Home | Magazine | Pratima | gold-medalist-sachin

उच्च् शिक्षणाचे ध्येय..

वंदना धनेश्वर | Update - Nov 05, 2011, 05:17 AM IST

आजकालचे विद्यार्थी खूप लवकर निराश होतात. मात्र, निराश होणे हा काही एखाद्या समस्येवरचा उपाय होऊ शकत नाही. यशस्वी होण्यासाठी तुमचा स्वत:वर, स्वत:च्या मेहनतीवर प्रचंड विश्वास असावा लागतो.

  • gold-medalist-sachin

    आजकालचे विद्यार्थी खूप लवकर निराश होतात. मात्र, निराश होणे हा काही एखाद्या समस्येवरचा उपाय होऊ शकत नाही. यशस्वी होण्यासाठी तुमचा स्वत:वर, स्वत:च्या मेहनतीवर प्रचंड विश्वास असावा लागतो. औरंगाबादच्या पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सचिनने काहीशा याच शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. इलेक्ट्रिकल विभागात विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या सचिन रवींद्र गडाप्पा यांच्याशी आम्ही नुकताच संवाद साधला. आपल्या सुवर्णपदकापर्यंतच्या प्रवासातील अनेक आठवणींना त्याने या वेळी उजाळा दिला.
    सामान्यपणे गुणवंत विद्यार्थाच्या घरी शिक्षणासाठी पोषक वातावरण, उच्च शिक्षणाची परंपरा वगैरे असते. मात्र, सचिन याला अपवाद आहे. आई गृहिणी. वडिलांच्या पगारावर संपूर्ण घराचा भार. त्यातच सचिनच्या शिक्षणाचा खर्च. ‘मला आठवते, मी पॉलिटेक्निक महाविद्यालयात असताना माझे वडील एका शाळेत सुरक्षारक्षकाची नोकरी करायचे. त्यानंतर मी बी.ई.ला प्रवेश घेतल्यानंतर ते काही काळ आॅटोरिक्षाही चालवायचे. मात्र, अशाही परिस्थितीत माझ्या आई-वडिलांनी माझ्या शिक्षणात कुठेही खंड पडू दिला नाही. ते स्वत: जेमजेम शिकलेले असले तरीही त्यांनी मला शिक्षणासाठी सतत प्रोत्साहनच दिले.’ सचिनने सांगितले, ‘मला आजही आठवतात ती बी.ई.ला प्रवेश घेतल्यानंतरची सुरुवातीची काही वर्षे. ही वर्षे मला अत्यंत खडतर गेली.
    अभ्यासक्रम आपल्याला पेलणार की नाही या शंकेने अनेकदा खूप निराश वाटायचे. त्या वेळी मी माझ्या पालकांनी माझ्यासाठी उपसलेले कष्ट आठवले. मग मात्र माझ्या आयुष्याची पुढची दिशा मला अगदी स्पष्ट ठरवता आली. आणि आज त्याचेच फळ मला मिळाले आहे. सुवर्णपदक मिळवून माझ्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद मला झाला आहे.’ आता ध्येय एम.टेक.चे. नोकरी मिळाली. आता शिक्षण पुरे झाले असाच सर्वमान्य दृष्टिकोन. जणूकाही शिकायचे ते केवळ नोकरी करण्यासाठीच. पण सचिन याबाबतीतही वेगळा विचार करतो.
    परीक्षेचा निकाल लागण्याआधीच बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळालेल्या सचिनला पुढे आणखी शिकण्याची इच्छा आहे. नोकरी करता-करता एम.टेक. करण्याचा त्याचा मानस आहे. शिवाय आपल्या लहान भावाला डॉक्टर करण्याची इच्छा असल्याचे सचिन म्हणतो. आता आपल्या नोकरीमुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने लहान भावाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल याचेही खूप समाधान असल्याचे सचिन म्हणतो.Trending