आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी नवरा नको गं बाई!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीची दुरवस्था, शेतक-यांची अगतिकता वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होत असते. मग कधी केंद्रीय कृषिमंत्री शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी झाला पाहिजे असे म्हणतात, तर कधी शेतक-यांनी शेतीशिवाय अन्य पर्याय शोधले पाहिजेत असा साळसूद सल्ला देऊन मोकळे होतात. खरे तर शेतक-यांना असा सल्ला देण्याची गरज नाही. कारण तो स्वत:च शेतीतून सुटकेसाठी धडपडत असतो. आपली मुलगी शेतीच्या नरकयातनेतून सुटावी म्हणून जावई शोधताना तो शक्यतो नोकरीवाला मुलगा शोधतो. पण त्याचा हुंडा परवडत नाही म्हणून इच्छा नसताना अखेर शेतकरी मुलगाच त्याला पसंत करावा लागतो. आपला मुलगा शेतीत राहू नये म्हणून तो धडपडतो. त्याला नोकरी लागावी म्हणून वेळप्रसंगी जमिनीचा तुकडा विकून ‘चिरीमिरी’ची व्यवस्था मुलाच्या नोकरीसाठी करतो. ‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’च्या एका पाहणीमध्ये 40 टक्के शेतकºयांची शेती करण्याची अजिबात इच्छा नाही. पण ते ‘नाइलाज’ म्हणून शेती करताहेत असे आढळून आले. ‘शेतकरी नवरा नको गं बाई!’ हे तर तरुण मुलींचे ‘घोषवाक्य’ बनले आहे. विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा दौरा करताना 2006 मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग वर्धा जिल्ह्यातील वायफड या गावी आले होते. तेथे शेतकºयांशी ते बोलत होते. त्या वेळेस तेथे उपस्थित असलेल्या तरुण मुलीने पंतप्रधानांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टपणे, ‘एक वेळ मी जीव देईन, पण कोणत्याही परिस्थितीत शेतकरी मुलाशी लग्न करणार नाही,’ असे बजावले होते. त्या प्रसंगाचा मी स्वत: साक्षीदार होतो. त्या वेळेस त्या तरुण मुलीने दिलेले उत्तर दुर्दैवाने विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणीच्या 21 वर्षीय दीपाली कुत्तरमारे या तरुण मुलीने शब्दश: खरे केले. त्याची ही अतिशय वेदनादायी हकीगत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थर्टीफर्स्टचा जल्लोष सर्वत्र सुरू होता. पार्ट्यांचा हंगामा, डीजेचा कल्लोळ, दारूची रेलचेल, नाचगाण्यांचा धिंगाणा, तर दारूकामाचा आवाजी दणदणाट. टीव्हीवरील ढणढणाटी कार्यक्रमांचाही उन्माद सुरू होता. या पार्श्वभूमीवर वणीच्या दीपाली कुत्तरमारे या तरुणीने स्वयंपाकघरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकांचा थर्टीफर्स्टचा ‘हँगओव्हर’ उतरलाही नव्हता तोच 2012च्या वर्षारंभी दीपालीने स्वत: गळफास घेऊन ‘हँग’ करून घेतल्याची बातमी वृत्तपत्रात होती. अर्थात ‘लोकल’ लेव्हलला. दीपालीचे वडील वेकोलीमध्ये कामगार. दीपालीचे लग्नाच वय झाले म्हणून तिच्यासाठी वरसंशोधन जोरात सुरू होते. शक्यतोवर नोकरीवालाच नवरा तिच्यासाठी शोधण्याचा प्रयत्न होता. मुलगा पसंत यायचा, पण त्याचा हुंडा आवाक्याबाहेर असायचा. शेवटी आईवडिलांनी नाइलाज म्हणून 16 एकर जमिनीचा मालक असलेला शेतकरी मुलगा पसंत केला. महत्त्वाचे म्हणजे त्याचा हुंडा त्यांना झेपणारा होता. 28 डिसेंबरला ही पसंती झाली. पण ही गोष्ट दीपालीला पसंत नव्हती. तिने लग्नाला स्पष्ट नकार दिला. पण आईवडीलही अगतिक. त्यांना वाटले, मुलीची नाराजी हळूहळू कमी होईल. पण तसे झाले नाही. 1 जानेवारी 2012 रोजी लग्नाची ‘फायनल’ बोलणी होती. 31 डिसेंबरच्या सायंकाळीच दीपालीनेही तिचा निर्णय ‘फायनल’ केला. स्वयंपाक करण्याच्या निमित्ताने स्वयंपाकघरात गेलेली दीपाली स्वयंपाकघराच्या छताला आईवडिलांना लटकलेली आढळली. दीपालीने योग्य केले की अयोग्य, यावर चर्चा होऊ शकते. वादही झडू शकतात. पण या प्रसंगातून शेतीची विदारक अवस्था मात्र लपू शकत नाही. खरे तर 16 एकर जमिनीचा मालक असलेला शेतकरी म्हणजे सरकारी व विद्वानांच्या भाषेत ‘मोठा’ शेतकरी. ‘श्रीमंत’ शेतकरी. या तथाकथित श्रीमंत शेतक-याशीसुद्धा दीपाली लग्नाला तयार नव्हती. शेतकºयाची बायको होऊन आयुष्यभर मरणयातना भोगण्यापेक्षा त्यापूर्वीच मरण बरे असे तिला वाटले असेल तर नवल नाही.
‘शेतकरी नवरा नको गं बाई’ इथंपर्यंत असलेली भूमिका आता ‘वेळप्रसंगी जीव देईन, पण कोणत्याही परिस्थितीत शेतकरी मुलाशी लग्न करणार नाही’ या टोकापर्यंत परिस्थिती का येत आहे, याचा अजूनही पाहिजे त्या गांभीर्याने विचार होत नाही. ज्या देशात लाखो शेतक-यांनी आत्महत्या केल्यानंतरही शेतीच्या प्रश्नावर गांभीर्याने चर्चा होत नाही त्या देशात वर्धा जिल्ह्यातील वायफड या गावच्या तरुणीने पंतप्रधानांना दिलेले उत्तर आणि तेच उत्तर शब्दश: खरे करणारी दीपाली यावर गंभीरपणे चर्चा होईल ही शक्यता सुतराम दिसत नाही. ऐश्वर्या रायचे बाळंतपण, शिल्पा शेट्टीची ‘गोड बातमी’ ‘ग्लोबल’ होते. पण दीपालीचे मरण मात्र ‘लोकलच’ राहते. प्रसारमाध्यमांना तिचे मरण हा साधा बातमीचा विषयही वाटत नाही. शेतीव्यवसायात असणाºयांच्या आत्महत्या. त्या व्यवसायाशी जोडली जाणार म्हणून भयभीत होऊन दीपालीने केलेली आत्महत्या हा साराच विषय दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. हे गांभीर्य शासनाला समजले नाही असेही नाही. प्रश्न समजला आहे पण अजून उमजत नाही, अशी अवस्था शासनाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेला राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल आजही तसाच धूळ खात पडलेला आहे. ज्या वेळेस राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल तयार झाला होता, त्याच वेळेस सहाव्या वेतन आयोगाचा अहवालही सादर झाला. सहाव्या वेतन आयोगाचा अहवाल तत्काळ स्वीकारला गेला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. पण शेतकरी आत्महत्या करीत असतानासुद्धा राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल मात्र तसाच कच-याच्या पेटीत पडून आहे. नोकरदारांना अनुकूल आणि शेतक-यांना प्रतिकूल असलेले सरकार दीपालीसारख्या तरुणींच्याही लक्षात येत असावे. म्हणूनच त्या म्हणत असाव्यात, ‘नोकरीवाला हवा गं बाई, शेतकरी नवरा नको गं बाई.’