आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय इथले संपत नाही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“ती न हजार पारध्यांची टोळी दरोडे घालत फिरते आहे. मुले पळवणारे लोक भटकत आहेत,” अशा अफवा सोलापूर जिल्ह्यात पसरल्या आहेत. लांबलेल्या पावसाचे पाठबळ अफवांना आहे. ही ‘बिनबादल बरसात’सारखी स्थिती आहे. दहशत एवढी की लोक गावोगावी सामूहिक गस्त घालायला लागले. ‘भय संपत नाही, रात्र लवकर सरत नाही,’ अशा कमालीच्या तणावात लोक रात्र काढत आहेत. या अफवांना बळ मिळते व्हॉट्सअपमुळे. कुठले तरी फोटो, न घडलेल्या घटनांची माहिती व्हॉट्सअपवर टाकली जाते. लोकही पोलिसांकडे खातरजमा करण्याच्या भानगडीत पडत नाही. परिणामी अफवा व तणावामुळे निष्पाप लोकांचे जीव हकनाक जात आहेत. बार्शी तालुक्यातील मालवंडी गावातून मध्यरात्री चाललेल्या जीपवर गस्तकऱ्यांनी दगडफेक केली. त्यात दहिटण्याची एक महिला मरण पावली. ही महिला पुण्यामध्ये आपल्या मुलाचा साखरपुडा उरकून गावाकडे परतत होती. मोहोळ तालुक्यात टाकळी सिकंदरला ओरिसातल्या तरुणाला जमावाने बेदम ठोकले. तणावाचा गैरफायदा घेणारा प्रकारही घडला. माढा तालुक्यात मुलाने वडिलांचा खून केला. चोरट्यांनी खून केल्याचा बनाव रचला. मुलांना वेळेवर घरी घेऊन जाण्याची सूचना देणारे फलक शाळांच्या बाहेर लागले. चार वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील सहा बहुरूप्यांना नागपूर परिसरात लोकांनी मरेस्तोवर बडवले होते. राज्यात कोठेना कोठे असे प्रकार अधूनमधून होतातच. पण, आता ते व्हॉट्सअपमुळे वेगाने पसरत आहेत. अफवा पसरवणारे पोस्टला जबाबदार म्हणून ग्रुप अडमिनला पोलिस ठाण्यात बोलावून तंबी सोलापूर पोलिस देत आहेत. अशा कारवाईलाही मर्यादा आहेत. तारतम्य आणि सावधगिरी बाळगली पाहिजे ती लोकांनीच. कोणतीही गोष्ट कानावर पडल्यानंतर त्याची खातरजमा केल्याशिवाय कुजबूज करायची नाही. हे सर्वांनीच सांभाळले तर व्हॉट्सअपवर बोगस पोस्ट पडणार नाहीत. हे केले तरच ठीक अन्यथा लोक विनाकारण मारले जात राहतील.