आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्य निधी आणि फॉक्सकॉन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील ज्या देशांत आज मजबूत आणि मोठे व्यवहार असलेले भांडवली म्हणजे शेअर बाजार आहेत, ते देश विकसित मानले जातात आणि ज्या देशांत भांडवली बाजारात गुंतवणूक कमी आहे, ते देश अविकसित मानले जातात, हा काही योगायोग नव्हे. सरकारला आपल्या आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी तसेच खासगी उद्योजकांना भांडवल उभारणीसाठी अशा बाजारांची गरज जगभर मान्य केली असल्याने जगातील निम्म्याअधिक देशांनी भांडवल उभारणीचा हा मार्ग स्वीकारला आहे. आज भारतीय शेअर बाजारातील उलाढाल जगात नवव्या, दहाव्या क्रमांकावर आहे, मात्र भारत हा काही विकसित देश मानला जात नाही. पण त्याचे कारण वेगळे आहे.
भारतातील ९५ टक्के नागरिकांनी गुंतवणुकीचा हा मार्ग अनेक गैरसमजांमुळे बाजूला ठेवला आहे आणि पारंपरिक पद्धतीने सोन्यात आणि मुदत ठेवीत पैसे ठेवणे पसंत केले आहे. त्यामुळे भांडवल उभारणीवर भारताला नेहमीच मर्यादा राहिल्या आहेत. शेअर बाजारात सध्या जी उलाढाल होते ती सर्व परकीय करतात आणि भारतातील पैसा बाहेर घेऊन जातात. शेअर बाजारातील देशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली पाहिजे, असे जे म्हटले जाते, त्याचे कारण हेच आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सहा कोटी कर्मचाऱ्यांच्या साडेआठ लाख कोटी रुपये निवृत्तिवेतन फंडातील पाच टक्के निधी शेअर बाजारात गुंतवण्याचा घेतलेला निर्णय म्हणूनच ऐतिहासिक म्हटला पाहिजे. असे करण्यास कर्मचारी संघटना गेली काही वर्षे विरोध करत होत्या. मात्र अखेर त्यांनाही या गुंतवणुकीचे महत्त्व पटलेले दिसते. निवृत्तिवेतन फंड असा गुंतवून सदस्य कर्मचाऱ्याला अधिक लाभ मिळवून देण्याची ही पद्धत सर्व विकसित देशांत वापरली जाते. तो मार्ग आता भारतीय नोकरदारांनाही खुला झाला आहे. या निर्णयानुसार या आर्थिक वर्षात तब्बल पाच हजार कोटी रुपये शेअर बाजारात येणार आहेत.
सध्या हा निधी फक्त सरकारी रोख्यांत गुंतवला जातो आणि त्यावर ८.७५ टक्के परतावा मिळतो. मात्र वाढती महागाई लक्षात घेता हा परतावा ३ ते ४ टक्क्यांच्या वर जात नाही. पण नव्या बदलाने यापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. ज्या गुंतवणुकीत धोका पत्करण्याची तयारी असते, तिचा परतावाही अधिक असतो आणि ती तयारी नसेल तर परतावाही कमी, हे ओघाने आलेच. त्यामुळे भविष्य निर्वाहच्या सभासदांना यापुढे हे तत्त्व स्वीकारावे लागणार आहे. शेअर बाजारात पैसा टाकल्यावर जी जोखीम असते ती ‘ईटीएफ’च्या माध्यमातून कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच त्याचे व्यवस्थापनही सरकारी नियंत्रण असलेल्या स्टेट बँकेच्या व्यवस्थापनावर सोपवण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील आणि आणखी काही निधी (पण जास्तीत जास्त १५ टक्के) आम्ही शेअर बाजारात गुंतवू, असेही कामगार मंत्रालय आणि भविष्य निर्वाह संघटनेने म्हटले आहे.
पैसा हा फिरत राहिला पाहिजे आणि त्यातून देशाची उभारणी झाली पाहिजे, या आजच्या गरजेची या निर्णयाने काही प्रमाणात पूर्तता होऊ शकते आणि कर्मचाऱ्यांनाही चांगला परतावा मिळू शकतो, त्यामुळे या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. अर्थात शेअर बाजार म्हणजेच सर्वस्व, असा कोणी समज करून घेणार असेल तर तेही चुकीचे आहे. कारण त्या माध्यमातून जगात कसा पैसा फिरतो आहे आणि त्याचे किती विपरीत परिणाम होत आहेत, हे आपण पाहत आहोत. खरी गरज आहे ती उद्योग आणि त्या माध्यमातून रोजगार वाढीची. त्यामुळे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांत जगात आघाडीवर असलेली फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रात करत असलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या म्हणजे ५० हजार रोजगार संधींच्या गुंतवणुकीचे अधिक स्वागत आहे. हे घडवून आणणाऱ्या महाराष्ट्र सरकारला त्याचे श्रेयही दिलेच पाहिजे. मात्र, एक महत्त्वाची आठवणही करून दिली पाहिजे. नव्याने येणारी गुंतवणूक आता तरी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या बाहेर म्हणजे जेथे गरज आहे, अशा नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, अमरावती, अहमदनगर अशा शहरांत येण्याची गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात तशी ही गुंतवणूक देशातील सर्वात मोठी गुंतवणूक असूच शकते, मात्र तिची गरज आता फुगलेल्या शहरांत नसून मध्यम शहरांत आहे. मुंबईची गेली काही दशके उद्योगांमुळे वाढ झाली, तसेच तिचे बकालीकरणही झाले आहे आणि कोठेतरी ते थांबवण्याची गरज आहे. तीच गोष्ट पुण्यासाठीही खरी आहे. असे असताना फॉक्सकॉन कंपनी खालापूर, पेण, खोपोली आणि तळेगाव या ठिकाणी म्हणजे पुन्हा मुंबई-पुण्यातच गुंतवणूक करणार आहे. गुंतवणूक करणारी कंपनी काही अटी टाकून गुंतवणूक करत असते, हे समजण्यासारखे आहे. मात्र, भविष्यात तरी राज्याच्या गरजेनुसार परदेशी कंपन्या गुंतवणूक करतील, जेणेकरून विभागीय समतोल राखला जाईल, याची काळजी फडणवीस सरकारने घेण्याची गरज आहे.