प्रत्यक्ष वास्तवात जगताना आपण कितीही सावधगिरी बाळगत असलो तरी
फेसबुकसारख्या सोशल मीडियातील आपले जगणे बेसावध व स्वैर-स्वच्छंदीच असते. अनेकदा समाजात अशा काही सकारात्मक किंवा नकारात्मक घटना घडत असतात की फेसबुकवर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतात. फेसबुक जेव्हा सुरू झाले तेव्हा त्याचा उद्देश जगाच्या कानाकोपर्यात राहणार्यांनी ज्ञात-अज्ञाताशी ओळख करावी व संवाद करावा असा होता. फेसबुकने त्या वेळी जाहीरही केले होते की, हा मीडिया सार्वजनिक जीवन किंवा व्यक्तिगत जीवनातील घटनांचे आदानप्रदान करत असला तरी या माध्यमातील व्यक्तींचे खासगीपण जपण्याला सर्वेच्च प्राधान्य दिले जाईल. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही.
फेसबुकने 2012 मध्ये सुमारे सात लाख युजरना अंधारात ठेवून त्यांच्या भावभावनांचा मोठा डेटाबेस युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया व कॉर्नेल युनिव्हर्सिटीला अभ्यासासाठी दिला. हा डेटाबेस म्हणजे खोट्या न्यूजफीडवर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया होत्या. अर्थात याची वाच्यता रविवारी झाल्यानंतर फेसबुकवर जगभरातून जोरदार टीका झाली व युजरच्या संमतीविना त्याच्या खासगी जीवनात हस्तक्षेप केल्याबद्दलही लोकांनी संतापही व्यक्त केला. लोकांची ही तीव्र प्रतिक्रिया पाहून फेसबुकला या प्रकरणी माफी मागावी लागली. पण या घटनेच्या निमित्ताने सोशल मीडियातील खासगीपण व लोकांचा बदलणारा मूड हा मुद्दा पुन्हा चर्चेस आला आहे.
सोशल मीडियाचा अभ्यास करणार्यांच्या मते फेसबुक हे लोकांच्या मूडवर हेलकावे खाणारे माध्यम असल्याने या माध्यमात येणार्या सकारात्मक व नकारात्मक माहितीद्वारे लोकांच्या भावभावनांचा अभ्यास करता येऊ शकतो. या चाचणीत असे आढळून आले की, एकाच वेळी एखाद्या ग्राहकाला आयुष्याला वळण देणारे, सकारात्मक संदेश, लेख, फोटो किंवा व्हिडिओ सातत्याने पाहायला दिल्यास त्याचा मूड प्रसन्न राहतो तसेच या ग्राहकांना अधिकाधिक नकारात्मक संदेश पाठवल्यास त्याचा मूड नकारात्मक होतो. सोशल मीडियात भावभावनांचा संसर्ग वेगाने पसरतो हे काही नवे नाही. लोक कोणताही सारासार विचार न करता या मीडियातील व्यक्त होणार्या कोणत्याही भावनांच्या डोहात स्वत:ला झोकून देत असतात. पण मुद्दा भावभावनांचा अभ्यास करण्यापुरता मर्यादित नाही तर या मीडियात खासगीपण खरोखरीच जपले जाते का, हा आहे.