आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलमधील ‘फुटबॉल फीव्हर’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील आयपीएल क्रिकेट सामने संपतात ना संपतात तोच 12 जूनपासून ब्राझीलमध्ये विश्वचषक फुटबॉल सामने सुरू होत आहेत. भारतीय उपखंडात जसे क्रिकेट लोकप्रिय, तसे जगात फुटबॉल लोकप्रिय आहे. त्यात ब्राझील तर फुटबॉलची पंढरी. या ठिकाणी 12 शहरांमध्ये विश्वचषक फुटबॉलचे सामने 12 जूनपासून महिनाभर चालणार आहेत. या अनुषंगाने ब्राझीलमध्ये सर्व सेवांचे दर दसपटीने वाढलेले आहेत. ब्राझीलमधील सर्व विमान कंपन्यांनी प्रवासभाडे अवाच्या सव्वा वाढवून ठेवलेले आहेत. इतकेच नाही, तर अनेक श्रीमंतांनी आपली आलिशान घरे महिनाभर फुटबॉल शौकिनांसाठी भाड्याने द्यायचे ठरवले आहे; पण याचे दर ऐकून काटकसरी भारतीय मनाला वेदना होण्याचीच शक्यता आहे. फॅशन जगतातील तज्ज्ञ अरिफ नूर यांच्या मालकीची तीन मजली काचेची इमारत रिओ द जानेरो या शहरात आहे. पाच बेडरूम आणि आठ बाथरूम असलेल्या या आलिशान घराचे एका आठवड्याचे भाडे आहे 90 लाख रुपये. वर्ल्ड कप फुटबॉल सामने महिनाभर चालणार आहेत. ज्या फुटबॉल शौकिनाला हे घर महिन्यासाठी भाड्याने लागेल त्याला फक्त घरभाड्यासाठी 3 कोटी 60 लाख रु. मोजावे लागणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक रिअल इस्टेट कंपन्या व घर भाड्याने देणार्‍या दलालांची चांदी आहे. आयापनेमा येथील तीन मजले पेंटहाऊसचे महिन्याचे भाडे 4 कोटी रुपये आहे. हे महाग वाटत असेल, तर कोपाकबाना येथील साडेतीन हजार चौरस फुटातील तीन बेडरूमच्या बंगल्याचे भाडे आहे आठवड्याला साडेसात लाख रुपये. एरवी ज्या यूथ हॉस्टेलकडे कोणी पाहतही नव्हते, त्या हॉस्टेलचे एका रात्रीसाठी कॉट बेसिस भाडे आहे सहा हजार रुपये. काही अतिश्रीमंत लोकांनी ब्राझीलमध्ये विश्वचषक फुटबॉल जाहीर होताच नव्याने घरे बांधली, त्याच्या केवळ एका आठवड्याच्या भाड्यातच बांधकामाचा खर्च वसूल झाला आहे. साओ पावलो शहरही सामन्याच्या निमित्ताने प्रचंड महाग झाले आहे.