आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी पहिली चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या लहानपणीची घटना. घरात दसरा काढणं चाललेलं होतं. स्वयंपाकघरातील डब्यांची मांडणी काढताना पेपरखाली बरीच जीर्ण झालेली एक पाच रुपयांची नोट मला दिसली. नोट दिसताच मी अगोदर आई आजूबाजूला आहे का ते पाहिलं. मात्र, आई दुसर्‍याच कामात व्यग्र होती. त्यानंतर ती नोट थरथरत्या हाताने उचलली आणि माझ्या दृष्टीने सुरक्षित जागा म्हणजे दप्तरातील कंपास पेटीत ठेवून दिली. परत कामाला लागले. मात्र, कामातही लक्ष लागेना. आई त्या नोटेबद्दल विचारेल का... असे विचार माझ्या मनात येऊ लागले. नंतर मी त्या पाच रुपयांतून माझ्या मैत्रिणीच्या कानात आहेत तसे सुंदर कानातले घ्यायचे ठरवले. आईने मला 5 रुपये दिले आहेत, असे माझ्या मैत्रिणीला खोटेच सांगून तुझ्यासारखे कानातले घ्यायचे आहेत. आम्ही दोघी दुकानात गेलो, तर समोरूनच माझी आई आणि काकू येताना दिसल्या. तेव्हा मैत्रिणीला कानातले घ्यायचे आहेत, अशी थाप मारली. गुलाबाच्या फुलांसारखे लाल आणि निळ्या रंगाचे सुंदर लोंबते कानातले माझ्या बहिणीसाठी एक आणि माझ्यासाठी एक असे दोन जोड घेतले आणि घरात लपवून ठेवले. आपली चोरी तर पकडली जाऊ नये आणि कानातले तर घालायचे आहेत. ते घालावे कसे याचाच विचार करत होते. एकदा मी शाळेतून घरी आले तर आई म्हणाली, ‘मनू, लवकर तयार हो. आपल्याला बाहेर जायचे आहे.’ ती तयार होती. ‘माझे पाच रुपये हरवले आहेत. ते सापडतील का, हे विचारण्यासाठी शेजारच्या एका जाणत्या बाईकडे जायचे आहे.’ हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी आईला खरे काय ते सांगून टाकले. आईने ही गोष्ट वडिलांना सांगितली. वडिलांची तर आम्हाला खूप भीती वाटायची. मात्र, ते रागावले नाहीत. ते म्हणाले, ‘तुला कानातले घ्यायचे होते तर मला सांगायचे. घरातून कोणाला न विचारता पैसे घ्यायचे नाहीत. त्याला चोरी म्हणतात.’ तेव्हाच मला ‘चोरी’ या शब्दाचा अर्थ कळला अन् रडू कोसळले. यापुढे असे न करण्याचा निर्धार केला.