Home | Editorial | Columns | editorial stadium article

क्रीडा संकुलात हवा सिंथेटिक ट्रॅक

diyya marathi team | Update - Jun 04, 2011, 04:34 AM IST

आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! अशी अवस्था सध्या औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलाची झाली आहे. 1993 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे.

 • editorial stadium article

  आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! अशी अवस्था सध्या औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलाची झाली आहे. 1993 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. येथे अद्ययावत क्रीडा सुविधा नाहीत, धावपटूंसाठी सिंथेटिक ट्रॅक नाही. आहे ते एक भलेमोठे पॅव्हेलियन. विभागीय क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांच्या सोई-सुविधा असताना, क्रीडा प्रेक्षागृह, क्रीडा संकुल असूनही राष्ट्रीय शालेय स्पर्धादेखील छावणीतील मैदानावर घ्याव्या लागतात, असा हा अजब प्रकार आहे.
  1993 मध्ये औरंगाबादचे क्रीडा संकुल मंजूर होऊन संकुलाचा प्रत्यक्ष आराखडा तयार होण्यास 2005 वर्ष उजाडलं. बजेट 16 कोटींवरून 24 कोटींवर गेले. काम सुरू झाले. औरंगाबादकरांना वाटलं, आपल्याला हक्काचे मैदान मिळणार, ज्यावर जिल्ह्याचे धावपटू तयार होतील. आंतरराष्ट्रीय पदक विजेते घडतील. ट्रॅकसाठी फक्त पाया रचला गेला. 10 लेनचा अँथलेटिक्स ट्रॅक घडायला लागला; पण अज्ञानाची झापडं लावलेल्या सरकारी दृष्टीला या ट्रॅकपेक्षा क्रीडा प्रेक्षागृह महत्त्वाचे वाटले. ट्रॅक अर्धवट अवस्थेत ठेवून पॅव्हेलियन, प्रेक्षागृह अशा बांधकामांवर निधी खर्च झाला. त्या वेळी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकची किंमत होती 3.3 कोटी रुपये. आज ही किंमत 7 कोटी झाली आहे. आणखी विलंब झाला की हीच किंमत आणखी वाढणार आहे.
  मराठवाडा क्रीडा गुणवत्तेच्या बाबतीत समृद्ध आहे. दुर्दैवाने या विभागाला अत्याधुनिक क्रीडा सुविधा मिळाल्या नाहीत. क्रीडा सुविधा नसल्यामुळे दर्जेदार मार्गदर्शकही उपलब्ध नाहीत. क्रीडा सुविधांनी सुसज्ज अशी क्रीडा संकुले असती तर मराठवाड्यातील क्रीडा गुणवत्ता पुण्या-मुंबईकडे सरकली नसती. औरंगाबाद जिल्हय़ाच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या क्रीडा संकुलावर सराव करता येत नाही. सिंथेटिक ट्रॅक नसल्यामुळे मुले मुंबई-पुण्याकडे सरावासाठी जातात. राज्य शासनाने विभागीय क्रीडा संकुलासाठी पुरेसा निधी उपलब्ध केला होता; पण प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचे ते स्थानिक सरकार दरबारातील संबधितांना त्या वेळी कळलेच नाही. त्यामुळे सिंथेटिक ट्रॅक आणि अन्य क्रीडा सुविधा प्राधान्याने उभ्या करण्याऐवजी तेथे बिल्डिंग उभी राहिली, क्रीडा प्रेक्षागृह तयार झाले, स्टॅन्डस् बांधण्यात आले. काँक्रिट जंगल उभे राहिले. मराठवाड्याची युवा पिढीही त्यामुळे ऑलिम्पिक विजेते होण्याचे स्वप्नही पाहू शकली नाही. हरिश्चंद्र बिराजदारने गोकुळ उस्ताद तालीम उभी करून मराठवाड्यातील तरुणांना सरावाची संधी उपलब्ध करून दिली. एकलव्याच्या निष्ठेने काका पवारने मराठवाड्याच्या मातीतली आखाड्यातील गुणवत्ता पुण्यानजीक जाऊन पुढे आणण्याचे प्रयत्न केले. अन्य खेळांना असे बिराजदार, काका पवार फारसे मिळाले नाहीत. कालपरवा परभणीतील ज्योती गवते या मुलीने पुण्यात झालेली आशियाई मॅरेथॉन जिंकली. गुणवत्ता या विभागात ठासून भरल्याचे हे द्योतक आहे. व्हॉलीबॉल संघटक शिवाजीराव नलावडे याच विभागातले, औरंगाबादचे जिम्नॅस्टिक्स या खेळाचे संघटक सुधीर जोशी अत्याधुनिक सराव सुविधांपासून वंचित राहिले. त्यांना अत्याधुनिक सोयी-सुविधा विभागातच मिळाल्या असत्या तर वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.
  तलवारबाजीत हैदराबाद नॅशनल्समध्ये रौप्यपदक पटकावणारी शोभना लाटे, माणिक रानडे, दिगंबर जाधव हे राष्ट्रीय कबड्डीपटू, छत्रपती पुरस्कार विजेती कबड्डीपटू आशा गायकवाड ही सारी क्रीडा दौलत याच विभागातील.
  भालाफेकीची राष्ट्रीय विजेती प्राची पाटील औरंगाबादचीच. वॉकथॉनमध्ये नॅशनल रँकिंग असणारा अनिल मोरे, 400, 200 मीटर्सचा धावपटू अजितकुमार रियांग ही आजची औरंगाबादची युवा पिढी आपल्या विभागातील क्रीडा सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. आज औरंगाबादचे विभागीय क्रीडा संकुल कार्यरत असते तर सरावासाठी वेगवेगळ्या खेळांतील क्रीडापटूंना बाहेर जावे लागते नसते. छावणीतील बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल मदतीचा हात देते; परंतु 1993 मध्ये मंजूर झालेले जनतेचे हक्काचे संकुल मात्र 2011 मध्येदेखील उपयोगी पडत नाही, ही शोकांतिका आहे.
  विभागीय आयुक्त आणि क्रीडा उपसंचालक यांनी आता तरी जागे होऊन सिंथेटिक ट्रॅक तातडीने बसविण्यासाठी हालचाल करणे आवश्यक आहे. बॅडमिंटन, हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो आदी खेळांसाठी तत्काळ अत्याधुनिक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक आणि प्रशिक्षण या दृष्टीने सरावाच्या संधी उपलब्ध होणे ही औरंगाबाद क्रीडा संकुलाची तातडीची गरज आहे. तरच येथील उदयोन्मुख क्रीडापटूंना सरावाची संधी मिळेल. दर्जेदार क्रीडा प्रशिक्षक येथे मार्गदर्शनासाठी येऊ शकतील. मराठवाड्याबाहेर सरावासाठी, संधीसाठी जाणारी क्रीडा गुणवत्ता तरच थोपविता येईल.

  विनायक दळवी

Trending