आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण प्रक्रियांना दिशा देण्याचे आव्हान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय प्रजासत्ताक राष्‍ट्राचे राष्‍ट्रपती होण्याचे भाग्य ज्या महान शिक्षकास लाभले, ते थोर तत्त्वचिंतक, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन संपूर्ण देशभरात शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
महात्मा जोतिबा फुले, आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, साने गुरुजी, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील आदी शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांचे कार्य वंदनीय आणि अनुकरणीय आहे. आजच्या शिक्षकदिनी योग्य विचार केल्यास आजची शिक्षणपद्धती अथवा परिस्थिती दीन झाल्यासारखी जाणवते. कारण आजचे शिक्षण ठिगळ लावलेल्या गोधडीसारखे वाटू लागते. आजची शिक्षण व्यवस्था अशाच थोर शिक्षणमहर्षीच्या विचारांपासून दुरावत चालली आहे, असेच राहून राहून वाटते. राज्याचे शिक्षणमंत्री बदलले की नवीन शिक्षण प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेमध्ये वैचारिक प्रगल्भतेऐवजी अवमूल्यनाचेच जास्त वास्तव जाणवू लागते.


सन 2010-11 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती अमलात आली. या इयत्तांमधील मुला-मुलींना दरवर्षी ढकलले जाणार याची हमी शिक्षण प्रक्रियेने घेतली आहे. यामुळे आपण आठवीपर्यंत नापासच होणार नाही, ही मानसिकता त्यांच्यात निर्माण होत आहे. त्यामुळे ते ज्या मूल्यमापन प्रक्रियेला कशा प्रकारे प्रतिसाद देत असतील, हा एक संशोधनाचाच विषय आहे. कारण आज जरी नोकरीमुळे शिक्षक उघडपणे बोलत नसले तरी एखाद्या वर्गामध्ये पन्नास-शंभर किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्गसंख्या असलेल्या वर्गासाठी सातत्यपूर्ण मूल्यमापन प्रक्रियाची अंमलबजावणी करणे किती अवघड आहे किंवा ते कशी करतात, हे तेच जाणोत.
सात-आठ महिन्यांपूर्वी एक वृत्त वाचनात आले होते की, एका स्वयंसेवी संस्थेने ग्रामीण भारतातील व महाराष्ट्रातील ढासळलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेचा अहवाल सर्वेक्षणातून सादर केला होता. या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, गणितातील बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणे अजून करताच येत नाहीत.

पाचवीत गेलेल्या मुलांना दुसरीचे धडे वाचता येत नाहीत. अशी एकंदर परिस्थिती आहे. दुर्दैवाने असे म्हणावे वाटते की, अनेक मुले प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत किती इयत्ता मागे आहेत, की अजून जन्माला यायचे आहेत हे पाहावे लागेल. अर्थात यात शिक्षकांचा काहीच दोष नाही. तो शिक्षण प्रक्रियेचा आणि अंमलबजावणीचा दोष आहे. आजच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेपेक्षा शिक्षण पोषक प्रक्रि येची गरज आहे. कारण या मुलांचे शिक्षण स्लो लर्नरप्रमाणे हळूहळू चालले आहे की काय, असे या प्रक्रियेमुळे वाटत आहे.


शिक्षण प्रक्रियेतील सतत बदल करताना आपण विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या भवितव्याचा विचार करत नाही का? असे वाटू लागते. शिक्षण प्रक्रियेत आपण शहरी आणि ग्रामीण शैक्षणिक सुविधांचा विचार करणार आहोत का? त्यानुसार शैक्षणिक कार्यक्रमांचा अंतर्भाव करणार आहोत का? इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंत नापास न झालेला विद्यार्थी नववीत गेल्यानंतर नापास शब्दाचे ओझे त्याला पेलवेल काय?


हाच विद्यार्थी पुढे चालून आताचा घसरणारा रुपया सावरण्याचे कौशल्य दाखवू शकेल काय? विविध स्पर्धा परीक्षांपुढे टिकाव धरू शकेल का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आताच्या शिक्षण प्रक्रियेमुळे विचार करायला लावणारे आहेत. कारण यापूर्वीची परीक्षा पद्धती मुला-मुलींना अभ्यास करायला लावणारी आहे, परंतु काही तज्ज्ञांच्या मते, ज्ञानाचे उपयोजन सातत्याने न झाल्याने वर्षअखेरीस तणाव निर्माण करणारी होऊ शकते, परंतु आताची सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीच्या सरसकट अंमलबजावणीमुळे हुशार मुलांची कुचंबणा होते. शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळा लवकर भरवून सात ते आठ तास त्यांना शिक्षण प्रक्रियेत ठेवायचे हे बालमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचे बालपणच हिरावून घेतल्यासारखे वाटते. शिक्षकदिनी दीन शिक्षण प्रक्रियेचे विचारमंथन व्हावे आणि सर्व शिक्षकांना स्वायत्तपणे, मुक्तहस्ते विद्यादान करून देशाचे भवितव्य घडवण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे.