आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियासाठी सर्व काही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या घटकेला समाजावर नियंत्रण कुणाचे आहे? राजकीय नेते? आध्यात्मिक गुरू? सामाजिक वा सांस्कृतिक धुरीण? वा वलयांकित नट-नट्या की क्रीडापटू? अर्थातच यातील काही जणांकडे आजही समाजाच्या विशिष्ट वर्गांचे नेतृत्व आहे. त्यातील काहींना या वर्गांवर नियंत्रण ठेवणेही कमालीचे आवडणारे आहे. मात्र, नेतृत्व काही अंशी कायम असले तरीही या मंडळींच्या हातून नियंत्रणाचे दोर सुटत जाऊन ते आता टेलिव्हिजन मीडियाच्या हाती जात आहे. गेल्या दहा वर्षांतला वरवर न जाणवणारा, पण धोकादायक असा हा बदल आहे. आताशा समाजसमूहाने कसे वागावे, कसे व्यक्त व्हावे, कधी जल्लोष करावा आणि कधी नाराजीचे सूर आळवत निषेधाचे अस्त्र उगारावे, या संदर्भातल्या सगळ्या टर्म्स टेलिव्हिजन मीडिया डिक्टेट करू लागला आहे. एकप्रकारे, 24 तास बातम्यांची अव्याहत भट्टी सुरू केलेल्या न्यूज मीडियाला किरकोळ समाधानाच्या बदल्यात कच्चा माल पुरवण्याचे काम समाजाने आपखुशीने स्वीकारलेले दिसत आहे. न्यूज चॅनेल हा म्हटला तर आतबट्ट्याचा व्यवहार आहे.उपग्रहामार्फत कार्यक्रम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपग्रहाच्या वापराची प्रचंड मोठी किंमत चॅनेलला मोजावी लागते. म्हणूनच एकेका सेकंदाचा हिशेब करत जाहिरातदार मिळवण्याची कंपन्यांची सतत धडपड चाललेली असते; परंतु अपेक्षित प्रेक्षकवर्ग मिळाला नाही की जाहिरातदारही रस दाखवत नाहीत. जाहिरातीचा पैसा नाही मिळाला, की उपग्रहाचे भाडे परवडत नाही. अशा वेळी बातम्या घडण्याची प्रतीक्षा करण्यात व्यावहारिक शहाणपण असत नाही. मग चॅनेल विनाविघ्न चालावे, उपग्रहाचे भाडे वजा जाता नफा मिळावा, यासाठी बातम्या घडवून आणणे क्रमप्राप्त ठरत जाते.


एरवी, बातम्या घडवून आणण्याच्या कृतीचा सुबुद्ध समाजाने विरोध करणे अपेक्षित असते. परंतु, राजकीय नेते तसेच प्रशासन व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला, सर्वार्थाने निर्नायकी अवस्थेतला समाज हे चॅनेलच्या दृष्टीने आयतेच मिळालेले सावज ठरते. बातमी घडवू पाहणा-या मीडियाला विरोध करण्याचे बळ अशा समाजात असणे केवळ अशक्य असते. शासन-प्रशासन तुमच्यावर अन्याय करते, आम्हीच तुम्हाला न्याय देतो, हे कोणत्याही न्यूज चॅनेलचे अघोषित घोषवाक्य असते. अनेक प्रसंगांत व्यवस्थेवर वचक ठेवताना समाजातल्या उपेक्षितांना चॅनेलने आधार दिलेला असतो, समाजबदलाची नोंद घेतानाच अनेक परिचित-अपरिचित चेह-यांचा समयोचित सन्मानही केलेला असतो. परंतु, परांपरागत नायकांनी केलेल्या भ्रमनिरासानंतर अस्वस्थ समाजाने सारासार विचार न करता एका बेसावध क्षणी चॅनेलचे नेतृत्व मान्य करणे हाच मुळात सर्वात धोकादायक क्षण असतो. कारण, समाजाच्या भावनेला हात घालणारा एखादा कट्टरपंथी विद्वेषी नेता आणि तुमच्या सगळ्या समस्यांचे उत्तर आमच्याकडे आहे, असे भासवणारा टेलिव्हिजन मीडिया यात फारसा गुणात्मक फरक असत नाही.

शासन-प्रशासनावर दबाव आणण्याची क्षमता असलेल्या यापैकी कुणी लोकहितवादी मुखवटा धारण केलेला असला तरीही समूहावर वर्चस्व मिळवणे, सत्ता गाजवणे हाच बहुतेकांचा एकमेव छुपा अजेंडा असतो. पण, एकदा का या नेतृत्वाने समाजमनाचा ताबा घेतला की, सारासार विवेकबुद्धी गमावून बसण्यास फारसा वेळ लागत नाही. पुढे भावनातिरेकाच्या भरात झालेच तर नुकसान त्या समाजाचे होत राहते. फायदा मात्र त्या नेतृत्वाचा होत राहतो.
अर्थातच, आपल्या जगण्याचे नियंत्रण दुस-या कुणाच्या (पक्षी : टेलिव्हिजन मीडिया) तरी हाती असणे, ही सर्वात धोकादायक बाब ठरते. कारण हा मीडिया ‘एक्सायटिंग व्हिज्युअल्स’ मिळवण्यासाठी त्याला हवे तसे दृश्य घडवून आणण्यासाठी फूस देतो. त्यातूनच, इंधनाच्या किमती वाढल्या की सरकारला शिव्यांची लाखोली वाहिली जाते. बंदप्रसंगी जाळपोळीच्या घटना घडवून आणल्या जातात.

मीडियाच्या उपस्थितीने चेकाळून जाऊन पोलिसांच्या अंगावर हात टाकण्याचे प्रसंग घडतात. आपणच निवडून दिलेल्या (किंवा आपल्याच चुकांमुळे निवडून आलेल्या) नेत्यांच्या घरावर चाल करून जाण्याचे प्रकार घडतात. दहशतवाद्याला वा बलात्का-यांना भरचौकात फाशी देण्याची तारस्वरात मागणी होते. असे केल्याने न्याय मिळाल्याचा क्षणिक आभास निर्माण होतो. हे सगळे टेलिव्हिजन मीडियाला हवेच असते. पण हाच मीडिया इंधनाच्या किमती उतरल्यावर जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याच्या फंदात पडत नाही. हाच मीडिया राजकीय नेते भ्रष्टाचार करताहेत; पण यात त्यांना त्या जागी बसवण्यात चूक तुमची आहे, वा ऊठसूट फाशीच्या शिक्षेची मागणी करणे प्रत्येक वेळी न्यायाला धरून नाही, पाकिस्तानला संपवून टाकण्याची भाषा करणे म्हणजे आत्मनाश घडवून आणणे आहे, याची जनतेला जाणीव करून देत नाही. कारण, जनतेने विवेकबुद्धीचा वापर करणे हे मीडियाला व्यावसायिकदृष्ट्या कदापि परवडणारे नसते.


एकीकडे, टेलिव्हिजन मीडियाच्या दबावामुळेच सुस्तावलेल्या शासन-प्रशासनाला निर्णय घेणे भाग पडते, मस्तवाल नेते वठणीवर येतात, हा युक्तिवाद पटण्यासारखा असला तरीही मीडिया आपल्यासाठी आहे; आपण मीडियासाठी नाही, याचे समाजाचे सुटत चाललेले भान हीच यातली सगळ्यात धोकादायक बाब ठरते.