आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने आयात : संकटाला आवतण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारतातले सोने इंग्लंडला कसे जाईल व ते तिथेच कसे राहील, यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अनेक मार्ग काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन’ या अर्थशास्त्रातल्या डी. एस. सी. पदवीसाठी लिहिलेल्या शोधग्रंथात विस्ताराने याचा खुलासा केला आहे. तसेच इंग्रजांच्या या लुटारू वृत्तीवर सडेतोड टीका केली आहे. भारतीय रुपयाचा आधारित सुवर्णसाठा अनेक मार्गाने कमी करून त्या काळी रुपया कमकुवत ठेवणे, हे पौंडासाठी आवश्यक होते. 1872 ते 1893 या काळात सुवर्ण प्रमाण नसल्याने रुपया कमकुवत झाला. त्याचा दुष्परिणाम त्या काळी जनतेला भोगावा लागला. इंग्रजी सत्तेच्या वेळी भारतात चांदीच्या रुपयात पगार व्हायचा. पण त्याचा चुकतावा ब्रिटिश अधिका-याना लंडनमध्ये सोन्याच्या पौंडात व्हायचा. विनिमयातल्या प्रचंड तफावतीमुळे भारतावर आर्थिक बोजा पडायचा.

भारतातली संपत्ती लंडनमध्ये नेण्यासाठी ब्रिटिशांनी ज्या अनेक पद्धती वापरल्या त्यातलीच ही एक पद्धत होती. यावरून वाचकांच्या लक्षात येईल की अर्थव्यवस्थेत सोने ही फार मोलाची वस्तू आहे. भारतातला खासगी मालकीचा प्रचंड सुवर्णसाठा, जो नुसताच पडून होता, राष्ट्र विकासात त्याचा काहीही उपयोग होत नव्हता, असा सुवर्णसाठा देशाच्या अर्थकारणात प्रत्यक्ष यावा म्हणून भारत सरकारने नोव्हेंबर 1962मध्ये 6.5 टक्के दराचे व 15 वर्षे मुदतीचे गोल्ड बाँड विक्रीस काढले. शुद्ध सोन्याच्या कांबी, नाणी व दागिने यांच्या बदल्यात हे बाँड मिळत होते. पण या बाँडद्वारे फक्त 16.3 टन सोने सरकारी तिजोरीत आले. नोव्हेंबर 1962 मध्ये सरकारने सोन्याच्या वायदेबाजारांवर बंदी घातली. तसेच लोकांनी सोन्यामध्ये कमी गुंतवणूक करावी व विकसनशील बाबींसाठी जास्त गुंतवणूक करावी म्हणून जानेवारी 1963 मध्ये गोल्ड कंट्रोल रुलनुसार 14 कॅरेटपेक्षा जास्त शुद्धतेचे दागिने तयार करण्यावर बंधन आणले. तसेच 14 कॅरेटपेक्षा जास्त शुद्धतेचे सोने तयार करण्यावर बंधन आणले. 1964 पर्यंत सुवर्ण व्यवसाय पूर्णत: सरकारी नियंत्रणाखाली आला.

सर्वसाधारणपणे भारतीयांना सोन्याचा मोठा सोस आहे. तसेच कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा सोन्यातली गुंतवणूक अधिक सोपी व सरळ आहे. हवे तेव्हा सोने विकून अथवा गहाण ठेवून सहज पैसा उभा राहू शकतो. जगात सर्वत्र सोन्याला मागणी व मान्यता आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याकडे भारतीयांचा वाढता कल आहे. त्यातच जागतिक मंदीत मोठमोठ्या कंपन्या, बँका बुडाल्या. त्यामुळे सोने गुंतवणूक वाढली. 2001-02 मध्ये सोन्याची आयात 4.17 बिलियन डॉलरवरून 2010-11 मध्ये 42.5 बिलियन डॉलर एवढी वाढली. या आयातीच्या फक्त 2 टक्के सोने औद्योगिक विकासासाठी वापरले जाते. बाकीची 98 टक्के गुंतवणूक निद्रिस्त असते. तिचा विकासासाठी कसलाही उपयोग होत नाही. शिवाय विकसनशील गुंतवणूक या सुवर्ण गुंतवणुकीमुळे कमी होते. त्याचा विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. शिवाय सर्वसामान्य माणूस रोखीने सोने खरेदी करतो. बहुधा हे व्यवहार काळा पैसा निर्माण करतात. सोन्याच्या आयातीसाठी मौल्यवान परदेशी चलन वापरावे लागते. भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त असल्याने परदेशी व्यापार तुटीचा आहे. याचा परिणाम रुपया कमकुवत होतो. एकूण आयातीपोटी भारताला जादा खर्च उचलावा लागतो. त्यामुळे अर्थसंकल्पात तूट येते. याची इतरही कारणे आहेत. तुटीचे बजेट व कमकुवत रुपया यामुळे महागाई वाढत जाते. म्हणजेच श्रीमंतांचा सोन्याचा शौक पुरवण्यासाठी गोरगरिबांना आर्थिक झळ सोसावी लागते.

आयात सोने भारतात येते. पण ते राष्ट्रीय तिजोरीत न जाता खासगी तिजो-या त बंद होते. राष्ट्रातली श्रीमंती वाढते, पण राष्ट्राची श्रीमंती वाढत नाही. देशाच्या मालकीच्या सोन्याचा साठा व परकीय चलन गंगाजळी जेवढी जास्त, तेवढे त्याचे चलन मजबूत असते. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेकडे जेवढी संपत्ती आहे, त्यातली 75 टक्के संपत्ती सोन्याच्या रूपात आहे. डॉलर आज सर्वात बलवान असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. चीनकडे एकूण 3323 बिलियन डॉलर्स एवढा प्रचंड परकीय चलन साठा आहे. तर भारताकडे फक्त 283.8 बिलियन डॉलर्स एवढाच साठा आहे. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या चारपट चीनचे राष्ट्रीय उत्पादन आहे. भारत मोठी आर्थिक ताकद होत आहे, अशी थाप मारणा-या अर्थतज्ज्ञांना ही आकडेवारी बहुधा माहीत नसावी. आज धार्मिक स्थळांमध्ये लाखो कोटी रुपयांची संपत्ती सोन्याच्या रूपात निद्रिस्त पडून आहे. देशाला तिचा काडीचा उपयोग नाही. देशात आज कोट्यवधी लोक उपाशी आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, औषधोपचाराशिवाय तडफडत आहेत. बेकारीत दरवर्षी भयावह वाढ होत आहे, कित्येक गावे अजूनही वीज, पाणी, रस्ते अशा सोयींपासून दूर आहेत. औद्योगिक विकास व शेती विकास रोडावलाय. परदेशातून गुंतवणूक मिळावी म्हणून आपण आज देश विकायला काढलाय. अशा वेळी ही मंदिरे, विहारे, गुरुद्वारा, मशिदी, चर्चेस आपल्या पोटात अनमोल ठेव दडवून आहेत. देवाशी-धर्माशी-देशाशी हा शुद्ध द्रोह आहे.