Home | Editorial | Columns | female fatlside- 1500cr busienss

स्त्रीगर्भाची हत्या : पंधराशे कोटींचा धंदा

शेखर देशमुख | Update - Jun 07, 2011, 08:58 AM IST

स्त्री भ्रूणहत्येमागे जितकी समाजाची बुरसटलेली मानसिकता आहे, तितकेच किंबहुना, त्याहून मोठे अर्थकारणही आहे

  • female fatlside- 1500cr busienss

    ‘अरे मानसा मानसा कधी व्हशील मानूस..’ बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून कधीकाळी विचारलेल्या या मूलभूत प्रश्नाचे उत्तर अद्यापही नकारात्मकच आहे, याचा प्रत्यय नुकताच स्त्री भ्रूणहत्येसंदर्भात ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालाने दिला आहे. बुरसटलेल्या भारतीय मानसिकतेची चिरफाड करणार्‍या या अहवालानुसार गेल्या 30 वर्षांत भारतामध्ये उच्च मध्यमवर्गीय आणि र्शीमंतांमध्ये स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढलेले आहे. या काळात देशात तब्बल 42 लाख ते सव्वा कोटी स्त्री भ्रूणांची हत्या झाल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. देशातील 563 जिल्ह्यांच्या जनगणना अहवालाचा आधार घेऊन मांडण्यात आलेल्या या अहवालामध्ये हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, 1990 मध्ये भारतात हजार पुरुषांमागे 906 स्त्रिया असे प्रमाण होते, तर 2000 ते 2010 या दशकात मुलींच्या जन्मदरात 1.4 टक्क्यांनी घट होऊन 2005 पर्यंत हेच प्रमाण 836 इतके लक्षणीयरीत्या घटलेले आहे. म्हणजेच, जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाच्या पर्वानंतरच गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्येच्या कृत्यांमध्ये वाढ झालेली आहे. आर्थिक सुबत्तेबरोबरच मानसिक-बौद्धिक संपन्नताही येते, हा आपला भ्रम असतो. प्रत्यक्षात मात्र पैसा, पत आणि पर्याय आल्यावर माणूस व्यवहारांनी अधिक बेबंद आणि मनाने संवेदनाहीन होत जातो. एरवी, गरिबांमध्ये स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण सर्वाधिक असल्याची ओरड एका वर्गाकडून केली जात होती. त्यांच्या निरक्षरतेचे, असंस्कृतपणाचे दाखलेही वेळोवेळी दिले जात होते; पण ती निव्वळ दिशाभूल होती, हे आता सप्रमाण सिद्ध झाले आहे. भारतात स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण हरित पट्टय़ात (ग्रीन बेल्ट) मोठे होते, ही बाब एव्हाना जगजाहीर झालेली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा हा महाराष्ट्राचा पश्चिम भाग, पंजाब, हरियाणा, राजस्थान हे तर या निंदनीय कृत्यामध्ये आघाडीवर होते; पण आता स्त्री भ्रूणहत्येचा फैलाव समाजाच्या सर्व थरांत, त्यातही विशेषत: उच्च मध्यमवर्गीयांमध्ये झाला आहे, ही तज्ज्ञांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. आकडेवारीवर बारकाईने नजर टाकल्यास एक बाब ध्यानात येते, ती म्हणजे, 2000 ते 2010 या दशकात जन्माला येणार्‍या मुलींचे प्रमाण झपाट्याने घटले आहे. हेच ते दशक आहे, ज्यात जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणामुळे मध्यमवर्गीयांच्या अंगावरची चरबी वाढून ते उच्च मध्यमवर्गीय गटात सामील झाले. ‘बेटी धनाची पेटी’ असे जरी हा मध्यमवर्गीय तोंडदेखले म्हणत असला तरी ते ‘पराया धन’ आहे, या प्रतिगामी विचारांचा पगडा त्याच्या मनावरून पुसला गेलेला नाही. म्हणजेच अचानक आलेल्या आर्थिक सुबत्तेने अंगी माज आला. कायद्याची भीती कमी झाली. याचाच फायदा मार्केट नावाच्या भस्मासुराने घेतला. जोडीला भ्रष्टाचाराला चटावलेले नोकरशहा आणि पैशांची हाव सुटलेले वैद्यक व्यावसायिक होतेच. त्यातूनच धडकी भरवणारे अर्थकारण आकारास आले. आज देशात अधिकृतपणे नोंद झालेल्या सोनोग्राफी यंत्रांची संख्या आहे 36 हजार. प्रत्यक्षात विकली गेली आहेत एक लाखाहून अधिक. महाराष्ट्रात हीच संख्या 7800 (दोन वर्षांपूर्वी 5400) इतकी आहे. त्यात मुंबईत 2500, प. महाराष्ट्रात 1500 असे ते प्रमाण आहे. अर्थात हा झाला अधिकृत आकडा. अलीकडेच गर्भलिंग तपासाला असलेली मागणी लक्षात घेता असेम्बल्ड (नॉन ब्रँडेड) यंत्रांची धडाक्यात विक्री होत असल्याचे या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे असेल तर हा आकडा दोन ते अडीच लाखांच्या घरात जातो. स्त्री भ्रूणहत्येविरोधात मोहीम उघडलेल्या अँड. वर्षा देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात याचा जवळपास 1500 कोटींचा संघटित धंदाच या घडीला देशात सुरू आहे. म्हणजेच स्त्री भ्रूणहत्येमागे जितकी समाजाची बुरसटलेली मानसिकता आहे, तितकेच किंबहुना, त्याहून मोठे अर्थकारणही आहे. या अर्थकारणात भल्याभल्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. यात जसा सामान्य माणूस आहे, तसाच उच्चपदस्थ, नोकरशहा, दलाल, वैद्यक व्यावसायिक आणि यंत्रे बनवून देणार्‍या कंपन्याही आहेत. कोणाही सुसंस्कृत संवेदनशील व्यक्तीला मुलांच्या हव्यासापायी स्त्री गर्भाची हत्या करणे नको आहे; पण स्त्री भ्रूणहत्या घडवून आणली तरच काहींचा धंदा होणार आहे. अशा वेळी समाजविघातक प्रवृत्तींनी केवळ याच नव्हे, इतरही क्षेत्रांत तयार केलेले रॅकेट मोडून काढणे ही यापुढच्या काळात देशापुढची सगळ्यांत मोठी समस्या ठरणार आहे.

Trending