आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलांचे झाले अश्रू ! ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून सुरू झालेल्या एका आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटकाच्या कारकीर्दीची पुण्यातच सोमवारी सांगता झाली. राष्ट्रकुल घोटाळ्याची चिखलफेक अन्य कुणापेक्षाही सुरेश कलमाडी यांच्यावरच अधिक झाली. स्पर्धा उलटून दोन वर्षे होऊन गेली तरीही तो चिखल काही त्यांच्या प्रतिमेपासून दूर झाला नाही. सोमवारी आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कतारच्या दलहाम अल हमाद यांनी कलमाडी यांना अवघ्या दोन मतांनी मात दिली. कलमाडी यांच्या डोक्यावरचा क्रीडा क्षेत्रातील मक्तेदारीचा अखेरचा ‘ताज’ही निखळून पडला. कलमाडींच्या या दुर्दशेला तेच जबाबदार आहेत. ज्या बेदरकारीने त्यांनी कारभार आणि बेबंद भ्रष्टाचार केला, त्यामुळे भारताची जगभर छी-थू: झाली होती. कलमाडी यांच्या संघटनचातुर्याचा विचार करतानाच त्यांच्या अध:पतनास जबाबदार असलेल्या दुर्गुणांचाही विचार करायला हवा. यशाच्या शिखरावर असताना वेगळ्याच धुंदीत कलमाडी वावरले. त्या वर्तणुकीला उद्दामपणाचीही अधूनमधून जोड लाभली.

भोवतालच्या कंपूची निवड करताना चांगल्या प्रतिमेचा मापदंड वापरला नाही. त्यामुळे अप्रप्रवृत्तींच्या कोंडाळ्यात सापडलेल्या कलमाडींना अपयशाच्या गर्तेत कसे चाललो आहोत याची जाणीवही झाली नाही. डावपेचात कलमाडी कमी पडले हे मनाला पटणारे नाही. कारण तब्बल तीन दशके क्रीडा क्षेत्रात सक्रिय असणा-या कलमाडींसाठी अशा निवडणुका म्हणजे पोरखेळ होता. आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या इतिहासात प्रथमच सर्वच्या सर्व म्हणजे 45 देशांचे प्रतिनिधी मतदानासाठी हजर होते. बाद झालेली सात मते कुणाच्या बाजूची होती हा या निवडणूक प्रक्रियेतील एक अनुत्तरित परंतु महत्त्वाचा भाग होता. 18-20 अशा मतांच्या फरकातील प्रत्यक्ष फरक अवघ्या एका मताचा होता. हमाद यांना मिळालेले एक मत कलमाडींच्या पारड्यात पडले असते तर 19-19 अशा बरोबरीनंतर कलमाडी स्वत:च्या अध्यक्षपदाच्या मताच्या आधारे पुन्हा अध्यक्ष होऊ शकले असते. बाद ठरलेल्या सात मतांपेक्षा या फुटलेल्या किंवा गमावलेल्या एका मताचीच कलमाडी समर्थकांना अधिक काळजी वाटत होती. हा पराभव सकृतदर्शनी कलमाडी यांचा वाटत असला तरीही तो भारताचाही पराभव आहे.

राष्ट्रकुल घोटाळ्याचा कायम चष्मा लावून कलमाडी यांच्याकडे पाहणा-या प्रसिद्धिमाध्यमांच्या दृष्टीचा पराभव आहे. कलमाडी यांच्या पराभवाचे एक भारतीय हरला म्हणून दु:ख न मानता, आनंद व्यक्त करणा-यांचा हा पराभव आहे. यापुढे दोन वर्षे आशियाई संघटनेवर भारताचा प्रतिनिधी नसेल याची जाण नसलेल्यांचा हा पराभव आहे. राष्ट्रकुल किंवा अन्य मोठ्या स्पर्धांमध्ये जाहिरातींचे बजेट वाढवून मागणा-या काही माध्यमांचा हा पराभव आहे. एकीकडे भारतीय युवा अ‍ॅथलिटचा दर्जा उंचावत असताना त्यांच्यावर झालेला हा आघात मोठा आहे. आशियामधील स्पर्धांचे यजमानपद, अनुदान, प्रशिक्षणाच्या योजनांचा भारताकडे वळलेला ओघ या पराभवामुळे थांबणार आहे. कलमाडी यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील अस्तित्वाचा भारतीय अ‍ॅथलेटिक्सला अधिक फायदा झाला होता. कारण अ‍ॅथलेटिक्स हा खेळ त्यांच्या अधिक आवडीचा होता. ज्या काळात पुरस्कर्त्यांची वानवा होती त्या काळात कलमाडी यांनी तो ओघ अ‍ॅथलेटिक्स या खेळाकडे वळवला.

पैसा आल्यामुळे या खेळातील युवा खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण, सोयी-सुविधा मिळायला लागल्या. प्रशिक्षणार्थींना राहण्यासाठी दर्जेदार होस्टेल मिळाले. चांगल्या दर्जाचा, सकस आहार मिळायला लागला. अ‍ॅथलेटिक्स या खेळातील रोख पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ झाली. देशातील प्रमुख प्रशिक्षण केंद्रांवर ऑलिम्पिक दर्जाच्या प्रशिक्षण सोयी मिळायला लागल्या. चांगले परदेशी प्रशिक्षक आणावेत ही कल्पना कलमाडी यांचीच. त्यांनी फेडरेशनकडे परदेशी प्रशिक्षक आणण्याबाबत कायम आग्रह धरला. भारतीय अ‍ॅथलिट ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे हादेखील मोठा बहुमान आहे. जगातील आठ सर्वोत्तम खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडू आता पोहोचायला लागले आहेत. आशियाई स्तरावर पदके मिळवायला लागले आहेत. दिल्ली व पुण्यातील संकुलावरच्या सोयी-सुविधा जागतिक दर्जाच्या बनवल्या. कलमाडी यांनी या खेळाच्या विकासासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवला होता.

दुर्दैवाने त्यांची जागा घेऊ शकला असता असा शरद पवार यांचा अपवाद वगळता एकही राज्यकर्ता महाराष्ट्रात नाही, असे खेदाने नमूद करावे लागते. कलमाडी यांच्यावर तोंडसुख घेणा-यांपैकी एकाही पुढा-याला महाराष्ट्राबाहेरदेखील आपली क्रीडा क्षेत्रातील ओळख निर्माण करता आली नाही. आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनेतील राजकारण, सत्ताकारण समजू शकेल असा एकही राजकीय नेता अथवा क्रीडापटू महाराष्ट्राकडे नाही. कलमाडी यांच्या महत्त्वाकांक्षेतून उभा राहिलेला बालेवाडी क्रीडा संकुल प्रकल्प पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र सरकार किंवा क्रीडा संघटक यांच्याकडे कोणतीही परिणामकारक योजना नाही. बालेवाडीतील अनेक क्रीडा सुविधा वापराविना पडून आहेत. त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या उदयोन्मुख खेळाडूंसाठी किती केला जातो? महाराष्ट्रातील सर्व क्रीडा संघटकांची तक्रार आहे की बालेवाडीतील सुविधांचा वापर आम्हाला परवडण्यासारखा नाही. महाराष्ट्र शासन त्या सुविधांच्या वापरासाठी प्रचंड दर आकारत आहे. कलमाडी यांचे अस्तित्व पुसून टाकण्यापेक्षा त्या गोष्टीवर अधिक विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राबाहेरचा एक खेळाडू गगन नारंग येथे आपली शूटिंग अकॅडमी चालवून ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाज तयार करू शकतो. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात असा कुणीच ‘नारंग’ अस्तित्वात नाही? याच गगन नारंगला बालेवाडीतून हुसकावून लावण्याचे राजकारण महाराष्ट्राचे क्रीडा संघटक व्यवस्थित करू शकतात. महाराष्ट्राला अशा विध्वंसक मनोवृत्तीची नाही तर काहीतरी करून दाखवण्यासाठी स्वत:ला झोकून देणा-या क्रीडा संघटकांची गरज आहे.

कलमाडी पर्व संपले आहे. त्यांची जागा घेणारा नवा, युवा क्रीडा संघटक महाराष्ट्राला हवा आहे. राजकारणातील कामाचा व्याप व ताण सहन करून क्रीडा क्षेत्रालाही वेळ देणारा नेता महाराष्ट्राला हवा आहे. राजकारण आणि खेळ यांची सांगड घालणारा द्रष्टा क्रीडा संघटक हवा आहे. ज्याच्याकडे भविष्यातील योजना आखण्याची क्षमता आहे, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील बदल पाहण्याची, ते समजून घेण्याची कुवत आहे असा स्वत:च्या व्यवसायाकडेही दुर्लक्ष करून क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणारा क्रीडा संघटक महाराष्ट्राला हवा आहे. कलमाडी यांनी उभ्या केलेल्या साम्राज्याचा राजदंड पेलवण्याची क्षमता असणारा क्रीडा प्रशासक हवा आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांमधील राजकारण समजून घेणारा संघटक हवा आहे. निवडणुकीत मतांसाठी ‘लॉबिंग’ करण्याची क्षमता आणि अक्कल असणारा क्रीडाकुशल पुढारी हवा आहे. महाराष्ट्रात पुढे येऊन काम करण्यास मज्जाव नाही. कलमाडी यांनीही पुण्यातूनच क्रीडाकौशल्य आणि संघटनकार्याची मुहूर्तमेढ रोवली होती. घाम आणि अश्रू गाळत त्यांनी उभारलेल्या साम्राज्याला राष्ट्रकुल घोटाळ्याचा कलंक लागला आणि आजवर कलमाडींना मिळालेल्या फुलांचे अश्रू झाले. ज्या पुण्याने त्यांना आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील शिखरे सर करण्याची ऊर्जा, उत्साह दिला, त्याच पुण्याने सोमवारी त्यांना बदललेल्या काळातील सत्याची जाणीव करून दिली.