Home »Editorial »Agralekh» Ghalmodyachi Sammelan

घालमोड्यांचे संमेलन (अग्रलेख्‍ा )

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 09, 2013, 09:59 AM IST

  • घालमोड्यांचे संमेलन (अग्रलेख्‍ा )

प्रबोधनकारांचा वारसा असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव साहित्याशी सुतराम संबंध नसतानाही मराठी साहित्य संमेलनाला चालू शकते आणि आपल्या कर्तृत्वाने खरोखरच सामाजिक-साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या हमीद दलवाईंच्या नावावर मात्र मराठी साहित्य संमेलन कच खाते, हे या राज्याचे दुर्दैव आहे. चिपळूण येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सध्या याच मुद्दय़ावरून धुरळा उडला आहे. ह. मो. मराठेंच्या जातीय प्रचारावरून ठिणगी पडलेल्या यंदाच्या साहित्य संमेलनात गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या वादांमुळे वणवा पेटला आहे आणि मराठी साहित्यात समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब पडण्याचे सोडाच, उलट प्रत्येक संमेलनाच्या निमित्ताने झडणार्‍या वाद-प्रतिवादांतून, सर्मथने आणि बचावातून वेगळेच काहीतरी बाहेर पडत आहे. चिपळूण येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला देण्यात येणारे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि त्याचा प्रा. पुष्पा भावे, प्रा. प्रज्ञा दया पवार यांनी केलेला निषेध.. संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आलेली परशुरामाची प्रतिमा आणि त्याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने संमेलन उधळण्याची दिलेली धमकी.. हमीद दलवाईंच्या चिपळूणच्या मिरजोळी गावातील निवासस्थानापासून निघणारी संमेलनाची ग्रंथदिंडी आणि काही स्थानिक मुस्लिम पुढार्‍यांनी त्याला केलेला विरोध.. अशा अनेक वादांच्या जंत्रीमुळे यंदाच्या साहित्य संमेलनावर साहित्यबाह्य शक्तींच्या दहशतीचे सावट पसरले आहे. या सगळ्या घटनांमागे राजकीय शक्ती कशा कार्यरत आहेत, हे सध्या महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी कुठलाही धर्म, रूढी, परंपरा यांचा अडसर येऊ नये. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या धर्माचे परीक्षण करावे व हा देश धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र व्हावे, या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील अनेक विरोधांना तोंड देत समाजहितासाठी आयुष्यभर हसतमुखाने ज्यांनी लढा दिला, साठच्या दशकात धार्मिक कायद्याऐवजी समान नागरी कायद्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेबरोबर ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया’ असा वैचारिक ग्रंथ लिहून साहित्यविश्वातही मोलाची भर टाकली, पु. ल. देशपांडेंनी ज्यांचे वर्णन ‘एक र्शेष्ठ प्रबोधनकार’ असे केले, त्या हमीद दलवाईंच्या बाजूने उभे राहण्याचे सोडून शरद पवार हिंदुत्ववादी शक्तींच्या सर्मथनार्थ उभे राहिले आहेत. वास्तविक हमीद दलवाई हे शरद पवार यांचे घनिष्ठ व्यक्तिगत मित्र होते आणि राजकीय सहकारीही होते. हमीद दलवाईंच्या इस्लामी मूलतत्त्ववादी विरोधातील वैचारिक संघर्षाच्या शरद पवार पूर्ण बाजूने होते. इतके की हमीद दलवाईंचे अखेरचे दिवस शरद पवारांच्या सहवासातच गेले होते. किंबहुना सनातनी मुस्लिमांचा विरोध पत्करून पवारांनी दलवाईंची भूमिका सर्मथनीय मानली होती. आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला देऊ नये, ही मागणी फार कमी लोकांनी केली होती आणि त्याहीपेक्षा कमी लोकांनी हमीद दलवाई यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र त्या जातीयवादी शक्तींना पवारांनी चक्क पाठिंबा तर दिलाच, परंतु राष्ट्रवादीच्या त्यांच्या सत्तेत असलेल्या अनुयायांनी संमेलनाला कोट्यवधी रुपये मंजूरही केले. वस्तुत: महाराष्ट्र कायम निधर्मीवादाच्या आणि उदारमतवादाच्या बाजूने उभा असतो. शरद पवारांची ख्यातीच अशी आहे की कोणत्याही धर्मपरंपरेच्या आणि रूढिवादाच्या बाजूने ते नसतात. परंतु काही मोजक्या हिंदू-मुस्लिम अतिरेक्यांच्या प्रचाराला बळी पडून संमेलनाच्या आयोजकांनी शासनाला आणि शरद पवारांना अडचणीत आणले आहे. ज्या तडफेने पवारांनी जाहीर केले की बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य आहे, त्याच तडफेने त्यांनी हमीद दलवाईंच्या नावाचा मात्र पुरस्कार केला नाही. ज्या संमेलनाला उद्घाटक म्हणून शरद पवार जाणार आहेत, त्या पवारांनी हमीद दलवाई हे साहित्यिक म्हणून मोठे आहेत, असे आयोजकांना खडसावून सांगितले नाही. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊ नये, अशी भूमिका घेणार्‍या पुष्पा भावे यांना त्यानंतर रत्नागिरी-चिपळूणमध्ये प्रवेशबंदी केली जाते आणि दुसरीकडे समस्त राजकीय पक्ष बाळासाहेबांचे नाव व्यासपीठाला देण्यास काहीच हरकत नाही, अशी साळसूद भूमिका घेतात. मात्र हमीद दलवाईंसाठी एकही राजकीय पुढारी समोर येत नाही, हा या पुरोगामी राज्याचा फसवा चेहरा आहे. पुष्पा भावे यांना संरक्षण नाकारणार्‍या पोलिसांच्या कृतीचा जाब विचारण्याऐवजी राज्याचे गृहमंत्री ‘वादाचे गुर्‍हाळ घालण्यापेक्षा आधी संमेलन यशस्वी करून दाखवा’ असे म्हणतात, तेव्हा त्यांची वैचारिक पातळी आपोआपच सिद्ध होताना दिसते. एकीकडे, परशुरामाने कोकणभूमी वसवली आणि म्हणूनच निमंत्रण पत्रिकेवर त्यांची प्रतिमा छापण्यात आली, ही कृती वाटते तितकी साधी सोपी दिसत नाही. आज संपूर्ण भारतात स्त्रियांवरील अत्याचारांमुळे समाज प्रक्षुब्ध झाला असताना राज्यातील एका सर्वात मोठय़ा साहित्यिक सोहळ्यात पुरुष वर्चस्ववादी मूल्यांचे वहन करणार्‍या प्रतिमेची स्थापना कशी सर्मथनीय ठरू शकते, हा सवाल कोणी विचारताना दिसत नाही. घालमोड्यांच्या या गोंधळात कायम पुरोगामी विचारसरणीची कास धरून लेखन करणारे साहित्य संमेलनाचे यंदाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, जेव्हा या सगळ्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘साहित्याला जात नसते’ असे म्हणतात, तेव्हा कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षपदाचे कशासाठी स्वागत करायचे, असा सवाल अनेकांच्या मनात उमटणे स्वाभाविक ठरते.

Next Article

Recommended