आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hamid Dabholkar Article About Superstition And Anis Maharashtra

अंनिस ते विवेककारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या २० ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला दोन वर्षे पूर्ण होतील. त्यांचे मारेकरी आणि त्यामागचे सूत्रधार अजून सापडलेले नाहीत. डॉ. दाभोलकरांचा खून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना असे वाटले होते की आता महाराष्ट्र अंनिसच्या कामाचे काय होणार? पण नेत्याचा खून झालेला असताना डगमगून न जाता अंनिस आज दुप्पट जोमाने काम करते आहे. डॉ. दाभोलकरांच्या नंतर दोन वर्षांत जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करून घेणे आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सततचे प्रयत्न अंनिसने केले. आज या कायद्यांतर्गत दीडशेपेक्षा अधिक भोंदूबाबा गजाआड झाले आहेत. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल राज्यात अशाच कायद्यासाठी मागणी होत आहे. याच बरोबरीने गोफणगुंड्यासारख्या अनेक अघोरी प्रथा- प्रबोधने थांबवणे, सात ते आठ ठिकाणी यात्रेतील पशुबळीला विरोध, रक्तदान करून ईद साजरी करणे असे अनेक कार्यक्रमदेखील या कालखंडात अंनिसने राबवले.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रश्नाच्या बरोबरच जातपंचायत मूठमाती अभियान, विज्ञान बोध वाहिनी, नगर जिल्ह्यातील सामाजिक न्याय प्रस्थापना मोहीम, व्यसनविरोधी युवा निर्धार, विवेकी जोडीदार निवड, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी मानस मित्रांद्वारे मदत आणि "हिंसा के खिलाफ मानवता की ओर' अभियान, असे सातत्यपूर्ण आणि बहुआयामी काम अंनिस करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर याचबरोबर आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी महा. अंनिसला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने रौप्यवर्षपूर्ती अधिवेशन पुणे येथे झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला स्मरून अंनिसचे काम पुढे चालू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात केला आहे.
२५ वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते व पूर्ण महाराष्ट्रात पाच-दहा शाखा इथपासून महा अंनिसची सुरुवात झाली. आजघडीला महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये ३०० शाखा व ३००० पेक्षा जास्त कार्यकर्ते यांच्यापर्यंत झालेला हा प्रवास आहे. या कामाची सुरुवात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करण्यापासून झाली. ‘ग्रंथप्रामाण्य’ व ‘शब्दप्रामाण्य’ अजूनदेखील समाजात मोठ्या प्रमाणात असून त्यामुळेच येणारा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चिकित्सक वृत्तीचा अभाव हा समाजाच्या प्रगतीतला मोठा अडथळा ठरत आहे, हे डॉ. दाभोलकरांच्या मनाने ताडले होते. भारतीय समाजाने "विज्ञानाची सृष्टी घेतली, पण दृष्टी घेतली नाही' असे ते अनेकदा भाषणांमध्ये म्हणायचे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही कारण असते व ते कारण आपल्याला तपासून बघता येते, हा वैज्ञानिक दृष्टिकोन महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांच्या व त्यांच्या माध्यमातून लाखो मुलांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न अंनिसने अथकपणे केला. अंनिसच्या कामामध्ये पुढच्या टप्प्यावर शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करण्याचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी देव व धर्माच्या नावावर सामान्य माणसाची फसवणूक होत होती, त्या त्या फसवणुकीच्या विरोधात अंनिसचे कार्यकर्ते उभे राहिले. अंनिसचा विरोध कधीच देवाला व धर्माला नव्हता. भारतीय घटनेने येथील नागरिकाला दिलेल्या धर्म व देव निवडण्याच्या स्वातंत्र्याचा आदर राखण्याचीच भूमिका अंनिसने आतापर्यंत घेतली आहे. याच सूत्राला धरून गेल्या २५ वर्षांमध्ये महाराष्ट्रात काही हजार बाबा-बुवांच्या शोषण करणाऱ्या गोष्टी अंनिसने समाजापुढे आणल्या. पण अशी फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा होईल यासाठीचा प्रभावी कायदा महाराष्ट्रात नव्हे, तर भारतातदेखील अस्तित्वात नव्हता. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा ते जादूटोणाविरोधी कायदा अशी २० वर्षांची अथक संसदीय लढाई या कायद्यासाठी अंनिस लढली. वेदनादायक गोष्ट अशी की, समाजाला पुढे नेणारा हा कायदा प्रत्यक्षात येण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे बलिदान व्हावे लागले. आजअखेर या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात दीडशेपेक्षा अधिक केसेस दाखल झाल्या आहेत. कामाच्या पुढच्या टप्प्यावर आली धर्माची कृतिशील व विधायक चिकित्सा. ज्ञानेश्वर-तुकारामांपासून ते महात्मा फुले, आंबेडकरांपर्यंत महाराष्ट्राला धर्मचिकित्सेची एक मोठी परंपरा आहे. प्रबोधनकार ठाकरे व गाडगेबाबांनंतर महाराष्ट्रातील ही परंपरा थोडी क्षीण झाली होती. अंनिसने ती पताका गेल्या पंचवीस वर्षांमध्ये कृतिशीलपणे स्वत:च्या खांद्यावर घेतली. अंनिसच्या कार्यकत्यांना धर्मविरोधी म्हणून बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण जादूटोणाविरोधी कायद्यानंतर महाराष्ट्रात दाखल झालेली पहिली केस ही मुस्लिम बाबाच्या विरोधात होती, यासारख्या असंख्य गोष्टी अंनिसच्या धर्मनिरपेक्ष शोषणविरोधी कामाची ग्वाही देतात.
डॉ. दाभोलकरांचे स्वप्न होते की आपले काम अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झाले असले तरी ते विवेकनिष्ठ समाज निर्मितीपर्यंत जावे. त्यामुळेच जोडीदाराची विवेकी निवड, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहांना साहाय्य, जातपंचायतींना मूठमाती, व्यसनविरोधी युवा निर्धार, संविधान बांधिलकी महोत्सव असे अनेक विवेकाच्या कामाचे आयाम अंनिसच्या चळवळीला देण्याचा डॉ. दाभोलकरांनी सातत्याने प्रयत्न केला. भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत सामान्य नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्व मानणारे शासन या समाजात रुजावे यासाठी केलेले हे विवेककारण हा सध्याच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारे एक साधन व्हावे, ही डॉ. दाभोलकरांची तळमळ होती.

हेदेखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, गेल्या २५ वर्षांमध्ये अंनिसचे जे संघटित काम महाराष्ट्रात उभे राहिले, ते पूर्णपणे समाजाने दिलेल्या पैशांवर उभे राहिले आहे. समाजदेखील यासारख्या प्रवाहाविरुद्ध पोहतानाच्या कामाला मदत करतो, ही नोंद घेणे महत्त्वाचे आहे. अंधाराचे रक्षण व्हावे अशी मानसिकता असलेल्या शक्तींनी सुधारणेचा झेंडा खांद्यावर घेऊन पुढे जाऊ इच्छिणाऱ्या डॉ. दाभोलकरांची हत्या केली. डॉ. दाभोलकरांचे शरीर नष्ट केले तरी त्यांनी या समाजामध्ये रुजवलेले विवेककारणाचे बीज सहजासहजी नष्ट होणार नाही. जरी डॉ. दाभोलकर आज शरीराने आपल्यामध्ये नसले, तरी त्यांनी दिलेला विवेकाचा वसा घेऊन महाराष्ट्र अंनिसचे शेकडो कार्यकर्ते आज महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम निर्भयपणे करत आहेत. अनेक जणांना डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडावे, त्यामागच्या सूत्रधारांना अटक व्हावी यासाठी सातत्याने आवाज उठवणे व अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू होऊन विवेककारणापर्यंत जाणाऱ्या या प्रवासात आपला खारीचा वाटा उचलणे हीच विवेकाचा वसा पुढे नेण्यासाठी आपली जबाबदारी आहे.
हमीद दाभोलकर