आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोग भयंकरच, पण इलाज परवडेल?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोटी गोष्टही पुन्हा पुन्हा सांगितल्यास ती खरी वाटायला लागते, तसेच काहीसे नरेंद्र मोदींच्या बाबतीत होऊ लागले आहे. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत मुस्लिमांची वंशहत्या करण्यात आली. त्या वेळी मोदी मुख्यमंत्री होते. उर्वरित इतिहास सर्वांना माहिती आहे. खुलेआम झालेल्या या वंशहत्येची मुख्यमंत्री म्हणून मोदींवर काहीच जबाबदारी येत नाही का, हा प्रश्न सध्या मागे पडला असून मोदींनी गुजरातेत केलेल्या ‘विकासा’चे गोडवे गाऊन त्यांचे उदात्तीकरण केले जात आहे. याला ‘समाजनैतिक उदासीनता’ असे नाव द्यायचे की आणखी काही? काँग्रेसच्या राजवटीला कंटाळलेल्या मतदारांसाठी मोदी आणि भाजप हा पर्याय असल्याचे भासवले जात आहे. हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर, असेच म्हणावे लागेल. वंशहत्येला जबाबदार असणारी व्यक्तीही पंतप्रधान होऊ शकते, त्याचे उदात्तीकरण होऊ शकते, हा सध्या दिला जाणारा संदेश देशाच्या, समाजाच्या ऐक्याला घातक ठरणारा आहे, अराजकाच्या परिस्थितीला निमंत्रण देणारा आहे.

भ्रष्टाचार सगळीकडे बोकाळला आहे. सतत वाढणार्‍या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा अनेक छोट्या-मोठ्या समस्यांनी जगणे अवघड झालेल्या नागरिकांचा ‘सरकार’ नावाच्या यंत्रणेवरील विश्वास उडायला लागला तर नवल वाटायला नको. केंद्र आणि राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाड्यांचे सरकार आहे. अनुक्रमे दुसरी आणि तिसरी टर्म सत्तेवर असलेल्या या दोन्ही सरकारांनी नागरिकांचा भ्रमनिरास केला आहे. या सरकारांचे अनेक घोटाळेही उघडकीस आले. नागरिक बदलाच्या मानसिकतेत आहेत आणि खरी गंमत येथूनच सुरू होते. काँग्रेस नको, तर मग पर्याय काय? डावी आघाडी किंवा तिसर्‍या आघाडीची मोट अजून तरी बांधली गेलेली नाही. गेल्या 13-14 वर्षांत डाव्या आघाडीला सशक्त पर्याय होण्याची मोठी संधी होती, पण त्यांनी ती गमावली. सध्या तरी आपणच पर्याय असल्याचे भाजपवाल्यांकडून भासवले जात आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास लोकसभेची आगामी निवडणूक भाजप आघाडी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढण्याची शक्यता आहे. गुजरातेत 2002 मध्ये मुस्लिमांची वंशहत्या करण्यात आली. त्या वेळी मोदीच मुख्यमंत्री होते. गुजरातचा विकास, मोदींचे सुशासन याचे कौतुक करताना त्यांचे पाठीराखे आणि मीडियाला शब्द अपुरे पडत आहेत. अशा कर्तृत्ववान मोदींना 2002 मधील दंगली का थांबवता आल्या नाहीत ? त्या वेळी मी जे केले ते योग्यच होते, कुत्र्याचे पिल्लूही गाडीखाली आले तर आपले मन कळवळते, असे सांगणार्‍या मोदींना देशाचे नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार आहे काय ? काँग्रेस राजवटीला कंटाळलेल्या मतदारांसाठी विभाजनवादी, हुकूमशहा वृत्तीचे मोदी आणि भाजपचा इलाज परवडेल काय, हा खरा प्रश्न आहे. वंशहत्येला जबाबदार असणार्‍या व्यक्तीला ‘विकासपुरुष’ असा मुलामा चढवून त्याला समाजमान्यता मिळवून देणे, मीडियाकडून त्याची भलामण होणे, हे विविध जाती-धर्मांचे नागरिक एकत्र राहणार्‍या देशाला कदापिही परवडणारे नाही. न्यायालयाने नेमलेल्या एसआयटीने गुजरात दंगलीप्रकरणी आपल्याला क्लीन चिट दिल्याचे मोदी सांगतात. दंगली नियंत्रणात न आणल्याची आपली नैतिक जबाबदारी संपली, असेही त्यांनी आता जाहीर करून टाकले पाहिजे. नरोडा-पाटिया हत्याकांडात त्यांच्या मंत्रिमंडळात राहिलेल्या माया कोडनानी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यामुळे गुजरात दंगलीप्रकरणी मोदींची नैतिक जबाबदारी संपली असे म्हणता येईल काय ? इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी गुजरातेतील वरिष्ठ अधिकारी कारागृहात आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.

गोध्रा येथील हत्याकांड आणि त्यानंतर गुजरातमध्ये झालेल्या दंगली या दोन्ही घटना मानवतेला काळिमा फासणार्‍या होत्या. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातेत मुस्लिमांची खुलेआम वंशहत्या करण्यात आली. गुजरातमधील सुशासनाचे दाखले दिले जातात. तेथे भ्रष्टाचार नसल्याचेही सांगितले जात आहे. गेल्याच महिन्यात उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयात अडकलेल्या गुजरातेतील 15000 यात्रेकरूंची मोदी या ‘विकासपुरुषा’ने एका झटक्यात सुटका केल्याचा गवगवा करण्यात आला. मोदींकडे एवढे चांगले गुण असतील तर त्यांना गुजरातेतील दंगलीवरही नियंत्रण मिळवणे फारसे अवघड नव्हते. गुजरातेतील दंगलीचा प्रश्न आता उपस्थित करण्यात काही अर्थ नाही, असे मोदींच्या पाठीराख्यांचे म्हणणे आहे. इतिहास विसरता येईल काय? इतिहास विसरणे एवढे सोपे असते काय ? आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचाही इतिहास विसरा, असे पुढे-मागे हे लोक म्हणणार नाहीत, याची शाश्वती देता येत नाही.
सामाजिक असमतोल, असमानतेच्या विरोधात अद्यापही काही जाती-जमातींना संघर्ष करावा लागत आहे. परंपरेने चालत आलेली बंधने अद्यापही वागवावी लागत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या चळवळींमुळे महाराष्ट्र पुरोगामी समजला जातो. या थोरांमुळे दीन-दलित, दुबळ्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. आमची ही सन्मानाची लढाई अद्यापही सुरूच आहे. या लढाईला, चळवळीला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. अशा परिस्थितीत मोदी नावाचे भूत मानगुटीवर बसवले जात आहे. त्यामुळे या सन्मानाच्या लढाईची, परिवर्तनाच्या चळवळीची फार मोठी हानी होणार आहे. किंबहुना सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची दिशा बदलण्यासाठीच हा घाट घातला जात आहे काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. भाजपशासित कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मात्र त्याचा फारसा गवगवा झाला नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तेथील मतदारांनी भाजपला सत्तेवरून खाली खेचले. भ्रष्टाचार, गैरव्यवहार अशा प्रकारांची लागण फक्त काँग्रेसपुरती मर्यादित नाही, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजप-शिवसेना युतीला एकदा सत्ता दिली, मात्र नंतर त्यांना दूर सारले. दहा वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीला चमकदार कामगिरी करता आली नाही. लोकहिताचे निर्णय घेता आले नाहीत. सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. प्रशासनावर सरकारची पकड राहिली नाही, तरीही राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला तिसर्‍यांदा सत्ता दिली. महाराष्ट्र पुरोगामी आहे, तो जातीयवादी शक्तींना, विचारांना थारा देत नाही हे मतदारांनी सिद्ध केले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांमुळे, त्यांच्या चळवळीमुळे महाराष्ट्र हे करू शकला. विकास सर्वांनाच हवा आहे. तो झालाही पाहिजे, मात्र वंशहत्येच्या पायावर उभारलेले विकासाचे मॉडेल आपल्याला चालणार आहे काय, याचा विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे.