पाकिस्तानचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शरीफ कुटुंबीयांच्या विरोधात २७५ पानांचा एक अहवाल न्यायालयात सादर केला असून अहवालातील अनेक गोष्टी लाल शाईने अधोरेखित केल्या आहेत. या अहवालात नवाझ शरीफ व त्यांचे कुटुंबीय चौकशी समितीला सहकार्य करत नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने शरीफ व त्यांच्या संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा मागितला आहे. शरीफ कुटुंबीयांनी आरोप फेटाळले आहेत. ते आरोपातून सुटले तरी त्यांची सत्तेवरची पकड पूर्वीसारखी राहणार नाही.
१९९० ते १९९३ या काळात शरीफ यांनी लंडनमध्ये चार फ्लॅट खरेदी केले होते. १९९७मध्ये त्यांच्याच सरकारने या प्रकरणाची चौकशी बंद केली होती. २०१४ मध्ये पुन्हा पुराव्याअभावी चौकशी बंद केली होती. पण गेल्या वर्षी पनामा पेपरमध्ये शरीफ यांच्या कथित फ्लॅट खरेदीची माहिती प्रसिद्ध झाली. या माहितीत फ्लॅटची मालकी शरीफ यांच्या मुलांच्या नावावर असून ही खरेदी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून झाली होती. या माहितीच्या आधारावर तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करून नवाझ शरीफ हे पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत, असा आरोप केला.
सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर संयुक्त चौकशी समिती (जेआयटी) नेमली. या समितीत लष्कर व नागरी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. जेआयटीच्या अहवालावर सुप्रीम कोर्टाने अजून निर्णय दिलेला नाही. पण अशी शक्यता आहे की, नवाझ शरीफ यांना आपली बाजू मांडण्यास वेळ दिला जाईल व त्यानंतर त्यांना पद सोडण्यास सांगितले जाईल.
या संपूर्ण प्रकरणावर एक स्तंभलेखक फसी जका यांचे असे मत आहे की, जेआयटीचा अहवाल शरीफ यांच्याविरोधात असेल. त्यामुळे शरीफ यांनी आपली संपत्ती कायदेशीर मार्गाने निर्माण केली आहे, असे त्यांना सिद्ध करावे लागेल.
शरीफ कुटुंबीयांचे असे म्हणणे आहे की, कतारचे एक राजपुत्र शेख जासीम बिन जबर अल-थानी यांनी फ्लॅट खरेदी करण्यास पैसे दिले होते. या दाव्याला जेआयटीने धुडकावून लावले आहे. चौकशी समितीला अशा व्यवहाराचे कोणतेच पुरावे मिळालेले नाहीत. नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम यांच्यावर खोटे दस्तऐेवज सादर केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात एक खटला सुरू आहे. काही संसद सदस्यांचे असे म्हणणे आहे की, जेआयटीमध्ये अनेक लष्करी अधिकारी असल्याने शरीफ यांना धोका आहे. या अधिकाऱ्यांना नवाझ शरीफ यांचे भारतप्रेम खटकत आहे. शरीफ यांना भारताशी चांगले संबंध असावेत, असे वाटते. शरीफ यांना पदावरून हटवल्यास पाकिस्तानमधील स्थैर्य, समृद्धी धोक्यात येईल. © 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved.