आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लोरेन्स नाइटिंगेल : परिचर्येची जन्मदात्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिचारिका हा शब्द लॅटिन असून तो Narture व Natricius या दोन शब्दांपासून संयुक्त शब्द बनला आहे. Natricius या शब्दाला अनेक अर्थ आहेत.Natricius म्हणजे पालनपोषण करणे, प्रेमाने काळजी घेणे, उत्तेजन देणे, रक्षण करणे, आधार देणे, सहन करणे, स्वीकार करणे. थोडक्यात असे म्हणता येईल की, जी व्यक्ती रुग्णाचे संगोपन, संवर्धन, पोषण तसेच शारीरिक शिक्षण देण्याचे कार्य करते, तिला परिचारिका असे म्हणतात.


सुमारे 100 वर्षांपूर्वी परिचारिका या व्यवसायाला हीन दर्जाचे समजले जाई. परंतु 19 व्या शतकात फ्लोरेन्स नाइटिंगेलने परिचर्या व्यवसायात आमूलाग्र बदल घडवून आणला. फ्लोरेन्स या इटीमधील देशात फ्लोरेन्स नाइटिंगेलचा जन्म 12 मे 1820 रोजी झाला. अत्यंत सधन तसेच खानदानी असे त्यांचे कुटुंब होते. वडिलांचे नाव विल्यम तर आईचे नाव फॅनी होते. तिच्या वडिलांनी तिला लॅटिन, ग्रीक, इतिहास, विज्ञान, गणित या विषयांचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. तसेच ती संख्याशास्त्रात निपुण होती. फ्लोरेन्स नाइटिंगेल बालपणापासूनच स्वतंत्र विचारांची मुलगी होती. याच सुमारास ती अनेक देशांच्या सहलीला गेली. त्यामुळे तिच्या ओळखी वाढत गेल्या. तिला कोणतेही कार्य मनापासून करण्याची जिद्द होती. तिला परिचर्या या क्षेत्राविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली. पण त्या वेळच्या रुग्णालयांची जी काही अवस्था होती, त्यावरून कोणतीही खानदानी स्त्री या क्षेत्रात काम करेल असे वाटत नव्हते. साहजिकच तिला घरातून प्रचंड विरोध झाला. त्यामुळे वयाच्या 33 व्या वर्षी तिला या क्षेत्रात काम करण्याची परवानगी मिळाली.


इ.स. 1854 ते 1856 या काळात रशिया विरुद्ध तुर्कस्तान असे क्रिमियन युद्ध झाले. या युद्धात तुर्कांना फ्रान्स, इंग्लंड मदत करीत होते. जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे रिलिजिअस सिस्टर्स होत्या. इंग्लंडकडे प्रशिक्षित नर्स नव्हत्या, तर अप्रशिक्षित पुरुष होते. त्यामुळे जखमी सैनिकांची काळजी व्यवस्थितपणे घेता येत नव्हती. या गोष्टीची बातमी तेथील वर्तमानपत्र टाइम्समधून प्रसिद्ध झाली. त्या वृत्तपत्रामधून इंग्लिश स्त्रियांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार फ्लोरेन्स नाइटिंगेलने आपला मित्र सिडनी हर्बर्टला कळवले. लगेच पाच दिवसांनी तिला सरकारतर्फे नेमणुकीचे पत्र मिळाले व 38 अप्रशिक्षित नर्सना घेऊन ती युद्धक्षेत्रावर हजर झाली.
तिच्याकडे सैनिकांच्या छावण्या देण्यात आल्या. त्या छावण्यांमध्ये जवळपास 1500 सैनिक रुग्ण होते. तेथील रुग्णालय अतिशय घाण, प्रचंड प्रमाणात दुर्गंधीयुक्त होते. तेथे पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. शौचालय तसेच बाथरूमची सोय नव्हती. अशा अवस्थेत जखमी सैनिक आपल्या रक्ताने माखलेल्या गणवेशासह जमिनीवर पडलेले असत. तेथे कॉलरा व अन्य संसर्गजन्य रोगांची लागण झाली होती. अनेक जखमी सैनिक जखमांमुळे मरण्याआधी रोगामुळेच मरण पावत असत. त्या वेळी उपचार केलेल्या रुग्णांपैकी 42 टक्के रुग्ण सैनिक मृत्यू पावत.
अशा वेळेस फ्लोरेन्स नाइटिंगेलने आपले कर्तृत्व पणास लावले. स्वत:च्या जबाबदारीवर स्टोअर्स उघडून स्वच्छतेच्या साहित्याचे वाटप केले. वेळप्रसंगी स्वत:च्या पैशाचा विनियोग केला. सर्व सैनिक रुग्णांना स्वच्छ केले. सर्वांना स्वच्छ कपडे दिले. सर्व बिछान्यांवर स्वच्छ अशा चादरी घातल्या तसेच सैनिक रुग्णांसाठी पाच स्वयंपाकगृहांची निर्मिती केली.


केवळ दोन महिन्यांमध्ये रुग्णालयाची परिस्थिती सुधारली. फ्लोरेन्सने स्वत:च्या पैशाने शवविच्छेदनाची सोय केली. परिणामी पूर्वी जो मृत्युदर 42 टक्के होता तो 2 टक्क्यांवर आला. तसेच सैनिकांच्या बायकांचा उपयोग कपडे शिवणे, कपडे धुणे याकरिता करून घेतला. शिवाय सैनिकांसाठी करमणुकीची सोय करण्यात आली. या सर्व कामांसाठी तिला दिवस पुरत नसे म्हणून ती रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन सर्व सैनिक रुग्णांची चौकशी तसेच देखभाल करीत असे. या कार्यामुळे प्रभावित होऊन सर्व जण तिला आदराने प्रकाशदेवी (lady with lamp) असे म्हणत असत.


या काळात अतिश्रमामुळे व सांसर्गिक रोगाच्या सान्निध्यात ती स्वत: आजारी पडली. तरीही विश्रांती न घेता सतत काम करत राहिली. या सर्व कामगिरीमुळे तिचे नाव इंग्लंडमध्ये इतके प्रसिद्ध झाले की त्या वर्षात जन्मणा-या अनेक मुलींची नावे फ्लोरेन्स ठेवण्यात आली. इंग्लंड सरकारने या कार्याचा उचित गौरव करून तिला रॉयल रेडक्रॉस (1883) व ऑर्डर ऑफ मेरिट (कॉमनवेल्थ) या दोन पुरस्कारांनी सन्मानित केले, तर जर्मन सरकारने तिच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले. 1860 नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाइटिंगेलने अप्रत्यक्षरीत्या काम केले. ती वयाच्या 80 वर्षांपर्यंत कार्य करीत राहिली. 13 ऑगस्ट 1910 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी तिला झोपेतच मृत्यू आला. वेस्ट मिनिस्टर अ‍ॅबे या प्रसिद्ध ठिकाणी तिचा अंत्यविधी करण्यात आला. अशा या महान विभूतीस विनम्र अभिवादन.