आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Habbit Of Purchasing By Credit Card May Land You In Trouble

ऋणं कृत्वा घृतं पिबेत्! (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ती रोख रक्कम टाकून घेणे कठीणच आहे. जर एखाद्या वस्तूचा उपभोग घ्यायचा असेल आणि ती वस्तू रोख रकमेने खरेदी करणे शक्य नसेल तर उधारीवर म्हणजेच क्रेडिट कार्डावर घेणे हा उत्तम उपाय आहे, हे तरुण पिढीचे मत आहे... पूर्वीच्या काळात वाण्याच्या दुकानावर पाटी असायची, ‘आज रोख, उद्या उधार.’ त्या काळी माल विकणार्‍याला नेहमीच वाटे की, आपल्याकडे रोखीने व्यवहार करणारे गिर्‍हाईक यावे. ज्यांना आर्थिकदृष्ट्या परवडायचे नाही, ते लोक उधारीवर नाइलाज म्हणून वस्तू घ्यायचे. परंतु आता मात्र काळ बदललाय. ‘आज उधारी, उद्या पण उधारीच..’ असे नेमके उलटे चित्र आपल्याला बाजारपेठेत दिसते. पूर्वी उधारीवर खरेदी करणार्‍याच्या मनात एक प्रकारची असहायता होती. आता मात्र कोणतीही वस्तू उधारीवर खरेदी करताना ग्राहक मोठ्या दिमाखात क्रेडिट कार्ड आपल्या खिशातून काढतो. त्याच्या खिशात जर एखाद्या बहुराष्ट्रीय बँकेचे कार्ड असेल तर त्याचा दिमाख काही औरच असतो! त्याच्या शेजारी जर एखादा सहकारी बँकेचे क्रेडिट कार्ड घेऊन उभा असेल तर तो काहीसा तुच्छतेने त्याच्याकडे पाहतो... अशा प्रकारे गेल्या दशकात ग्राहकांची आणि दुकानदारांचीही मानसिकता बदलली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा बदल तरुण पिढीच्या अंगवळणी चांगलाच पडला आहे. आता ग्राहकोपयोगी कोणतीही वस्तू असो - अगदी मोबाइल फोनपासून ते चपला-बुटांपर्यंत - ती क्रेडिट कार्डावर हप्ते भरून खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. आर्थिक उदारीकरण सुरू होण्याअगोदरच्या संमिश्र अर्थव्यवस्थेत आपल्याकडे फक्त गृहकर्ज घेतले जात होते. अर्थातच हे कर्ज घेणारा हा प्रामुख्याने मध्यमवर्गीयच होता आणि हे कर्ज फिटेपर्यंत त्याच्या डोक्यावर मोठा बोजा असायचा. आता मात्र आर्थिक उदारीकरणाच्या अर्थव्यवस्थेत वावरणार्‍या तरुण पिढीला एक बाब स्पष्ट दिसते की, आपल्याला कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ती रोख रक्कम टाकून घेणे कठीणच आहे. आपल्याला एखाद्या वस्तूचा उपभोग घ्यायचा असेल आणि ती वस्तू रोख रकमेने खरेदी करणे शक्य नसेल तर उधारीवर म्हणजेच क्रेडिट कार्डावर घेणे, हा उत्तम उपाय आहे. अशा प्रकारे ग्राहक परतफेडीचे टेन्शन न घेता वस्तू खरेदी करतात. ग्राहकांची ही जशी मानसिकता बदलली आहे, तसे उत्पादकांनीही आपला माल खपवण्यासाठी हप्त्याच्या योजना आखण्यास सुरुवात केली. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात एका खरेदीवर दोन वस्तू मोफत, चार हप्त्यात पैसे द्या, अशा विविध ‘मोहांना’ ग्राहक बळी पडावा यासाठी आकर्षक योजना आखल्या जातात. यातून आपला माल नुसताच पडून राहण्यापेक्षा ग्राहकाच्या गळ्यात मारणे; मग त्याचे पैसे थोड्या विलंबाने मिळाले तरी हरकत नाही, ही उत्पादकांची मानसिकता झाली आहे. या व्यवहारात बँकांचाही फायदा होतो. कारण त्यांना आपल्याकडील अतिरिक्त पैसा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून चलनात आणता येतो. जर एखाद्या ग्राहकाने पैसे डुबवलेच, तर त्याच्यावर पठाणी व्याज आकारता येते. एकूणच हे उधारीचे तंत्र ग्राहकांच्या मनाला भावले आहे. कारण गेल्या दोन वर्षांत क्रेडिट कार्डांचे व्यवहार सुमारे 42 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या जवळजवळ प्रत्येक उद्योगाला मंदीने ग्रासले असताना क्रेडिट कार्डांचा व्यापार मात्र तेजीत आला आहे. त्यामुळे एक बाब स्पष्ट आहे की, आपल्याकडे आता क्रेडिट कार्डाची संस्कृती पूर्णपणे रुजली आहे. यातली एक सकारात्मक बाजू म्हणजे, अशा प्रकारे उधारीच्या या दुनियेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि यात अनेकांच्या चुली पेटतात. चार्वाक ऋषींच्या वचनाचा उल्लेख करायचा झाल्यास ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’. म्हणजेच कर्ज काढा, पण साजूक तूप खा. कारण जे काही तुम्हाला करायचे आहे ते याच जन्मात. चार्वाक हे पुनर्जन्म मानणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी हा सल्ला दिला होता. आताची पिढी हा सल्ला तंतोतंत पाळत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेचाही पाया असाच आहे. ‘बायर्स इकॉनॉमी’ किंवा खरेदीदारांची अर्थव्यवस्था असा अमेरिकन अर्थव्यवस्थेचा मोठ्या गौरवाने उल्लेख होतो. तेथेदेखील अशा प्रकारे क्रेडिट कार्डाच्या उधारीवर जगणारे बहुतांश लोक आहेत. अमेरिकेत लोक बचत फार कमी करतात. सरकारदेखील लोकांनी आपल्याकडील पैसे खर्च करावेत यासाठी प्रोत्साहन देते. कारण प्रत्येकाच्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. त्यामुळेच गेली पाच वर्षे अमेरिकेत मंदीचे वातावरण असल्यामुळे खरेदी मंदावली आहे आणि याचा परिणाम अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात भोगावा लागत आहे. क्रेडिट कार्डाची उधारी मर्यादेबाहेर गेल्यावर अमेरिकेत व्यक्तिश: दिवाळे काढणारे अनेक जण असतात. आपल्याकडे मात्र ही ‘दिवाळखोरी’ संस्कृती सुदैवाने अजून रुजलेली नाही. आपल्याकडे क्रेडिट कार्डावर वस्तू घेणार्‍यांपैकी 80 टक्के लोक आपले हप्ते वेळेत भरतात, असा अनुभव आहे. म्हणजेच आपल्याकडे लोक क्रेडिट कार्डावर खरेदी करत असले तरीही आपल्या उत्पन्नाची मर्यादा पाहूनच खर्च करतात. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, असे आपल्याकडे सहसा होत नाही.
त्यामुळे बँकाही धोक्यात येणार नाहीत. त्याचबरोबर क्रेडिट कार्डाच्या खरेदीचे सर्व व्यवहार हे चेकने होत असल्यामुळे सरकारला अपेक्षित असलेले सर्व व्यवहार पारदर्शी होण्यास मदत होते. यातून सरकारचे सेवाकराचे उत्पन्न वाढू शकते, तसेच प्राप्तिकराच्या जाळ्यातही अनेक जण येऊ शकतात. कोणत्याही मालाची खरेदी झाल्याशिवाय अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होत नाही, हे खरेच आहे. आपल्याकडे एका ट्रकची खरेदी केली तर विमा एजंटापासून ते ट्रकचालक, पंक्चर काढणार्‍यापर्यंत अशा सुमारे सात जणांना रोजगार मिळतो, असा अनुभव आहे. प्रत्येक वस्तूच्या खरेदीला हे सूत्र लागू पडते. क्रेडिट कार्डांच्या व्यवहारांमुळे अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळते. व्यक्तिश: विचार करता उत्पन्न व खर्च यांचा मेळ जोपर्यंत योग्यरीत्या घातला जातो, तोपर्यंत क्रेडिट कार्डांचे व्यवहार फायदेशीर आहेत. कारण आज घेतलेल्या उधारीचे पैसे हे पुढच्या महिन्यांत फेडायचेच असतात, हे विसरता कामा नये. परंतु त्याचबरोबर क्रेडिट कार्डधारकांनी हेही ध्यानात ठेवायला हवे की, या ‘क्रेडिट’वर द्यावे लागणारे व्याज हे बहुतेक वेळा चक्रवाढ व्याज असते आणि काही ग्राहक केवळ ‘क्रेडिट’ ऊर्फ कर्जाच्या नव्हे तर व्याजाच्या बोजाखाली चेपले जातात.