आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्सव की बाजार?(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना सुरू होताच आपल्याकडे सण-उत्सवांना बहर येत असला तरी त्याला खरा जोश चढतो तो दहीहंडीपासून. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी अशी या उत्साहाची चढती भाजणी असते. महागाईपासून वाहतूक कोंडीपर्यंत विविध समस्यांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या सर्वसामान्यांना दररोजच्या धकाधकीतून घडीभर का होईना दिलासा मिळावा, असे वातावरण खरे तर या मंगलपर्वात निर्माण व्हायला हवे. किंबहुना सण-उत्सवांचा मूळ उद्देशदेखील मनाची शांती, प्रसन्नता हाच आहे. मागे वळून पाहिल्यास त्याची जाणीव सहजपणे होते. अगदी सध्या जी मंडळी पस्तीस-चाळिशीत आहेत त्यांनादेखील त्यांच्या लहानपणचे उत्सवांचे स्वरूप आणि सध्याचे स्वरूप यातील तफावत ठळकपणे जाणवल्याशिवाय राहणार नाही. वीस वर्षांपूर्वी दहीहंडी, गणपती किंवा कोणताही सार्वजनिक उत्सव असो, वर्गणी हा त्यातील आर्थिक उलाढालीचा प्रमुख स्रोत असायचा.

गोळा केल्या जाणा-या या वर्गणीची रक्कमदेखील प्रत्येकी पाच, अकरा किंवा फार तर एकवीस रुपये असायची. त्यासाठीसुद्धा मंडळाच्या कार्यकर्त्यांना वारंवार घरोघरी चकरा माराव्या लागायच्या. या एवढ्याशा ‘बजेट’ची काटेकोर आखणी करावी लागायची. त्यातूनच पूजापाठ, प्रसाद व इतर कार्यक्रमांचे खर्च भागवावे लागायचे. शिवाय चाळीतल्या, गल्लीतल्या किंवा त्या त्या परिसरातल्या वडीलधा-यांना या सा-याचा हिशेबदेखील सादर करावा लागायचा. त्यामुळे सार्वजनिक मंडळात कार्यकर्ता म्हणून काम करता करता व्यावहारिक शिक्षणाचे धडेसुद्धा अप्रत्यक्षपणे गिरवले जायचे. त्याचप्रमाणे वर्गणी जमा करण्यापासून ते विविध कार्यक्रमांचे नियोजन-आयोजनापर्यंत वारंवार सगळ्यांना एकत्र यावे लागायचे. त्यातून एकोपा, परस्पर समन्वय वगैरे गोष्टी आपोआप साध्य व्हायच्या आणि स्वसहभागाचा आनंद, आत्मिक समाधानदेखील लाभायचे.

आपल्याच घरातली मुले पुढाकार घेताहेत म्हटल्यावर वडीलधारी मंडळीसुद्धा त्यामध्ये रस घ्यायची. परिणामी ख-या अर्थाने हा काळ म्हणजे आनंदपर्व ठरायचा. पण अलीकडे एकूणच उत्सवांचे बदललेले स्वरूप लक्षात घेता मन:शांतीपेक्षा त्याचा मनस्तापच अधिक होतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. काळाप्रमाणे एखाद्या बाबीचे, उपक्रमाचे स्वरूप बदलणे समजू शकते. मात्र, सध्या त्याला तद्दन बाजारू चेहरा प्राप्त होऊ लागला आहे. साहजिकच उत्सवांकडेदेखील एक ‘इव्हेंट’ म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. त्याची सूत्रेही मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून तथाकथित इव्हेंट मॅनेजर्सच्या हाती सोपवली जात आहेत. या सगळ्यांमध्ये आपसूकच दारोदार हिंडून गोळा करावयाची वर्गणी हा घटक नगण्य ठरू लागला आहे. वर्गणीदारांची जागा स्पॉन्सर्सने घेतली असल्याने पैशाची तशी ददात राहिलेली नाही. आज सगळीकडे साज-या होत असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाचे उदाहरण त्यासाठी घेता येईल. नाशिक, औरंगाबाद वगैरे ठिकाणी दहीहंडीचे अगदी म्हणावे तेवढे प्रस्थ नसले तरी मुंबई, ठाण्यात मात्र गोविंदांचा गजर पावलोपावली दिसून येतो. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण होत असल्याने तर दिवसेंदिवस त्याला अधिकाधिक ग्लॅमर प्राप्त होत आहे. पूर्वीपासून मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्साहात होत असली तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे ती सगळ्याच दृष्टीने आवाक्यात असायची.

चाळी अथवा इमारतींच्या दुस-या किंवा फार तर तिस-या मजल्याच्या गॅल-यांना हंडी बांधली जायची आणि परिसरातलेच गोविंदा ती फोडायचे. हंडी फोडणा-यांना एक्कावन्न, एकशे एक वा फार तर पाचशे एक रुपयांचे पारितोषिक असायचे. पण रकमेपेक्षाही हंडी फोडण्यातली चढाओढ आणि आनंद अधिक असायचा. आता मात्र सर्वच दृष्टीने हा ‘इव्हेंट’ कसा ‘कॅश’ करता येईल त्यावर भर दिलेला दिसतो. ठिकठिकाणची राजकीय मंडळी त्यासाठी पुढे सरसावतात आणि आपापल्या हंडीचे पद्धतशीर ‘ब्रँडिंग’ करतात. त्यासाठी मग आपली, आपल्या नेतेमंडळींची छबी असलेले टी -शर्ट हंडी फोडण्यासाठी येणा-या गोविंदा पथकांना पुरवले जातात. आपापल्या पक्षाचे झेंडे, बॅनर फडकवण्यावर जोर दिला जातो. जास्तीत जास्त गर्दी खेचण्यासाठी सेलिब्रिटींना पाचारण, दणदणाटी डीजे, लाइव्ह ऑर्केस्ट्रा, डिजिटल इफेक्ट्सची प्रकाशयोजना असे फंडे उपयोगात आणले जातात. या सगळ्यांमध्ये केवळ ठिकठिकाणची वाहतूकच नव्हे, तर एक संपूर्ण दिवस देशाची आर्थिक राजधानीच ठप्प होऊन जाते.

एकीकडे महागाईचा निर्देशांक झपाट्याने वाढतोय, डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडतोय, इंधन दरवाढीसह वित्तीय तूट प्रचंड प्रमाणावर वाढतेय आणि त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम अगदी भाजीपाल्यापासून दैनंदिन वापराच्या चीजवस्तूंपर्यंत सर्वत्र पाहावयास मिळत आहे. दुसरीकडे असे कंठाळी उत्सव ध्वनिप्रदूषणापासून सुरक्षेपर्यंतचे अनेक प्रश्न निर्माण करीत आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. पण नेते म्हणवून घेणारे काही जण बुद्ध्याच विवेकाऐवजी अभिनिवेशावर भर देत असल्याने मग अशा उत्सवांमधील उत्साहाचे रूपांतर उन्मादात होत असल्याचे पाहावयास मिळते. त्यातून एकोप्याऐवजी परस्परांतील चढाओढ, खुन्नस आणि द्वेषभावना यांनाच एक प्रकारे खतपाणी घातले जाते. अशाच उन्मादातून मग माथी भडकावणे आणि आपापली ‘व्होट बँक’ सुरक्षित करणे सोपे जाते.

विवेकनिष्ठतेची कास आयुष्यभर धरणा-या नरेंद्र दाभोलकरांसारख्या सुधारकाच्या निर्घृण हत्येसाठी अभिनिवेश आणि द्वेष याच भावना प्रामुख्याने कारण असाव्यात अशी जी सार्वत्रिक भावना आहे, त्याची पार्श्वभूमीसुद्धा उन्मादाने ग्रस्त आहे हेही दुर्लक्षून चालणार नाही. परिणामी स्वत:ला पुरोगामी आणि सुसंस्कृत म्हणवून घेण्यात धन्यता मानणा-या मराठीजनांनी आता सारासार विचाराने आपल्या समाजाचे स्वयंनियमन करायला हवे. एवढेच नव्हे तर अशा स्थितीत उत्सवांचे हे असे उधळे स्वरूप कितपत योग्य ठरते त्याचे मंथन करत विवेकी गोपाळकाला करण्याची नितांत गरज आहे.