आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दणदणाट रोखणार कसा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागरी वस्त्यांमधून उत्सवाच्या दोन महिने आधीपासूनच सुरू होणारा ढोल-ताशा पथकांचा सराव, उत्सवकाळात तासन् तास रेंगाळणाऱ्या मिरवणुका, पथकांची वाढती संख्या, पथकांमध्ये शिरलेले राजकारण आणि पर्यायाने पथकांचे बाजारीकरण हे सर्व चिंताजनक आहे.

नाशिक-पुण्याच्या ढोल-ताशा पथकांपासून प्रेरणा घेत गेल्या काही वर्षांत अवघ्या महाराष्ट्रात अशी पथकं पसरू लागली आहेत. पूर्वी सणासुदीच्या निमित्ताने ढोल-ताशे पाहणे एक सांस्कृतिक करमणूक होती; पण ढोल-ताशा पथकांमधील वाढत्या संख्येमुळे त्यातील करमणूक अस्तंगत होत असून या पथकांच्या अतिउत्साहला आवर घालण्यासाठी पोलिसांवर नियमावली करण्याची वेळ आली आहे. शिवाय या सांस्कृतिक उपक्रमाला आता कायद्याच्या कक्षेत आणावे लागले आहे. यंदा ढोल-ताशा वादनात घंटानादाने जास्त ध्वनी प्रदूषण होत असेल, तर अशा पथकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एका चौकात विशिष्ट वेळ वादन, पथकातील सदस्य संख्येवर मर्यादा तसेच पथकातील लहान मुलांचा सहभाग नको, अशा अटी असणारी नियमावली पोलसि आणि ढोल-ताशा पथक यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली आहे. या नियमावलीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात काही फरक पडतोय का, हे बघायला हवं.
सार्वजनिक उत्सवात कायदे कसे धाब्यावर बसवले जातात, हे नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात दिसून आले. उच्च न्यायालयाने बालगोविंदांच्या समावेशावरून व थरांवरून दहीहंडी मंडळांवर निर्बंध घालूनही राजकारण्यांनी, त्यांच्या समर्थकांनी हे निर्बंध सहजपणे उधळून लावले होते. त्यामुळे यंदाचीही दहीहंडी हुल्लडबाजी व डीजेच्या दणदणाटात साजरी झाली. आता गणेशोत्सव सुरू झाला आहे व पुन्हा डीजे व ढोल-ताशांचे दणदणाट सुरू झाले आहेत. वास्तविक, ढोल-ताशा पथकांचा प्रसार होण्यामागे एक कारण असे होते की, सरकारने रात्री दहाच्या नंतर पारंपरिक वाद्ये वाजवण्यास सूट दिल्यानेने बऱ्याचशा गणेश मंडळांनी मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांचा समावेश करण्यास सुरुवात केली. प्रारंभी पारंपरिक वेशभूषा आणि वाद्य यामुळे ही पथके मिरवणुकीची शोभा वाढवत असतात, असा दावा ही मंडळे करत असली, तरी वाद्यांचा दणदणाट करणे, दुसऱ्या मंडळांवर कुरघोडी करणे, सत्तासंघर्ष ही त्यामागील खरी कारणे असतात.
साठच्या दशकात पुण्यातल्या काही शाळांमध्ये खेळ किंवा उपक्रमाचे स्वरूप असलेली ढोल-ताशा, लेझीम पथके फक्त मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत भाग घेत असत. पुढे पुढे याच शाळांमधल्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी स्वत:ची स्वतंत्र पथके स्थापन करायला सुरुवात केली. पारंपरिकतेचा साज चढवलेली ही पथके डॉल्बी डीजेच्या जमान्यात या संगीताला पर्याय म्हणून साहजिकच उजवी ठरली. हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या, इमारतींना हादरे, कानाचे पडदे फाडणाऱ्या डॉल्बी-डीजेपेक्षा ढोल-ताशांचा नाद सुरुवातीच्या काळात तरी नागरिकांसाठी कर्णमधुर होता. मात्र, जसजशी पथकांची संख्या वाढू लागली, या प्रकाराला स्टेटस मिळू लागले, तसा पथकांमध्ये मानापमान, उन्माद, अहंपणा मूळ धरू लागला. पुढे एका पथकात फूट पडून वेगळा सवतासुभा निर्माण होऊ लागला. उत्सवाच्या काळात पथकांतर्गत होणारी भांडणे आणि मारामाऱ्या वाढू लागल्या. आज परिस्थिती अशी आहे की, महाराष्ट्रात मागील वर्षापर्यंत असणारी ढोल पथकांची संख्या ७५ वरून २०० वर गेली आहे. ढोल पथकांच्या वाढत्या संख्येमागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या व्यवसायात वेगाने शिरलेले अर्थकारण आहे. केवळ दहीहंडी, गणेशोत्सव, गुढीपाडवा यासारखे सणच नव्हेत, तर अनेक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये आता ढोल-ताशा पथकांना सुपाऱ्या मिळू लागल्या आहेत. काही पथके कॉर्पोरेट इव्हेंटमध्येही भाग घेऊ लागली आहेत. श्रीमंत लग्नसोहळ्यातही ही पथके पुढे-मागे भाग घेतील अशी परिस्थिती आहे.

ढोल-ताशा पथकांची वाढती संख्या हा एक भाग झाला; पण नागरी वस्त्यांमधून उत्सवाच्या दोन महिने आधीपासूनच सुरू होणारा या पथकांचा सराव, उत्सव काळात तासन््तास रेंगाळणाऱ्या मिरवणुका, पथकांची वाढती संख्या, पथकांमध्ये शिरलेले राजकारण, गुंडगिरी आणि पर्यायाने पथकांचे झालेले बाजारीकरण हे सर्व चिंताजनक आहे. पुण्यात किंवा अन्य शहरांमध्ये गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीपासूनच ढोल पथकांचा सराव नदीपात्रालगत, लॉन्स, लग्नाचे हॉल, शाळांची पटांगणे अशा ठिकाणी सुरू होतो. सतत तीन ते चार तास १०० डेसिबल ध्वनिमर्यादा ओलांडून सर्वत्र पोहोचणारा आवाज आणि तिथे होणारी बघ्यांची गर्दी यामुळे आसपासच्या नागरी वस्त्यांमधल्या नागरिकांना याचा त्रास होऊ लागला आहे. पथकातील ३० ते ४० वादकांचे एकत्रित ढोल-ताशा वाजवणे आणि एकाच ठिकाणी सुरू असलेला चार ते पाच पथकांचा सराव यामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त होऊन जातात. दिवसातील दोन-चार तास १०० डेसिबलहून अधिक आवाज सहन करणाऱ्या या नागरिकांच्या सहनशक्तीचे काय होत असेल? एेकणाऱ्याची ही स्थिती मग वाजवणाऱ्याचे काय, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. यावर पथकप्रमुख उत्तर देतात, "आम्ही आमच्या सहकाऱ्यांना कानात बोळे घालण्याचा सल्ला देतो.' पथकप्रमुख आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत असतील, तर त्यांनी इतरांच्या कानाचे पडदे फाटू न देता वाद्ये वाजवली पाहिजेत हे लक्षात घेतले पाहिजे. अशा ढोल-ताशा पथकांची क्रेझ केवळ पुण्या-मुंबई करता सीमित न राहता अगदी विदर्भा-मराठवाड्यापर्यंत पोहोचली आहेत. ठाणे, डोंबविली या ठिकाणी तर नवनवीन पथके उदयास येत आहेत. यंदा तर लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला ढोल-ताशा पथकाला बोलावण्यात आल्याचे वृत्त आले होते.

आपल्याकडे सार्वजनिक उत्सवांचे बाजारीकरण सुरू करण्यात राजकारण्यांनी हातभार लावला आहेच. आता पथकांची वाढती संख्या व त्यांची वाढती मागणी लक्षात घेता स्थानिक पातळीवरचे राजकारण करणारे या व्यवसायात उतरले आहेत. हे नेते ढोल घेण्याची ऐपत नसलेल्या पथकांना ढोल पुरवतात व त्या बदल्यात अशा पथकांकडून वर्षभर विविध कार्यक्रमात वादन करून घेतात. आता मिरवणुकीवेळी पथकांमध्ये सेलिब्रेटीजना आणण्याचे फॅड आले आहे. काही पथकांच्या तालमीच्या उद्घाटनापासूनच सेलिब्रिटीज हजर असतात, त्यामुळे तरुणांमधला जोश आणि क्रेझ राहते, असे या पथकप्रमुखांचे मत आहे. प्रत्यक्ष मिरवणुकीत सेलिब्रिटीज हजर असल्याने मंडळाला अपेक्षित असलेली गर्दी साहजिकच मिळते. जी पथके राजकारण्यांच्या मदतीशविाय स्वबळावर उभी राहिली आहेत, ती पथके सुपाऱ्या कमी घेतात. कारण या पथकांमध्ये सामील झालेले तरुण-तरुणी हौस म्हणून आलेले असतात. आता तर काही पथकांमध्ये लहान मुलेही वादन करताना दिसू लागली आहेत आणि अर्थातच ती आकर्षणाचा केद्रबिंदू ठरू लागली आहेत. मिरवणुकीत शाळांची पथकेही सहभागी होताना दसितात. १४ ते १५ तास चालणाऱ्या मिरवणुकांमध्ये मुलांच्या सहनशक्तीची मर्यादा संपून जाते. प्रसंगी ही मुले दमून रस्त्यावरच झोपून गेल्याचे प्रकार या आधीही घडले आहेत. अशा घटनांचे प्रमाण अगदी नगण्य असले तरी लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून पथके आपले मार्केटिंग करू शकतात. भविष्यात दहीहंडीसारखाच हा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(लेखिका या मुक्त पत्रकार आहेत.
Swapnaliabhang@gmail.com)