आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजा तुझ्या भल्यासाठी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अन्नदाता शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे कोलमडला आहे. बेभरवशाचा पाऊस, त्यातून निर्माण होणारी नापिकी, कसेतरी जे काही पीक आले त्याला मिळणारा योग्य भाव, सिंचनाचा अभाव, अशा एक ना अनेक कारणांनी शेतकरी खचत चालला आहे. शेवटी तो जगण्याच्या शर्यतीत हार पत्करतो. आपण काहीच करू शकत नाही.
संसाराचा गाडा ओढू शकणार नाही. आणि आपल्यावरील ही परिस्थिती बदलणारच नाही, असे समजून तो हे दु:ख पचवू शकत नाही. त्याच त्या विचाराने आणि सुकर जगण्यासाठीचे कोणतेच मार्ग सापडल्याने तो नैराश्याच्या गर्तेत अडकत जातो आणि शेवटी त्यातून एक दिवस जगणेच थांबवण्यासाठी अघोरी प्रकाराला जवळ करतो.
गेल्या अनेक वर्षांपासून विकसनशील महाराष्ट्राला बळीराजाच्या समस्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजनांत संपूर्ण यश आलेले नाही. गेल्या काही दशकांपासून ही समस्या जगासमोर आली. त्यावर बरेच संशोधन, चर्चा आणि उपाययोजनांही झाली. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सगळ्याच पातळीवर प्रयत्न झाले. केंद्र शासनाने आत्तापर्यंत ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. सिंचनाचेही काही प्रकल्प पूर्ण झाले. अनेक प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे, पण त्यामुळे मूळ प्रश्नावर इलाज झाला नाही, हे वास्तव आहे. बळीराजाने स्वत:हून परिस्थितीवर मार्ग काढावे यासाठीही वेगवेगळ्या योजना तयार झाल्या, त्याचा थोड्या प्रमाणात सकारात्मक परिणाम झाला. मात्र, समस्या आहे त्याच ठिकाणी राहिली. सरकार बदलले आता दिवस बदलतील, अशी आशा निर्माण झाली. सरकारनेही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे ठरवले, मात्र या वर्षीही निसर्गाचे चक्र शेतकऱ्यांसाठी चांगले नव्हते. त्यामुळे तो अधिकच खचला. गेल्या दोन वर्षांत एकट्या अमरावती विभागात वेळा नैसर्गिक आपत्ती कोसळली. हजारांवर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. पण, त्या परिस्थितीचा लाखो शेतकऱ्यांनी सामना केला. शासनानेही वेळोवेळी मदतीची भूमिका घेतली आणि समस्येवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. बळीराजाची जगण्याची भ्रांत दूर करण्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा योजना आणली. त्यांना तत्का‌ळ‌ कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बॅंकांना विशेष निर्देश दिले. पीक विम्याच्या लाभाची जटिल प्रक्रिया सोपी केली. विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील निराशेकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना विचाराच्या त्या दुष्टकृत्यातून बाहेर काढण्यासाठी आता ‘प्रेरणा प्रकल्प’अंतर्गत शाश्वत आरोग्यसेवा उपलब्ध करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी कोटी रुपयांच्या रकमेची तरतूदही केली आहे. मानसोपचारांमार्फत बळीराजाला नैराश्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
कंटाळलेला बळीराजा जीवनाला संपवण्याचा विचार करतो, तेव्हा तो नैराश्याने ग्रासलेला असतो. तो इथपर्यंत का पोहोचला, याची कारणे काहीही असली तरी त्याला त्या अवस्थेत रोखले तर नक्कीच या समस्येवर चांगला मार्ग निघू शकतो. यवतमाळ येथे असाच उमेद हा पायलट प्रकल्प यशस्वी झालेला आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जगण्याची उमेद देता आली. त्याला जगण्याच्या लढाईत एकटे पडू दिले नाही, तर तो नैराश्याच्या खाईकडे जाणारच नाही आणि ते करण्यात यंत्रणा आणि समाज दोन्ही यशस्वी झाले, तर ही समस्या संपायला मोठी मदतच होईल. गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न सोडवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नात हा परिणामकारक प्रयत्न ठरू शकतो, मात्र तो गांभीर्याने हाताळला जाणे गरजेचे आहे. ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनीही बळीराजाच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नांना समाजाने संवेदनशीलतेची पावती दिली आहे. शिवसेनेनेही प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र पथक स्थापन करून समुपदेशनासह त्यांच्यासाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकरी बचाव आंदोलन सुरू केले आहे. बळीराजाला निराशाजनक मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेले हेच सकारात्मक प्रयत्न त्याला त्याच्या दुष्टचक्रातून बाहेर काढून त्याला जगण्याची नवी उमेद निर्माण करण्यासाठी मोठे फलदायी ठरू शकतात. त्यासाठी सगळ्यांनीच सकारात्मक पुढाकार घेण्याची गरज आहे.