Home | Editorial | Agralekh | ganga river and swami nigamananda

जय गंगे भागीरथी!

divya marathi | Update - Jun 16, 2011, 12:38 AM IST

गंगा प्रदूषणाचा प्रश्न जितका जुना तितकाच गुंतागुंतीचाही आहे.

  • ganga river and swami nigamananda

    हरिद्वार येथील गंगेच्या पात्रात धुडगूस घालणा-या वाळू माफियांविरोधात उपोषणाला बसलेले परंतु उपचारादरम्यान प्राणास मुकावे लागलेले स्वामी निगमानंद हे अनेक अर्थाने दुर्दैवीच म्हणायला हवेत. खरे तर निगमानंद आणि बाबा रामदेव हे एकाच संन्यासी कुळातले. दोघांची कर्मभूमीही एक. दोघांवर उपचार झालेले रुग्णालयही एक आणि उपचारांची वेळही तीच. पण फेब्रुवारी महिन्यापासून आमरण उपोषणाला बसलेल्या निगमानंद यांची ना संघपरिवाराने वास्तपुस्त केली, ना भाजपच्या सुषमा स्वराज आदी परफॉर्मर मंडळींनी त्यांच्यासाठी राजघाटावर नृत्याधारित आंदोलनाचा घाट घातला. ना उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नाकदु-या काढल्या. ना श्री श्री रविशंकर, मोरारीबापूसारख्यांची पावले मनधरणी करण्यासाठी त्यांच्याकडे वळली. रामदेव बाबांचे मन वळवले, जग जिंकले; या आनंदात असलेल्या यातल्या एकानेही निगमानंदांच्या जाण्याचा शोक व्यक्त करण्याचे सौजन्यही दाखवले नाही. उत्तराखंडमध्ये विरोधी बाकांवर बसणा-या काँग्रेसने निगमानंदांच्या संशयास्पद मृत्यूमुळे चालून आलेली राजकीय संधी हेरत भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा बळेबळे निर्धार जाहीर केला. पण सगळा फोकस मलूल चेह-याच्या, गिरे तो भी टांग ऊपर अशा आविर्भावात रुग्णालयाबाहेर पडणा-या रामदेव बाबांवरच राहिला. अतिउत्साही मीडियालासुद्धा रामदेव बाबांच्या सप्ततारांकित आंदोलनाचा शेवट होत असताना निगमानंदांवर होत असलेल्या अन्यायाचा शोध लागला. राजकीय नेत्यांच्या आणि एकूणच समाजाच्या ढोंगी, लबाड आणि आपमतलबीपणाचे दर्शनच यानिमित्ताने घडले.
    वस्तुत: रामदेव बाबांच्या काळ्या पैशांविरोधातल्या हवेतल्या आंदोलनाच्या तुलनेत स्वामी निगमानंदांनी हाती घेतलेला गंगा प्रदूषणाचा प्रश्न आणि त्यासाठी सुरू केलेले शांततापूर्ण उपोषण हे या गंगा नदीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेल्या, तिला श्रद्धास्थानी मानणा-या ८० कोटी हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचे, कैक पटींनी महत्त्वाचे नि लक्षवेधी असायला हवे होते. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. गंगा नदीचे रूप आणि पावित्र्य कायम राहावे, भाविकांच्या श्रद्धांना तडा जाऊ नये या उद्देशाने गंगापात्राचा ताबा घेतलेल्या वाळू माफियांविरोधात स्वामी निगमानंदांनी १९ फेब्रुवारीपासून एका अर्थाने एकाकी असे उपोषण सुरू केले होते. हे वाळू माफिया केवळ वाळू उपसून गंगा नदीच्या अस्तित्वाला बाधा आणत होते इतकेच नव्हे, तर नदीपात्रात स्टोन क्रशर बसवून राजरोस खडीचा व्यवसायही करत होते. हीच बाब स्वामी निगमानंद आणि त्यांच्या समर्थकांना खटकत होती. मधल्या काळात उच्च न्यायालयात जाऊन वाळू उपसा बंदीवर स्थगिती आदेश मिळवल्याने माफियांचा मुजोरपणा टोकाला पोहोचला होता. इकडे हिंदूंचे तारणहार अशा तो-यात फिरणा-या भाजपकडे धर्माने हिंदू आणि त्यातही संन्यासी असलेल्या निगमानंदांनी तब्बल ११४ दिवस पुकारलेल्या आंदोलनाची साधी दखलही घ्यायला वेळ नव्हता.
    स्वामी निगमानंदांनी ज्यासाठी उषोषण केले होते तो गंगा प्रदूषणाचा प्रश्न जितका जुना तितकाच गुंतागुंतीचाही आहे. जवळपास पाच राज्यांतून वाहत जाणा-या गंगेवर अलीकडच्या काळात जितके आक्रमण, अतिक्रमण आणि अत्याचार झाले तितके जगात क्वचितच कुठल्याही राष्ट्रीय गौरव असलेल्या नदीवर झाले असतील. मध्यंतरी अमेरिकेतल्या कोलोरॅडो येथील नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅटमॉस्फिअर सेंटरने जगातल्या ९०० नद्यांचा अभ्यास प्रकल्प हाती घेतला होता. त्यात सततच्या अतिक्रमणामुळे गंगेचे पात्र अधिकाधिक अरुंद होत असल्याचा तसेच ५० वर्षांच्या तुलनेत सध्या नदीचे पाणी २० टक्क्यांनी कमी झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. ही एकमेव नदी ज्यामध्ये माशांच्या १४० प्रजाती, ९० प्रकारातले जलचर प्राणी तसेच दुर्मिळ असे पक्षी आढळल्याचा उल्लेख आहे. मात्र हे निसर्गधनही आता धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याच गंगेच्या अस्तित्वावर गदा आणणारा गंगा एक्स्प्रेस वे हा बलिया ते नोयडा असा ३० हजार कोटींचा प्रकल्प उत्तर प्रदेश सरकारने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत १९ जिल्ह्यांतील गंगा नदीपात्राशेजारच्या जमिनींवर अतिक्रमण होऊन सुपीक जमिनीचाच नव्हे, तर नदीचाही नाश ओढवणार आहे. अर्थात गंगा प्रदूषणाला जितके राजकीय-सामाजिक-औद्योगिक पैलू आहेत तितक्याच घातक अशा धार्मिक रूढी-परंपरांनी, विधी-उपचारांनीही गंगेचे पवित्र पाणी गढूळ करण्यास हातभार लावला आहे. श्रद्धेची बाब म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याचा धोकाही आपण वेळोवेळी पत्करला आहे.
    राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात १९८५ साली गंगा शुद्धीकरणाचा ‘क्लीन गंगा’ प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. कोट्यवधी रुपयांची त्यासाठी तरतूद करण्यात आली. त्यानंतरच्या २५ वर्षांमध्ये केंद्रामध्ये विविध सरकारे, आघाड्यांची सरकारे सत्तेवर येऊन गेली. उत्तर प्रदेशमध्येही किमान १० सरकारे आली आणि गेली. मात्र यापैकी एकाही सरकारने गंगा शुद्धीकरणाचा प्रकल्प धसास लावला नाही. त्यापैकी केंद्रातील तत्कालीन भाजपप्रणीत एनडीए सरकारला सत्तेत असताना जसा रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवता आला नाही, तसेच गंगेचे पावित्र्यही मिळवून देता आले नाही. (आता पुन्हा एकदा सात हजार कोटींच्या खर्चाचा गंगा शुद्धीकरणाचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. त्यासाठी जागतिक बँकेने भारत सरकारला जवळपास ४५० कोटींचे अर्थसाहाय्य देऊ केले आहे.) मधल्या काळात तर गंगा प्रोजेक्ट हाच अनेकांच्या उदरनिर्वाहाचे एक साधनही बनून गेला. त्यातूनच ठिकठिकाणी गंगेला विद्रूप करणा-या विघातक प्रवृत्ती सोकावल्या. गंगा चहूबाजूंनी प्रदूषित होतच राहिली. रामदेव बाबांच्या हायप्रोफाइल उपोषणात गंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर लढणा-या स्वामी निगमानंद यांना उपेक्षित पण मूकनायकाला शोभेलसे मरण आले. एका संन्याशाच्या बालिश हट्टाग्रहामुळे दुस-याचे बलिदान मात्र दुर्लक्षिले गेले.

Trending