आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकिया युगाची अनपेक्षित अखेर ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलची बाराखडी शिकवणा-या, विश्वासार्ह आणि टिकाऊ म्हणून ओळखल्या जाणा-या नोकियाला भारतीय ग्राहक सहजासहजी विसरणार नाही. रंजक इतिहास असलेल्या नोकियाची स्थापना खाणकाम अभियंता फ्रेडरिक इडेस्टॅम आणि लिओ मिशेलिन यांनी 1865 मध्ये केली. फिनलंडस्थित फिनिश रबर वर्क्स आणि फिनिश केबल वर्क्स या कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ‘नोकिया कंपनी’ ची स्थापना करण्यात आली.


मोबाइलच्या जगात क्रांती घडवून बाजारपेठेत अव्वल असणारी नोकिया मायक्रोसॉफ्टच्या खरेदीमुळे धक्कादायकरीत्या कालातीत होणार आहे. 2007 मध्ये जागतिक बाजारपेठेत नोकियाचा 40 टक्के हिस्सा होता. 2003 मध्ये आलेले नोकियाचे 1100 मॉडेल प्रचंड लोकप्रिय ठरले. या मॉडेलचे 250 दशलक्ष मोबाइल जगभरात विकले जाऊन जगातील सर्वात लोकप्रिय ग्राहकोपयोगी उत्पादन ठरले. मात्र, नवीन तंत्रज्ञानावर आधारित सॅमसंग आणि अ‍ॅपलच्या नावीन्यतेपुढे नोकियाचे बाजारपेठेतील स्थान डळमळीत झाले. टॅब्लेटच्या स्पर्धेत न उतरल्यामुळे नोकियाला प्रचंड नुकसान सोसावे लागले. 40 टक्क्यांवरून बाजारपेठेतील हिस्सा 12 टक्क्यांवर आला. स्पर्धेच्या बाबतीत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र विकसित करू शकण्याच्या क्षमतेमुळे अ‍ॅपलचे ग्राहक उत्पादनाच्या बाबतीत डोळे झाकून शपथदेखील घेऊ शकतात.

गुगल अ‍ॅँड्रॉइडच्या ओपन प्लॅटफॉर्ममुळे गुगलचे स्वतंत्र असे पर्यावरण तयार झाले आहे. मात्र, नोकियाच्या बाबतीत तसे होऊ शकले नव्हते. मायक्रोसॉफ्ट आणि नोकियाच्या एकत्र येण्याने भविष्यात अशी विश्वासार्हता आणि पर्यावरण मायक्रोसॉफ्ट विकसित करू शकेल. नोकियाच्या स्वस्त आणि कमी स्मार्ट असलेल्या फोन्सच्या ‘कनेक्टिंग पीपल’ बाजारपेठेलाही विसरून चालणार नाही. गार्टनर रिसर्चचा संदर्भ घेतल्यास यावर्षाच्या दुमाहीत 435 दशलक्ष मोबाइल फोन जगभरात विकले गेले. त्यापैकी 225 दशलक्ष फोन्स हे स्मार्ट फोन होते. या क्षेत्रात यावर्षी 46.5 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. उरलेले 210 दशलक्ष फोन्स हे फिचर फोन्स होते. त्या क्षेत्रात यावर्षी 21 टक्क्यांची घट दिसून आली आहे. याचाच अर्थ फिचर फोन वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनकडे वळत आहेत. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित लुमिया स्मार्ट फोन श्रेणीत हव्या त्या वेगाने वाढ होऊ शकली नाही, याच दुष्टचक्राचा नोकिया बळी ठरली.

वर्षानुवर्षे फिचर फोन वापरत असलेल्या नोकियाच्या ग्राहकांना अ‍ॅपल आणि अ‍ॅँड्रॉइडने पुरेशा अद्ययावत तंत्रज्ञानाअभावी आपल्याकडे वळवले. त्याच ग्राहकांना नोकिया परिवारात पुन्हा आणण्यासाठी स्पर्धकांऐवजी मायक्रोसॉफ्टचा स्मार्टफोन विकत घेण्याची हाक मायक्रोसॉफ्टला द्यावी लागेल. निल्सनच्या सर्वेक्षणानुसार फिचर फोन्सना भारतीय बाजारपेठेत अजूनही चांगला उठाव आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी मायक्रोसॉफ्टला युद्धपातळीवर योजना राबवाव्या लागतील. अ‍ॅपलही या येत्या काही महिन्यांत स्वस्तातले स्मार्टफोन्स बाजारपेठेत उतरवणार आहे.


नोकिया आशा आणि लुमियाच्या यशस्वी पार्श्वभूमिवर मायक्रोसॉफ्ट-नोकिया यांच्यातल्या व्यवहाराने अनेक नोकियाप्रेमींचा हार्टब्रेक झाला असेल. 2013 मध्ये नोकियाने लुमिया श्रेणीतील सर्वोत्तम व 41 मेगापिक्सलचे असे 1020 मॉडेल बाजारात आणले त्याच बरोबर सर्वात स्वस्त असा 15 युरो किमतीचा फोन बाजारात आणला, परंतु असे असले तरी या दोघांतला व्यवहार पाहता मायक्रोसॉफ्टने नोकियाची डिव्हाइस आणि सर्व्हिस डिव्हिजन विकत घेतली आहे. नोकिया हे ब्रँड नेम विकले गेलेले नाही. नोकियाचे ब्रॅँडिंगचे हक्क स्वत:कडेच सुरक्षित आहेत. नोकिया आशा आणि लुमिया यशस्वी ठरले असले तरी नोकियाकडे फोनचे उत्पादन करण्याचा हक्क उरलेला नाही. नोकियाच्या या अनपेक्षित माघारीमुळे मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपलमध्ये जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे.


पूर्वी फक्त कॉम्प्युटरवर आधारित असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि अ‍ॅपलच्या मॅकिन्टोश (मॅक) ऑपरेटिंग सिस्टिममध्ये स्पर्धा होती ती स्मार्टफोन्सच्या निमित्ताने पुन्हा सुरू होऊन मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपल परत आमनेसामने येतील. गुगलची स्वत:ची मोबाइलवर आधारित अ‍ॅँड्रॉइड सिस्टिम असली तरी हार्डवेअर विकसित करून‘गुगलनेक्सस’ द्वारे स्मार्टफोन्सच्या बाजारपेठेत गुगल उतरली आहे, परंतु असे असले तरी कॉम्प्युटरवर आधारित ऑपरेटिंग सिस्टिम गुगल विकसित करू शकलेले नाही. कॉम्प्युटरवर आधारित ऑपरेटिंग सिस्टिमची बाजारपेठ पाहता गुगलच्या महसुलात यामुळे मोठी तफावत निर्माण होऊ शकते. स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम व त्याचबरोबरीने तिला पूरक अशी पर्यावरण व्यवस्था विकसित करणे हे या क्षेत्रातील सर्वच कंपन्यांना आता गरजेचे झाले आहे. जो हे करणार नाही त्याचा निभाव लागणे कठीण आहे. नोकियाच्या उदाहरणाने हे
स्पष्ट झाले आहे.