आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतला ‘भारतीय हंगाम!’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी परदेश गमन करण्याची संधी मिळाल्यास अनेक भारतीयांना अमेरिका ही स्वप्नभूमी खुणावत असते. अमेरिकेत पर्यटन, व्यावसायिक कारणाने प्रवास करणारे, कायमस्वरूपी नागरिक वगळता एच-वन बी व्हिसा मिळवून आलेले विदेशी कर्मचारी, विद्यार्थी यांना तात्पुरते रहिवासी (रेसिडेंट नॉन-इमिग्रंट) म्हणून ओळखले जाते. अमेरिकेत सध्या असलेल्या अशा तात्पुरत्या वा हंगामी रहिवाशांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. अमेरिकेतील तात्पुरत्या रहिवाशांमध्ये भारतापाठोपाठ चीन, दक्षिण कोरियाच्या नागरिकांचा भरणा आहे. 2012 ची स्थिती लक्षात घेतली, तर अमेरिकेतील विदेशी विद्यार्थ्यांमध्ये चिनी विद्यार्थ्यांपाठोपाठ सर्वाधिक संख्या भारतीयांचीच होती. त्या वर्षी 1 लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिकत होते. गेल्या दीड वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने अमेरिकेत आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवणे पालकांच्या खिशाला जरा जड होऊ लागले. परिणामी, अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात रोडावली. मात्र, चीनमधून अमेरिकेत शिकायला जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढच होते आहे.

भारत, चीनमधून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेले भारतीय, चिनी विद्यार्थी तेथे कठोर परिश्रम घेऊन आपले ध्येय साध्य करतात. या स्पर्धेत मूळ अमेरिकी विद्यार्थी मागे पडत आहेत. 19 व्या शतकात डॉ. आनंदीबाई जोशी यांनी अमेरिकेतील वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हानियामधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अमेरिकेत राहून सक्रिय मदत करणार्‍यांमध्ये गदर पार्टीचे कार्यकर्ते आघाडीवर होते. 20व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबातून अमेरिकेत शेतमजूर किंवा लोहमार्ग बांधणीच्या कामासाठी गेलेले अनेक भारतीय गदर पक्षात सामील झाले होते. या पक्षात त्या वेळी अमेरिकी विद्यापीठात शिकत असलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या दृढ संबंधांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील तात्पुरत्या रहिवाशांपैकी भारतीयांची विद्यमान संख्याही लक्षात घेता, अमेरिका भारतीयांना व्हिसा देण्यास खूपच खळखळ करते, या युक्तिवादातही फारसे तथ्य नाही हेही लक्षात येते.