आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखलखीत विजय (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिससारख्या खेळात प्रबळ इच्छाशक्तीच्या जोडीला प्रचंड शारीरिक तंदुरुस्ती लागते. जेथे वाढते वय हे प्रतिस्पर्धी खेळाडूपेक्षाही आव्हानात्मक असते अशा वेगवान, दररोज नवनव्या शोधांनी आणि प्रयोगांनी बदलणाऱ्या टेनिस खेळावर सेरेना विल्यम्स तब्बल १६ वर्षे अधिराज्य गाजवत आहे. १९९९ ला वयाच्या १७ व्या वर्षी यूएस अोपन स्पर्धा जिंकून पहिली ग्रँड स्लॅम ट्रॉफी घरात नेणाऱ्या सेरेनाने शनिवारी विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद सहाव्यांदा पटकावले. वयाच्या ३३व्या वर्षी विम्बल्डनसारखी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती पुरुष व महिलांमधील एकमेव खेळाडू आहे. टेनिसमध्ये पादाक्रांत करण्यासारखे कोणतेही शिखर सेरेनाने शिल्लक ठेवलेले नाही. तरीही काही गोष्टी सिद्ध करण्यासाठी ती पुन्हा पुन्हा टेनिस कोर्टवर येते. या वेळी सेरेना विम्बल्डन कोर्टवर आली ती स्टेफी ग्राफच्या सहाव्या विम्बल्डन विजेतेपदाची आणि २२ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्यासाठी. ती म्हणते की, जोपर्यंत खेळाचा आनंद लुटता येतो, खेळण्यात रस, मजा वाटते, तोपर्यंतच खेळत राहणार. लॉस एंजलिसच्या एका उपनगरात, सतत टोळीयुद्धाच्या संघर्षमय वातावरणात जन्मलेल्या सेरेनाच्या "डीएनए'मध्येच यशाचे अंश आहेत. अतिशय हलाखीचे दिवस असतानाही तिचे वडील रिचर्ड यांनी व्हीनस आणि सेरेना या आपल्या दोन्ही मुलींना जगातील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडू बनवण्याचे स्वप्न पाहिले. वयाच्या तिसऱ्या वर्षी सेरेनाने हातात शिकण्यासाठी पेन, पेन्सिल घेतली नाही तर टेनिस रॅकेट घेतले. शालेय अभ्यासक्रमाचे पाठ घरातच पार पडले. सेरेनासाठी शाळा, कॉलेज, विद्यापीठ हे टेनिस कोर्टच होते. यशाच्या सगळ्या पदव्या तिने टेनिस कोर्टवरच घेतल्या. शेतमजूर म्हणून काम करणारे तिचे वडील रिचर्ड यांच्याकडे मुबलक पैसा नव्हता. मात्र मुलींना यशस्वी होताना पाहण्याची जबरदस्त इच्छाशक्ती होती. त्यांनी टेनिसची पुस्तके आणि जुने व्हिडिओ आणून सेरेना व व्हीनस या अापल्या मुलींना सतत दाखवले. कॉम्प्टन येथे स्थलांतर करण्याचा रिचर्ड यांचा निर्णयही या दोघींच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. प्रशिक्षक परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे रिचर्ड स्वत: मुलींबरोबर सराव करायचे. १० वर्षांखालील मुलींमध्ये अमेरिकेतील पहिले रँकिंग सेरेनाला मिळाल्यानंतर रिचर्ड यांनी फ्लोरिडाला जाण्याचे धाडस केले. त्यामुळे त्यांची प्रशिक्षकाची जबाबदारी कमी झाली, मात्र मुलींसमवेत व्यवस्थापक म्हणून ते कायम राहिले. चार वर्षांतच सेरेना व्यावसायिक टेनिसपटू बनली. ३०४ वरून तिने जागतिक टेनिस क्रमवारीत ९९ वर झेप घेतली. प्युमा शू कंपनीबरोबरचा सव्वा कोटी डॉलरचा करार विल्यम्स कुटुंबीयांचे भवितव्य बदलणारा ठरला. १९९९च्या यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सेरेनाने आपली बहीण व्हीनस हिला हरवले आणि विल्यम्स कुटुंबीयांच्या घरात पहिली ग्रँड स्लॅम ट्रॉफी आली. त्यानंतरच्या १६ वर्षांत सेरेना फक्त खोऱ्याने पैसा कमावत राहिली आणि विजेतेपद, ट्रॉफीज यांचे ढीगच्या ढीग घरात साचायला लागले. टेनिस या खेळात सेरेनाने स्वत:ची शैली आणली. पॉवर गेमची सम्राज्ञी म्हणून लोक तिच्याकडे पाहू लागले आहेत.
सेरेना प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीतून आली असली तरीही तिच्या मायदेशी अमेरिकेत टेनिस या खेळासाठी पोषक वातावरण होते. अत्याधुनिक सुविधा होत्या आणि दर्जेदार आजी-माजी खेळाडूंची रेलचेल होती. भारताच्या सानिया मिर्झासाठी मात्र असे काहीच नव्हते. क्रिकेट या खेळाचे फाजील लाड करणाऱ्यांच्या देशात ती जन्मली. मुंबईत जन्मलेली सानिया वयाच्या ६ व्या वर्षापासून टेनिसपटू महेश भूपतीचे वडील सी. के. भूपती यांच्याकडे टेनिसचे धडे गिरवायला लागली. सानियाचे वडील इम्रान मुंबईच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळायचे; मात्र मुलीसाठी त्यांनीही भरपूर वेळ दिला. स्टेफी ग्राफ ही सानियाचा आदर्श होती. यंदाचे विम्बल्डन महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावून सानियाने भारतीय टेनिसमध्ये नवा अध्याय लिहिला. जागतिक टेनिस क्रमवारीत टॉप २० मध्ये येण्याचे ध्येय बाळगणाऱ्या सानियाची एकहाती झुंज सुरू आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिचे स्वप्न सेरेना विल्यम्सने तिसऱ्या फेरीत पराभूत करून भंग केले. मात्र सेरेनाला तिने दिलेली झुंज पाहिल्यानंतर अनेकांनी सानिया परिपक्व टेनिसपटू झाल्याचे म्हटले. टेनिसतज्ज्ञांचे हे शब्द अल्पावधीत खरे ठरले. ऑस्ट्रेलियन ओपनमधून परतल्यानंतर सानियाने हैदराबादमध्येच जागतिक महिला टेनिस असोसिएशनचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर तिने दुबई टेनिस स्पर्धा जिंकताना तर यंदाची अमेरिकन ओपन जिंकणाऱ्या स्वेटलाना कुझनेत्सोवाला हरवून तमाम टेनिस विश्वाला हादरवून टाकले. सानियाने शनिवारी विम्बल्डन महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले व असा मान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. प्रचंड मेहनत व दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्या बळावर विजयश्री मिळवणाऱ्या सेरेना व सानिया यांचे लखलखीत यश मनाला सुखावून जाणारे आहे.