आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नमो’आणि ‘ममो’ ची जुगलबंदी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या नेत्यास पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्यात यावी किंवा नाही, यावरून स्वतंत्र भारताच्या इतिहासात इतकी चर्चा यापूर्वी अन्य व्यक्तीची झालेली नाही. आजवर जितके पंतप्रधान झाले, त्यांच्याबाबतीत निवडणुकीपूर्वी माहिती असायचे किंवा निवडणूकीनंतर जोड-तोडीने निवडले जात होते. काही पंतप्रधानांचा अचानक मृत्यू झाल्यानंतरही तत्काळ कोणाला ना कोणाला तरी पंतप्रधान करण्यात येत होते; परंतु सार्वत्रिक निवडणुकाच्या एक वर्ष आधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यासाठी इतकी जबरदस्त चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्याच बाबतीत
झाली आहे.


या चर्चेमुळे जनमानसात भाजपची प्रतिमा मलिन झाल्याचे काही राजकीय निरीक्षकांना वाटते. भाजप एकसंध पक्ष नाही, अशी प्रतिमाच जणू निर्माण केली गेली आहे. या पक्षाचा कोणीएक नेता नाही, इथपर्यंत ठीक आहे. कारण या मुद्द्यावरून भाजपमध्ये फूटही पडेल, अशी चिन्हे चर्चेदरम्यान दिसून येत होती. एका नेत्याने तर मला असेही सांगितले, मोदी पंतप्रधान होणे तर दूरच, याआधीच पक्षात फूट पडेल; परंतु जशी मोदींच्या नावाची घोषणा झाली तेव्हा असे वाटले की, गलितगात्र झालेला हा पक्ष ताजातवाना झाला आहे.


पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी तर दुस-याच दिवशी कोलांटउडी मारली आणि मोदींची प्रशंसा सुरू केली. वास्तविक पाहता भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की ज्यामध्ये फूट कधी पडलीच नाही. काँग्रेस पक्ष फुटला, कम्युनिस्ट पक्षाचे तुकडे झाले, सोशलिस्ट पक्षाचे अनेकदा विभाजन झाले, परंतु भाजप अखंडच राहिला. लालकृष्ण अडवाणी यांनी बंड केले असते तर जी अवस्था बलराज मधोक, वीरेंद्र सकलेचा, कल्याणसिंह आणि उमा भारतींची झाली तशीच पाळी त्यांच्यावरही आली असती. वास्तवात भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. यात कोणी नेता बनलेला नाही. या नेत्यांना जनाधार नसतो तर पक्षाधार असतो. जर ते पक्ष सोडतील तर ते एकांतवासाच्या दलदलीत गायब होतील. अटलबिहारी वाजपेयी हेच सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी नेते झाले; परंतु त्यांनीही जनसंघ आणि भाजप सोडला असता तर एकाकीच पडले असते. परंतु नरेंद्र मोदींची क्षमता या सगळ्या नेत्यांपेक्षा वेगळी आहे. गुजरातेत त्यांनी स्वत:चा जनाधार बनवला आहे. भाजप किंवा राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना मदत करो अथवा ना करोत; मोदींना जितकी या दोघांची गरज आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त मोदींची पक्षाला गरज आहे. मोदींचे स्वत:चे शासन गुजराततेत आहे. केंद्रात भाजपचे शासन बनवायचे झाल्यास त्यांना मोदींना निमंत्रण द्यावेच लागले असते. याच अडचणीमुळे मोदींना राज्याभिषेक करावा लागला, परंतु आता मोदी जर अखिल भारतीय नेता बनू इच्छित असतील, तर त्यांना भाजप आणि संघाचा आधार घेणे निकडीचेच आहे. या दोन्ही संघटनांनाही मोदींचीच गरज आहे.
या परस्पर निकडीला भारतीय तर्कशास्त्रात अन्योन्याश्रय असे म्हटले जाते. मोदी कधीच हुकूमशहा बनू शकत नाहीत, अशी भारतीय जनतेला खात्री वाटते. मात्र मोदींचे विरोधक आणि राजकीय निरीक्षक मात्र तसा संशय व्यक्त करतात.

डाव्यांनाही तोच संशय येतो, तीच तक्रार मोदींबाबत भाजपचे प्रमुख नेते आणि संघाचीसुद्धा आहे; परंतु मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांत जो फरक असतो तोच गुजरात आणि भारतात आहे. भाजप कोणाची खासगी मालमत्ता किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, तसेही पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरून चाललेल्या चर्चेमुळे सिद्धच झाले आहे.
देशात पुढील वर्षापासून हुकूमशाही किंवा फॅसिझमचे नवे युग सुरू होईल, ही भीतीसुद्धा अनाठायी वाटते. ज्या देशाने 1977 मध्ये आणीबाणीचा अनुभव घेतला, ती आणणा-याची दडपशाही अनुभवली. त्या देशाला दुस-यांदा कोणी मूर्ख बनवू शकत नाही. आता ज्या लोकांचा मोदींना विरोध आहे; ते तरी असे कोणते लोकशाहीवादी आहेत? कम्युनिस्टांत काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत; परंतु हुकूमशाहीला सैद्धांतिक रूप देऊन त्यांनी ती स्वीकारली आहे आणि काँग्रेस तर रा. स्व. संघाप्रमाणेच एकचालकानुवर्ती तत्त्वावरच विश्वास ठेवते. येथील बहुतांश प्रादेशिक पक्षसुद्धा घराणेशाहीची परंपरा असलेले किंवा एकाधिकारशाही असणारे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांना भावी हुकूमशहा म्हणून मोदींची भीती वाटत नाही; परंतु मोदींच्या प्रचंड मोठ्या लाटेचा मुकाबला हे पक्ष कसे करणार आहेत, याची भीती वाटते आहे. मोदींमुळेच भाजपमध्ये फूट पडेल असे विरोधात असणा-या पक्षांना वाटले होते; परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. आता ते मोदींचा बहाणा करून हुकूमशाही आणि जातीयवादाचे भूत नाचवत आहेत.


उरला प्रश्न जातीयवादाचा, तर 2002 चा गुजरात आता इतिहासजमा झाला आहे. त्याशिवाय का मोदींना इतक्या मोठ्या प्रमाणात मुसलमानांची मते मिळाली. आता त्यांच्या जागोजागी होणा-या सभांना हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज जमतो आहे. 2002 च्या दुर्भाग्यपूर्ण आणि दु:खद घटनेला विसरून देश पुढे जाऊ इच्छित आहे. त्याला पुढे जाऊ देणे जातीयवाद आहे की न जाऊ देणे जातीयवाद आहे? याशिवाय मोदींचा खरा किती विकास होतो आहे, ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे. जेव्हापासून त्यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यालयाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली, तेव्हापासून मोदींनी अशी कोणती विधाने केलेली नाहीत ज्यांना आपण जातीयवादी किंवा संकुचित वृत्तीची आहेत असे म्हणतो. तसे दिसूनही आलेले नाही. ज्यांना हिंदुत्वाचा पुरस्कर्ता म्हणून टीकेचे लक्ष्य केले जाते, तेच मोदी आता ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ चे नारे देत आहेत. मोदींचा धसका घेतलेले नेते या चांगल्या परिवर्तनाचे स्वागत का करत नाहीत?


तसेही मोदींसाठी सार्वत्रिक निवडणूक म्हणजे मोकळ्या मैदानासारखी आहे. ज्याप्रमाणे भाजपमध्ये त्यांच्यासमोर कोणाचा टिकाव लागू शकला नाही, मग त्यांना आव्हान देणारा आहेच कोण? काँग्रेसचे तरुण नेतृत्व राहुल गांधी आणि मनमोहनसिंग मोदींच्या जवळच्या मित्रासारखे वाटत आहेत. जर राहुल मोदींचे प्रतिस्पर्धी असतील तर त्यांना हातात शस्त्र न घेताही मैदानात बाजी मारता येईल. मनमोहनसिंगांसारखा पंतप्रधान तर भारतात यापूर्वी कधी झालेला नाही. ते सत्तेवर दहा वर्षे राहिले, परंतु त्यांनीच मोदींना ती खुर्ची बसण्यासाठी तयार ठेवली आहे, याचे श्रेय तर त्यांनाच जाते. नमो (नरेंद्र मोदी) आणि ममो (मनमोहन) यांच्या जुगलबंदीला माझा नमस्कार!