आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरिमित्र संमेलनाची अकरा पावले...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देश व विदेशातील गिर्यारोहकांना एका स्नेहरज्जूत बांधण्याचे तसेच गिर्यारोहण क्षेत्रासमोर भावी काळात उभी राहणारी आव्हाने पेलण्यासाठी सर्वंकष विचार करण्याकरिता गिर्यारोहकांना एक मोठे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम आजवरच्या गिरिमित्र संमेलनांमुळे झाले आहे.
हिमालय व सह्याद्री हे दोन्ही आपापली भौगोलिक वैशिष्ट्ये घेऊन हजारो वर्षे ठामपणे उभे आहेत. त्यांच्या अंगाखांद्यावर विश्वासाने वावरणा-या गिर्यारोहकांनाही त्यांनी तेवढीच माया लावली आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कडेकपारीत असलेले साडेतीनशेहून अधिक किल्ले, त्याचप्रमाणे अनेक सुळके यांबाबत गिर्यारोहकांना नेहमीच ममत्व वाटत आले आहे. निरनिराळ्या ऋतूंमध्ये या शिखरांवर आरोहण मोहिमा होतात, किल्ल्यांवर पदभ्रमण मोहिमा आयोजित केल्या जातात. त्यात निसर्गवाचनापासून सामाजिक भानाचे धडे गिर्यारोहकांना आपसूक मिळतात. सह्याद्रीतील आरोहण मोहिमांना सरावलेला गिर्यारोहक मग हिमालयातील एव्हरेस्टसह अनेक शिखरांचा माथा सर करण्याची स्वप्ने पाहू लागतो. महाराष्ट्रातील आधुनिक शैलीच्या गिर्यारोहण परंपरेला किमान 75 वर्षांचा इतिहास आहे. दरवर्षी गिर्यारोहण मोहिमा निघतात, त्यातील काही यशस्वी होतात, काही अयशस्वी होतात, त्यात काही अपघातही होतात. अनेक पदभ्रमण मोहिमांमध्ये खूपच विस्कळीतपणा असतो. व्यावसायिकतेच्या नावाखाली कधी कधी फक्त पैसा कमावण्याच्या हेतूने फारसे प्रशिक्षित काही लोक गिर्यारोहणाचा खेळ मांडताना दिसतात. त्यातून अंतिमत: गिर्यारोहणात सहभागी होणाºया एखाद्या नवख्याच्या जिवावर बेतू शकते. या सगळ्या बाबींचा विचार करून गिर्यारोहणाला एक शिस्त लागावी, राज्यातील सुमारे दीडशे गिर्यारोहण संस्थांनी एका व्यासपीठावर येऊन या क्षेत्राच्या भल्यासाठी सकारात्मक विचार करावा, निसर्गरक्षण, पुरातन किल्ले व अन्य ऐतिहासिक वास्तूंचे जतन या अन्य मुद्द्यांसहित सर्वंकष चांगला कार्यक्रम अमलात आणता येईल का हे पाहावे असे मनात धरून एखादे संमेलन भरवता येईल का याचा विचार काही लोकांच्या मनात सुरू झाला.
2002 सालची ही गोष्ट आहे. मुंबईतील मुलुंड उपनगरातील महाराष्ट्र सेवा संघ ही संस्था व गिर्यारोहकांच्या झालेल्या संवादातून गिरिमित्र संमेलनाची संकल्पना पुढे आली. एकत्र येण्याची संकल्पना जरी पटली असली तरी एकत्र येऊन काय करावे याचा आराखडा नव्हता. महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड येथील सभागृहात पहिले गिरिमित्र संमेलन 14 जुलै 2002 मध्ये पार पडले. आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षाचे निमित्त साधून आयोजिलेल्या या संमेलनात जवळपास 400 ते 500 गिर्यारोहक एकत्र आले होते. खूप वर्षांनंतर असा प्रयत्न होत असल्याने संमेलनाचा विशिष्ट असा काही आराखडा नव्हता. महाराष्ट्राच्या पहिल्या पिढीतील गिर्यारोहक व ज्यांनी पुढील गिर्यारोहकांच्या पिढ्या घडविल्या त्या शरद ओवळेकर सरांनी या संमेलनाचे उद्घाटन केले. संमेलनाचे मुख्य आकर्षण होते ते देशातील पहिल्या यशस्वी नागरी एव्हरेस्ट मोहिमेसंदर्भात तिचे नेते हृषिकेश यादव यांनी केलेले सादरीकरण. सह्याद्रीतील 100 सुळके सर करण्याचा विक्रम केलेल्या प्रदीप केळकर यांनी प्रस्तरारोहणाचे केलेले थरारक दृक्श्राव्य सादरीकरण हाही या संमेलनाचा आकर्षणाचा बिंदू होता. आतापर्यंत वेगवेगळ्या मोहिमांमध्ये गिरिकंदरातच विसावलेल्या ज्ञात व अज्ञात गिर्यारोहकांना एक स्मृतिस्तंभ उभारून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विविध मोहिमांत गिर्यारोहकांना डोंगर वाटाड्या म्हणून म्हणून मदत करणा-या स्थानिक गावक-यांचा सत्कार करण्यात आला. दुर्गभ्रमंती व इतिहास या विषयावर विपुल लेखन केलेले प्रख्यात साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी विविध किल्ल्यांच्या काढलेल्या नितांतसुंदर छायाचित्रांचे एक प्रदर्शनही भरविण्यात आले होते. पहिल्या गिरिमित्र संमेलनानंतर या यशस्वी उपक्रमाने चांगलेच बाळसे धरले. त्यानंतर आजवर 10 गिरिमित्र संमेलने अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. आता अकरावे गिरिमित्र संमेलन मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृहामध्ये उद्या व परवा 14 व 15 जुलै या कालावधीत आयोजिण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या वन विभागाचे सचिव प्रवीण परदेशी असणार आहेत, तर यॉटमधून जगप्रदक्षिणा करणारे नौदलाचे धडाडीचे अधिकारी कमांडर दिलीप दोंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये गिर्यारोहणासंदर्भातील दृक्श्राव्य सादरीकरण स्पर्धा, ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा यांचा समावेश आहे. प्रश्नमंजूषा स्पर्धेची अंतिम फेरी संमेलनाच्या व्यासपीठावरच होणार आहे. डोंगरभटक्यांच्या भ्रमंतीबद्दल समाज काय म्हणतो, समाजाचे मत काय आहे याबाबत गिरिमित्र यंदाच्या संमेलनात खुली चर्चा करणार आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी कमांडर दिलीप दोंदे हे आपल्या साहसी जगप्रदक्षिणेबद्दल सादरीकरण करतील. यंदाच्या वर्षी गिरिविहार व सागरमाथा या महाराष्ट्रातील दोन संस्थांच्या गिर्यारोहकांनी एव्हरेस्टचा माथा सर केला. त्या मोहिमेच्या विस्तृत सादरीकरणाचा आनंद गिरिमित्रांना घेता येईल. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त अन्य राज्यांमध्ये डोंगर भटकंतीच्या संधी कोठे आहेत याची माहिती या अकराव्या संमेलनात सहभागी झालेल्या गिरिमित्रांपुढे सादर केली जाणार आहे.
गिर्यारोहण करताना विविध गिर्यारोहकांना येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी कोणते ठोस तोडगे असू शकतात याचा ऊहापोह या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी गिरिमित्र संमेलनांतील चर्चांतून वेळोवेळी केला. या मार्गदर्शनाचा फायदा सह्याद्री, हिमालयात शिखरारोहण मोहिमा आखणा-या गिर्यारोहकांना झाला. गिरिमित्र संमेलनाच्या व्यासपीठावर केवळ महाराष्ट्रातील, देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्क इंग्लिशसारखे गिर्यारोहकही हजेरी लावू लागले. त्यामुळे हे संमेलन आता महाराष्ट्राची कक्षा ओलांडून खूप व्यापक बनले आहे. सरकार दरबारचे अनेक अधिकारी, गिर्यारोहण, निसर्गरक्षण, पुरातन वास्तूंचे जतन अशा विषयांत मनापासून रस असलेले सरकारी अधिकारी, नेते आपला नेहमीचा जामानिमा बाजूला ठेवून एक गिरिप्रेमी म्हणून गिरिमित्र संमेलनाला हजर राहू लागले. आजवरच्या गिरिमित्र संमेलनांतून सादर झालेल्या गिर्यारोहण मोहिमांच्या दृक्श्राव्य ध्वनिफिती या देशाच्या गिर्यारोहणाचा इतिहास लिहिण्यासाठी मोलाचे संदर्भसाधन आहेत. प्रत्येक संमेलनात गिर्यारोहण या विषयाला धरून प्रकाशित केलेली स्मरणिका हा महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे. गिरिमित्र संमेलनाच्या आयोजनातून नेमके काय साध्य झाले याचा सविस्तर आढावा घेणे शक्य नसले तरी देशातील गिर्यारोहकांना एका स्नेहरज्जूत बांधण्याचे तसेच गिर्यारोहण क्षेत्रासमोर भावी काळात उभी राहणारी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आजवरच्या गिरिमित्र संमेलनांमुळे मिळाले आहे हे निश्चित. महाराष्ट्राची सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण क्षेत्रालाही आपल्या कवेत घेणा-या गिरिमित्र संमेलन या आगळ्या व नि:स्वार्थी धडपडीला मनापासून सलाम.