आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातासमुद्रापार पोहोचला श्रीगणेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक-सामाजिक विशेष पाऊसधारांच्या सोबतीनेच साकार होतो. जगभर या उत्सवाचे आकर्षण आणि कुतूहल असते. अमराठी काय किंवा विदेशी काय, अनेक अभ्यासक, संशोधकांना या उत्सवाने भुरळ घातली आहे.

दरवर्षी दिमाखाने साजरा होणारा गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक-सामाजिक विशेष पाऊसधारांच्या सोबतीनेच साकार होतो. जगभर या उत्सवाचे आकर्षण आणि कुतूहल असते. अमराठी काय किंवा विदेशी काय, अनेक अभ्यासक, संशोधकांना या उत्सवाने भुरळ घातली आहे. तोच गणेशोत्सव आपण सध्या साजरा करतो आहोत. या उत्सवाची परंपरा आपल्या संस्कृतीत प्रदीर्घ स्वरूपाची आहे. या उत्सवाला अनेक पैलू असणारे सामाजिक आयाम आणि संदर्भही आहेत. दरवर्षी हा उत्सव नित्य नव्या उत्साहाने, जल्लोषाने साजरा होतो. महागाईचा वेलू गगनावरी चढत चालला असतानाही
सण साजरा करण्याची एक विलक्षण मानसिकता भारतीय मनांमध्ये असते, याचा प्रत्यय या उत्सवाच्या निमति्ताने येतो. त्याचे सार्वजनिक आणि वैयक्तिक ही दोन्ही रूपे विलोभनीय असतात.

पुण्यातल्या गणेशोत्सवाची परंपरा आधुनिक काळात लोकमान्य टिळकांसारख्या युगप्रवर्तक समाजसुधारकांशी जोडली गेली आहे. गणेशोत्सव आणि शिवजयंती या उपक्रमांना सार्वजनिक स्वरूप देण्यामागे लोकमान्यांचे अनेक उद्देश होते आणि ते बऱ्याच अंशी सफल झाले होते, असे इतिहासात डोकावल्यास म्हणता येते. लोकमान्यांच्या राजकारण व समाजकारणाला सुसंगत असेच या उत्सवाचे स्वरूप होते. प्रामुख्याने उपक्रमशील कार्यकर्त्यांची जडणघडण आणि एकाच भावनेने भारलेला, एकत्र आलेला समाज त्यांना अभिप्रेत असावा. पुण्यातील ज्या गणेश मंडळांना शतकाहून मोठी परंपरा आहे, त्यांचे जुने अहवालही याची साक्ष देतात.
उत्सवाच्या निमति्ताने एकविचाराचा समर्पणशील कार्यकर्त्यांचा मोठा गट निर्माण होतो. उत्सवाचे सार्वजनिक रूप म्हणून अन्य कार्यकर्त्यांना जमवणे, एकत्र आणणे, उत्सवासाठी मंडळाचे उपक्रम आखणे, त्याचे विभाग पाडून योग्य त्या कार्यकर्त्यांमध्ये त्या त्या जबाबदाऱ्या वाटणे, त्या पार पडत आहेत ना, याकडे लक्ष पुरवणे, सर्व कामांचा आणि कार्यकर्त्यांचा समन्वय ठेवणे, उपक्रमांसाठी योग्य आणि आवश्यक तो निधी उभारणे, त्याचे हिशेब ठेवणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत उत्सव पोहाेचवणे, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांची आखणी करणे, त्यासाठी कलाकार व अन्य संबंधति यंत्रणांकडे लक्ष पुरवणे..अशा कामांतून एक सजग, संवेदनशील नेतृत्व उभे राहावे, असा उद्देश नक्कीच होता. तो बव्हंशी पूर्ण झाल्याचे चति्र आहे.
या उत्सवाच्या निमति्ताने पुणेकर तर एकत्र येतातच, पण उत्सवाची लोकप्रियता आता सातासमुद्रापार पोहोचल्याने खास गणेशोत्सवासाठी येणारी मराठी मंडळीही अनेक अाहेत. कोकणातली मंडळी जशी गणपतीसाठी आपापल्या गावांकडे धाव घेतात, त्याच ओढीने गौरी-गणपतीच्या सणासाठी येणारी पुणेकर मंडळीही आहेत. शिवाय गणेशोत्सव पर्यटनाच्या नकाशावर आल्यापासून तर अनेक विदेशी पर्यटकही या दहा दिवसांत आवर्जून हजेरी लावतात. विसर्जन मिरवणुकीत तर अनेक परदेशी पर्यटक सहभागी होताना दिसतात.
प्रारंभी अगदी मर्यादति किंवा मोजक्या संख्येने असणारी गणेश मंडळे महाराष्ट्र राज्याच्या निर्मतिीनंतर क्रमाने वाढत गेल्याचे दिसते. बदलत्या काळाचे प्रतिबिंब या उत्सवावरही पडावे, हे स्वाभाविक होते. कार्यकर्त्यांची नवी फळी आली तसे नवे विचारही आले. उत्सवाचे स्वरूपही बदलत गेले. लोकसंख्येच्या वाढीप्रमाणे मंडळेही वाढली. कार्यकर्त्यांचे तर मोहोळ तयार झाले. पुण्याच्या बाबतीत पानशेत धरणफुटीनंतर पुण्याचा पेठांपुरता असणारा छोटेखानी लूक पार बदलला. पुणे विस्तारले, पसरले आणि त्या नव्याने वसलेल्या भागांत नवी मंडळे उदयाला आली. साहजिकच नव्या कार्यकर्त्यांनी नव्या पद्धतीने उत्सव साजरा करायला सुरुवात केली.
पूर्वीच्या गणेशोत्सवात मंडळांचा, कार्यकर्त्यांचा भर असायचा तो दर्जेदार मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा. अभिजात संगीताच्या अनेक मैफली आणि देशभरातील मान्यवर कलाकार गणेशोत्सवाच्या निमति्ताने पुणेकर रसिकांना ऐकायला-पाहायला मिळत. (हे कार्य १९५६ नंतर सवाई गंधर्व संगीत महोत्सवाने केले) नव्याने लोकप्रिय होऊ लागलेले भावगीतांचे जलसे गणेशोत्सवातूनच लोकांसमोर आले होते. जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्स्ना भोळे...अशा अनेक मान्यवर कलाकारांच्या रात्रभर चालणाऱ्या मैफली हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैभव होते. दहाही दिवस गणेश मंडळाच्या मंडपात हे कलाकार सेवा रुजू करत असत. मुख्य म्हणजे रसिकांसाठी हे सर्व कार्यक्रम मोफत उपलब्ध असत.

काळानुसार मनोरंजनाऐवजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशापुढे अनेक आकर्षक देखावे उभारण्याची पद्धत सुरू केली. पौराणिक ,ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संदर्भांची अनेक कलात्मक रूपे या निमति्ताने पुढे आली. देखावे घडवणारे कलाकार, रंगकाम करणारे, सजावटकार...असे नवे कलाप्रकार निर्माण झाले. हळूहळू देखावा स्पष्ट करणारा मजकूर नाहीसा होऊन त्याला नव्या यंत्र-तंत्रांची जोड मिळाली. देखावे आता दृकश्राव्य झाले. अधिक आकर्षक आणि सूक्ष्म तपशील देणारे झाले. त्यांना प्रकाशयोजनेची साथ मिळाली. काही मंडळांनी दरवर्षी भव्य-दिव्य देखाव्यांची परंपराच निर्माण केली. देखावे पूर्वी स्थिर असत. आता ते हलते, चालते, फिरते, उडते झाले आहेत. वैज्ञानिक देखावे तयार करणारी मंडळे आली. हे देखावे पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले. त्या गर्दीला शिस्त लागावी म्हणून रांगा लागू लागल्या. मग चढाओढ सुरू झाली. कुणाच्या देखाव्याची रांग कुठपर्यंत गेली, हा प्रेस्टीज पॉइंट ठरू लागला. अधिकाधिक चमत्कृती, आकर्षकता आणण्याचा प्रयत्न सुरू झाला.

कार्यकर्त्यांनी स्वखुशीने उचललेला आर्थिक भार, असे गणेशोत्सवाचे अगदी प्रारंभीचे रूप होते. हळूहळू हा भार फक्त कार्यकर्त्यांना पेलेनासा झाला. चढाओढीने उत्सव साजरा करण्याचा पायंडा रूढ झाला तसा खर्चाचा आकडाही वाढला. मग आसपासच्या मंडळींकडे वर्गणी मागण्याची पद्धत पडली. आज मात्र या वर्गणीला काही ठिकाणी खंडणीचे रूप येऊ लागले आहे की काय, अशी परिस्थतिी निर्माण झाली आहे. गणेशोत्सव हा नागरिक, कार्यकर्ते, कलाकार यांनी एकत्र येण्याचा सोहळा आहे. तिथे अनावश्यक झगमगाट, चमचमाट नसावा, याचे भान सुटून काही मंडळे विनाकारण सेलिब्रिटीज आणण्याचा दुराग्रह धरतात आणि बजेट वाढवून ठेवतात, असेही चति्र काही ठिकाणी आहे.

लांबणारी विसर्जन मिरवणूक
दहा दिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या गणरायाला त्या वर्षापुरता निरोप देण्याचा प्रसंग खरे तर कार्यकर्ते आणि सर्वसामान्य भाविकांसाठी एक हळवा प्रसंग असतो. पण या हळव्या प्रसंगाला मिरवणुकीचे रूप आल्यावर पुन्हा एकदा मिरवामिरवी, रुसवेफुगवे, भांडणे यांची भर पडत गेलेली दिसते. मानाच्या गणपतींनंतरच्या मंडळांना शिस्तीचे वावडे असावे, इतकी विसर्जन मिरवणूक गेल्या काही वर्षांत रेंगाळू लागली आहे. गर्दीचे उच्चांक स्थापन होऊ लागले आहेत. नव्या काळाने उभी केलेली काही आव्हानेही जाणवत आहेत. त्यावर मात करूनही हा वैभवशाली उत्सव असाच साजरा होत राहावा, त्यातील विघातक अपप्रवृत्तींना सत्प्रवृत्त होण्यासाठी श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळावा आणि या उत्सवाच्या निमित्ताने घडणारे सामाजिक, सांस्कृतिक संचिताचे दर्शन असेच अविरत राहावे, ही प्रार्थना.

(लेखिका या दैनिक दिव्य मराठी पुणे ब्युरो चीफ आहेत.
jayashree.bokil@dainikbhaskargroup.com)