आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्पनारम्य अन् कल्पनातीत (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्पनारम्य अर्थात फँटसीप्रधान चित्रपटांत आजवर विनाचालक कारची स्वप्नवत दृश्ये आपण पाहत होतो. पण, सध्या तंत्रज्ञानाच्या युगाने त्याही पुढे जात काल्पनिकच नव्हे, तर कल्पनातीत अशा संकल्पना प्रत्यक्षात आणल्या आहेत. गुगलने नुकतेच तयार केलेले सेल्फ ड्रायव्हिंग कारचे मॉडेल हा त्यातला आणखी एक चमत्कृतीजन्य आविष्कार म्हणायला हवा. कारण, माणसाने आजवर जेवढ्या म्हणून वाहनांची निर्मिती केली ती सारी चालकाच्या भरवशावरच आहे. अगदी प्राचीन काळातल्या रथांनासुद्धा सारथी अनिवार्यच होता. महाभारतातदेखील भगवान श्रीकृष्णापासून शल्यापर्यंत सारथ्यकुशलतेची एक अत्यंत समृद्ध शृंखला दिसून येते. पुढे तंत्रज्ञान विकसित होत गेले तसे वाहनांचे आकार-प्रकार बदलू लागले. औद्योगिक क्रांतीनंतर यांत्रिक मोटारींचे उत्पादन सुरू झाले. मोटारींप्रमाणेच विमाने असोत, रेल्वेगाडी असो की जहाजे, या सार्‍यांना नियंत्रित करणारे सुकाणू अर्थात ‘स्टिअरिंग व्हील’ व ते सावरणारा चालक यांच्या जबाबदार्‍या आणि महत्त्व उलट वाढतच गेले. परिणामी, सुकाणूविना धावणारे वाहन ही एक ‘फँटसी’ बनून राहिली.(चालकाविना राजधानी दिल्लीत गाडी चालते, अशा ‘चमत्कारा’चा देखावा टीव्हीच्या पडद्यावर देशाने पाहिला आहे, असो.) पण, आता नेमकी तीच बाब गुगलने प्रत्यक्षात आणली आहे. स्टिअरिंग व्हील, ब्रेक व अ‍ॅक्सिलरेटर असे काहीही नसलेल्या सेल्फ ड्रायव्हिंग कारचे प्राथमिक स्वरूपाचे मॉडेल गुगलने नुकतेच सादर केले आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी गुगलने या संकल्पनेवर काम सुरू केले. त्यानुसार आता दोन जण बसू शकतील अशी छोटेखानी कार आकारास आली आहे. इलेक्ट्रिक मोटार असलेली ही कार सेन्सरच्या माध्यमातून चालू शकते. हे सेन्सर रडार आणि कॅमेर्‍याच्या मदतीने सभोवतीच्या 600 फुटांपर्यंतच्या पल्ल्यावर 360 अंशांतून नजर ठेवते. त्यामुळे मार्गातील अडथळे, माणसे, वस्तू यांचा अचूक अंदाज येतो. शिवाय त्यातील सॉफ्टवेअर्स ट्रॅफिक सिग्नल्स, वाहतुकीच्या खुणा यांचाही वेध घेतात. जीपीएसच्या मदतीने ती कोठे आहे ते ठिकाण समजू शकते. स्टिअरिंग व्हील व अन्य नियंत्रण साधनांच्या ऐवजी ही सारी कामे चोखपणे पार पाडण्यासाठी या अत्याधुनिक कारमध्ये केवळ एक स्टार्ट बटण आहे. अगदी अचानकपणे गाडी थांबवण्यासाठी रेड बटणचीदेखील तजवीज केलेली आहे. आरामदायी आसनव्यवस्था आणि इतर ‘सेफ्टी मेजर्स’ची त्यामध्ये यथायोग्य सुविधा दिली जाणार आहे. सध्या निर्मितीच्या अगदीच प्राथमिक टप्प्यात असलेली ही कार ताशी पंचवीस किलोमीटर अंतराने धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे. रस्त्यावरून प्रत्यक्ष धावण्यासाठीच्या संबंधित अन्य चाचण्या, इतर सुधारणा अद्याप बाकी आहेत. त्यामुळे अशी कार बाजारात येण्यास अद्याप चार-पाच वर्षांचा तरी अवधी लागेल. त्यामुळे ही गाडी म्हणजे अजून बाजारात तुरी, असा सूर काही जण लावतील, अनेक आक्षेपसुद्धा त्यावर घेतले जातील. पण, तंत्रज्ञानाचे असे अनेक आविष्कार आपण गेल्या काही वर्षांत केवळ पाहिलेच आहेत असे नव्हे, तर दैनंदिन जीवनात त्याची अनुभूतीसुद्धा घेत आहोत. अवघ्या वीस वर्षांपूर्वी आपल्याला इंटरनेट ही काय चीज आहे, त्याविषयी फारशी माहिती नव्हती. आज गुगलशिवाय तर आपले पानही हलेनासे झाले आहे. पंधरा वर्षांपूर्वी मोबाइल फोनचेसुद्धा मोठे अप्रूप होते. पाचच वर्षांपूर्वीपर्यंत फेसबुक, ट्विटर आणि एवढेच कशाला, अगदी दीड वर्षापूर्वी व्हॉट्स अ‍ॅप हे सारेच आपल्याला अज्ञात होते. पण, आज पाच मिनिटेही आपण त्यापासून दूर राहू शकत नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या सोशल मीडियाने व विशेषत: व्हॉट्स अ‍ॅपने बजावलेली भूमिका अत्यंत कळीची असल्याचे पुढे आले आहे. वापराबरोबरच त्यावरचा खर्च वाढत असला तरी तो आता कौटुंबिक खर्चाचा भाग समजला जातो. माणसाने जीवनाचा वेग एवढा वाढवला आहे की, त्याला दिवसाचे 24 तास पुरेनासे झाले आहेत. त्यामुळे जी अत्यावश्यक कामे आहेत, त्यातून सुटका करून घेण्याच्या मागे तो लागला आहे. सेल्फ ड्रायव्हिंगच्या तंत्रज्ञानात त्याला प्रवासाचा वेळ थेट स्वत:साठी तर मिळेलच, पण आणखी वैयक्तिक स्वातंत्र्य मिळेल. शिवाय, रस्त्यांची रचना मुळातून बदलून जाईल. अशा गाड्या धावण्यासाठी वेगळे टोलचे रस्ते तयार केले जातील. (म्हणजे टोलपासून सुटका नाहीच तर!) एकूणात, या नवतंत्रज्ञानाने आपल्या जीवनशैलीत स्वत:चे असे एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. त्याही पुढे जात आता ‘गुगल ग्लास’ अथवा ‘सेल्फ ड्रायव्हिंग कार’ यासारखे समृद्ध तंत्रज्ञानाचे चमत्कारिक आविष्कार समोर येत आहेत. भारतीय तरुणांनीसुद्धा नवतंत्रज्ञानाआधारे जगाला हवेहवेसे वाटणारे स्वदेशी ‘ब्रँड’ तयार करण्यावर भर द्यायला हवा. त्यादृष्टीने पावले टाकली गेली तर ‘अच्छे दिन’ फार दूर नसतील.