आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण जनभावनेचे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जनभावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन संज्ञा प्रथमदर्शनी अराजकीय तसेच समूहाची केवळ स्वभाव मागणी अधोरेखित करणा-या भासत असल्या तरीही त्यांच्या मुळाशी मात्र सशक्त असा राजकीय प्रवाह वाहत असतो. म्हणूनच जेव्हा एखादा समूह आपल्या जनभावना दुखावल्याचे भासवतो वा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाल्याचे उच्चरवात सांगतो, तेव्हा त्यामागे गटातटाने विशिष्ट हेतू नजरेपुढे ठेवून साधलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकारणाचाही भाग मोठा असतो. चित्रपट अभिनेता कमल हासन याच्या ‘विश्वरूपम’ या आगामी चित्रपटावरून जनभावना दुखावल्याचे भासवणारा समाजसमूह आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उच्चार करणारा कमल हासन वा त्याचे समर्थक यांच्यात सध्या होत असलेला संघर्ष हा केवळ समूह वा व्यक्तीचा भावनिक आदर राखण्याची मागणी करणारा नाही, तर विविध गटांचा राजकीय हेतू साध्य करणारा आहे.

नेहमीच दोन व्यक्ती वा गटांत होणारा वेगवेगळ्या पातळ्यांवरचा सत्तासंघर्ष राजकारणाला गती देत असतो. त्याचेच पडसाद संबंधितांच्या क्रिया-प्रतिक्रियांमधून उमटत असतात. कमल हासन हा व्यावसायिक चौकटीत राहून वेगवेगळे प्रयोग करणारा नट-दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ख्यातकीर्त आहे. या वेळी ‘विश्वरूपम’च्या निमित्ताने नवे व्यावसायिक धाडस त्याने साधले आहे. त्यापोटी त्याने तब्बल 95 कोटींची गुंतवणूक केल्याचे ऐकिवात आहे. हा चित्रपट आजवरच्या परंपरेनुसार चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होताच, परंतु नवा पायंडा पाडत एकाच वेळी छोट्या पडद्यावरच्या प्रेक्षकांनाही 500 ते 1000 रुपये मोजून ‘डीटीएच’च्या माध्यमातून घरबसल्या बघायला मिळणार होता. भविष्याचे सूतोवाच करणारी ही योजना वर्षानुवर्षे चालत आलेल्या वितरक-प्रदर्शकांची एकाधिकाशाही मोडत निर्माता म्हणून कमल हासनला एका दिवसात तब्बल 35 कोटींची कमाई करून देणारी होती आणि हाच खरे तर कमल हासन आणि वितरक यांच्यामधील संघर्षबिंदू होता. ही योजना हाणून पाडण्यासाठी एका बाजूला वितरकांनी ‘विश्वरूपम’ला थिएटरपर्यंत येऊ न देण्याचा जाहीर निश्चय केला होता, तर कितीही विरोध झाला तरीही तो मोडून काढत डीटीएच रिलीज करण्यावर कमल हासन ठाम होता. हा संघर्ष तीव्र होत चालला असतानाच अचानक एक दिवस ‘विश्वरूपम’मध्ये मुस्लिमांच्या भावना दुखावणारी दृश्ये असल्याची ठिणगी पडली आणि त्यानंतर प्रकरण न्यायालयात जाऊन संघर्ष टिपेला पोहोचला.

एखाद्या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावणे ही म्हटली तर आपल्याकडची नित्याचीच प्रतिक्रिया, परंतु ‘विश्वरूपम’संदर्भात ती तितकीशी स्वाभाविक ठरत नाही, ते कमल हासन आणि वितरकांमध्ये झालेल्या व्यावसायिक संघर्षाच्या पार्श्वभूमीमुळे. म्हणूनच चित्रपटाच्या थेट प्रक्षेपणावरून हासन आणि वितरकांमध्ये संघर्ष झालाच नसता, तर जनभावनेचा आता दिसतो तसा भडका उडाला असता का? आणि चित्रपट प्रदर्शनापूर्वीच न्यायालयीन निर्णय प्रक्रियेत रखडला असता का ? हे प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाहीत. म्हणजे, येथे जनभावना भडकल्या आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोचही झाला आहे, परंतु त्याहीपलीकडे जाऊन याला व्यावसायिक संघर्षाची अदृश्य किनारही आहे. म्हणूनच हासनची बाजू घेणा-या ंमध्ये दक्षिणात्य नट-नट्या वा बॉलीवूडचे कलावंत आघाडीवर असले तरीही तामिळ चित्रपटसृष्टीतून नाव घेण्याजोगे बडे वितरक -निर्माता-दिग्दर्शक आतापर्यंत तरी पुढे आलेले नाहीत. हासनला परस्पर व्यावसायिक अद्दल घडली तर यातील कुणालाही ते हवेच आहे.
अर्थात, कमल हासनचा व्यावसायिक स्पर्धक मानला जाणारा, परंतु हासनपेक्षा लोकप्रियतेच्या कसोट्यांवर कमालीचा उजवा ठरलेल्या रजनीकांतने हासनच्या समर्थनार्थ आवर्जून प्रतिक्रिया नोंदवली आहे. मात्र, त्याचा सूर कमल हासन हा देशातला सर्वात गुणी अभिनेता आहे. त्याने जनभावना दुखावणारी दृश्ये काढण्यास तयारी दर्शवली आहे. तेव्हा मुस्लिम बांधवांनी त्याला सहकार्य करावे, असा एखाद्या ‘बिग ब्रदर’ला शोभणारा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हासनच्या तुलनेत इंडस्ट्रीतले स्वत:चे महत्त्व अधोरेखित करणारा असा आहे. या सर्व संघर्षात ‘प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने’ सरकारची भूमिका नेहमीप्रमाणे सावध आहे. अशीच सावध भूमिका सत्ताधारी पक्षाने गेल्या वर्षी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान सलमान रश्दींवरून उठलेल्या वादळानंतर घेतली होती. त्याही वेळी रश्दींच्या पुस्तकातील वादग्रस्त उता-यांचे वाचन झाल्यामुळे विशिष्ट समाजसमूहाच्या भावना दुखावल्याचा क्षणिक माहोल तयार झाला होता.

वस्तुत: रश्दी त्यादरम्यान वा नंतर भारतातील इतर ठिकाणच्या व्यासपीठांवर उपस्थित होते, परंतु केवळ जयपूर फेस्टिव्हलमध्येच ‘निवडक’ स्वरूपात जनभावनेचा भडका उडाला होता. याचे रहस्य, त्या वेळी ऐन तोंडावर आलेल्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दडलेले होते. म्हणूनच सत्ताधारी पक्ष-संघटनेला निदान त्या वेळी तरी रश्दींच्या विरोधात रान उठवणा-यांना शिंगावर घेण्याची इच्छा नव्हती. म्हणजेच, रश्दींसहित इतर साहित्यिकांचा त्या वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुकारा योग्य असला, विशिष्ट समाजाच्या भावनांचा अनादर झालेला असला, तरीही त्या सर्व संघर्षामागे ‘पोलिटिकल टायमिंग’चाही भाग मोठा होता. याची कल्पना रश्दींनाही होती आणि त्यांच्या विरोधात रान उठवणा-यांनीही! समजा त्या वेळी राजस्थानच्या विधानसभा निवडणुका नसत्या तर रश्दी बिनबोभाट जयपूर फेस्टिव्हलमध्ये मिरवते झाले असते आणि आतासुद्धा कमल हासनने वितरक-प्रदर्शकांविरोधात (जाणकारांच्या तर्कानुसार जयललितांच्या निकटच्या वर्तुळातील) संघर्षाचा पवित्रा घेतला नसता तर कदाचित ‘विश्वरूपम’ची कुणी जाणीवपूर्वक नोंद घेतलीही नसती.