आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा महिन्यांच्या नावाची...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन राष्ट्रांचा संबंध येतो तेथे दोन्ही देशांत वापरले जाणारे कॉमन कॅलेंडर म्हणजे इंटरनॅशनल कॅलेंडर, जे जानेवारी ते डिसेंबर हे आहे. या कॅलेंडरला ख्रिश्चन कॅलेंडर म्हणतात. कारण ही कालगणना येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित आहे. सध्या 2012 वे वर्ष सुरू आहे. म्हणजे येशूचा जन्म होऊन 2012 वर्षांचा काळ उलटला आहे. म्हणूनच इसवी सन व ख्रिस्तपूर्व (अ.उ. व इ.उ.) हे शब्द अस्तित्वात आले आहेत. या कॅलेंडरला रोमन कॅलेंडरही म्हणतात. कारण या कॅलेंडरला सध्याचे स्वरूप रोमन सम्राटांनी दिले आहे. प्रत्येक महिन्याचे नाव व त्यातील दिनसंख्या या सम्राटांनीच ठरवली. या कॅलेंडरचे सर्वात समर्पक नाव आहे - ज्युलियस कॅलेंडर. कारण हे कॅलेंडर तयार करण्यासाठी रोमन सम्राट ज्युलियस सीझरचा पुतण्या ऑक्टोव्हियस (ऑगस्टस) सीझरचेदेखील भरपूर योगदान आहे. आपल्या देशात हे कॅलेंडर इंग्लिश राज्यकर्त्यांनी आणले. त्यांनी येथे राज्यकारभार त्या कॅलेंडरनुसार चालवला. त्यामुळे आपला या कॅलेंडरशी परिचय झाला. वर्षाच्या पहिल्या महिन्याला जान्युअरी हे नाव देण्यामागे मोठा गमतीदार तर्क आहे. हे नाव जेनस या रोमन देवतेच्या नावावरून घेण्यात आले आहे. जेनसकडे स्वर्गाच्या द्वारपालाचे काम आहे.
स्वर्गाचा आरंभ या प्रवेशद्वाराने होतो म्हणून वर्षाचा आरंभ होणा-या पहिल्या महिन्यास जेनसचे नाव देण्यात आले. फेब्रुअरी या दुस-या महिन्याच्या नावाचे मूळ फेब्रुआ या शब्दात आहे. रोमन लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण असणारी शुद्धीकरण मेजवानी (Feast of Purification) फेब्रुआ या नावाने ओळखली जायची. ही मेजवानी या काळात साजरी व्हायची म्हणून या महिन्याला फेब्रुअरी हे नाव मिळाले. मार्च महिन्याचे नाव मार्स या रोमन देवतेच्या नावावरून आले आहे. मार्स म्हणजे मंगळ ग्रह. ही रोमन लोकांची युद्धदेवता आहे. मार्स देवतेविषयी आदर व्यक्त करण्यासाठी तिच्या नावाचा एक महिना आहे. एप्रिल हे नाव एप्रिलस शब्दापासून आले. प्राचीन रोमन भाषेत (लॅटिन) एप्रिलस शब्दाचा अर्थ आहे - आरंभ होणे. वर्षातील सर्वात सुखद व आनंददायक ऋतू - वसंत. तो या काळातच आरंभ होतो म्हणून या महिन्याचे नाव एप्रिल असे आहे. मे हे नाव मेया या रोमन देवतेशी संबंधित आहे. ही देवता अ‍ॅटलास देवाची मुलगी आहे. रोमन लोक असे मानायचे की सबंध पृथ्वीचा भार अ‍ॅटलास या देवाने आपल्या खांद्यावर पेलला आहे. मनुष्य प्राण्यासाठी एवढे करणा-या देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणून एका महिन्याला या देवाच्या मुलीचे नाव देण्यात आले.
स्वर्गातील सर्वांचा आवडता देवदूत - मर्क्युरी हा मेया देवतेचाच मुलगा आहे. जून हे नाव जुनो देवतेपासून आले आहे. पूर्वीच्या कॅलेंडरप्रमाणे जुलै हा पाचवा महिना. त्यामुळे पाचवा या अर्थाचा रोमन भाषेतील शब्द हेच या महिन्याचे नाव होते. पण नवीन कॅलेंडरप्रमाणे हा सातवा महिना झाला व त्याचे नाव बदलणे आवश्यक झाले.नवीन कॅलेंडर तयार करणा-या रोमन सम्राट ज्युलियस सीझरला स्वत:चे नाव एका महिन्याला देण्याचा मोह आवरला नाही. त्याने आपले नाव या सातव्या महिन्याला दिले व तो महिना जुलै (ज्युलियसपासून) नावाने ओळखला जाऊ लागला. ज्युलियस सीझरनंतर त्याचा पुतण्या-ऑक्टोव्हियस सीझर रोमन सम्राट झाला. तो फार महत्त्वाकांक्षी होता व आपल्या काकाप्रामाणेच प्रत्येक क्षेत्रात महान बनण्याची त्याची इच्छा होती. त्याने आपले नाव बदलून ऑगस्ट ठेवले. रोमन भाषेत ऑगस्टस म्हणजे महान. या पुतण्याला त्याच्या काकापेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे राहायचे नव्हते म्हणून त्याने आपले नाव वर्षाच्या एका महिन्याला देण्याचे ठरवले. त्यानुसार ज्युलियस सीझरच्या जुलै महिन्यानंतरच्या महिन्यास ऑगस्ट हे नाव देण्यात आले. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या नावांमागे काही विशेष कारणे आढळत नाहीत. जुन्या कॅलेंडरमधील नावे तशीच ठेवण्यात आली आहेत. जुन्या कॅलेंडरचा आरंभ मार्च महिन्याने व्हायचा व त्यात जान्युअरी व फेब्रुअरी हे महिने नव्हते, त्यामुळे सप्टेंबर हा सातवा महिना असायचा, म्हणून त्याचे नाव सप्टेंबर Sepete (सप्तम) म्हणजेच सात या शब्दापासून आले. तसेच नंतरच्या आठव्या महिन्यापचे नाव Octa (अष्टम) म्हणजेच आठ या शब्दापासून आले आहे. याच पद्धतीनुसार नोव्हेंबरचे नाव (नवम - नऊ) व डिसेंबरचे नाव Deca (दशम - दहा)पासून आले आहे.