दल शंका राहणार नाही. इतिहासाचे नव्याने परीक्षण करण्याची संधी नव्या पिढीला मिळेल. समजा तसे झाले नाही आणि संघाचा हात नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले तर इतिहासाचा बेजबाबदार वापर करण्याला आळा बसेल. तेव्हा निर्णय काहीही झाला तरी तो समाजस्वास्थ्यासाठी उपयोगी ठरेल. मात्र, या घूमजावमधून राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या मर्यादाही उघड होतात. देशातील बदलता समाज, बदलते वारे, बदलता काळ याचे भान काँग्रेसला राहिले नसल्याचे यातून दिसते. भाजपला कशा रीतीने राजकीय उत्तर द्यावे हे काँग्रेसला उमजत नाही. महात्मा गांधींच्या हत्येत संघाचा सहभाग होता की नव्हता, असल्या प्रश्नात सध्याच्या भारतातील दहा टक्के लोकांनाही रस नाही. आजच्या भारताचे प्रश्न वेगळे आहेत. अग्रक्रम वेगळे आहेत. नेहरू काळातील स्क्रिप्ट घेऊन आजची लढाई खेळण्यास राहुल गांधी त्यांचे सल्लागार निघाले आहेत. संघाच्या विरोधात नेहरूंनी जोरदार आवाज उठवला होता. काँग्रेसमधील हिंदुत्ववाद्यांना रोखण्यासाठी त्यांनी याचा कल्पकतेने वापर केला. मात्र, नेहरू स्वत: पंडित होते. त्यांना स्वत:चा विचार होता लोकांवर त्यांचे अधिराज्य होते. राहुल गांधींकडे स्वत:चा विचार नाही. इतिहासाचा अभ्यास नाही. डाव्या टीकाकारांच्या कुबड्या घेऊन वैचारिक लढा देण्यास ते निघतात अडचणीत सापडतात. देशातील मोठा वर्ग काँग्रेसबद्दल आजही आस्था बाळगून आहे. मात्र, त्यांना काँग्रेसच्या नेतृत्वात कल्पकता चमक दिसत नाही. कल्पकतेची दिवाळखोरी हे काँग्रेसचे दुखणे आहे. या दिवाळखोरीमुळेच कारभारात कमी असूनही मोदींच्या लोकप्रियतेत फार घट झालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...