आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे ‘फेसबुक’ (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इंटरनेटच्या प्रसारामुळे तरुण पिढी बिघडत जाईल; संस्कृती लयास जाईल; मानवी संबंध दुरावतील; व्यक्ती आत्मकेंद्री होत जाईल, अशी भीती 10-15 वर्षांपूर्वी साधारण मध्यमवर्गामध्ये (ज्यांची मुले सायबर कॅफेमध्ये जात असत) प्रसारमाध्यमांतून वारंवार व्यक्त केली जात असे. ही भीती व्यक्त करणा-यांमागे तंत्रज्ञानाविषयी कमालीचे अज्ञान आणि दुराग्रह तर होताच; पण तंत्रज्ञानावर उद्याचे नवे जग अवलंबून आहे, हे सत्यही या मंडळींना लक्षात येत नव्हते. अगदी शालेय परीक्षांमध्ये निबंधांचे विषय कॉम्प्युटर-शाप की वरदान, इंटरनेटमुळे तरुण पिढी बिघडतेय का, अशा स्वरूपाचे मुलांमध्ये संभ्रम निर्माण करणारे असत. मुद्दा हा की मानवी प्रज्ञेतून निर्माण होणारे तंत्रज्ञान मानवाच्या कल्याणाकरिता असते. त्याला समृद्ध करणारे असते. तंत्रज्ञानामुळेच मानवी जीवन बदलत जाते. तंत्रज्ञान नसते तर मानव अजूनही एकटा राहिला असता. अशा ‘ह्यूमन सिव्हिलायझेशन’च्या प्रक्रियेत मानवी संबंध निर्माण होणे ही फार महत्त्वाची घटना होती. पहिल्यांदा कुटुंबाच्या रूपात राहणारा माणूस टोळी करून राहत होता. नंतर त्याने छोटी राज्ये स्थापन केली.

त्याच्यापुढे त्याने भलीमोठी साम्राज्ये निर्माण केली. हे सगळे करत असताना मानवाचा एकमेकांशी संपर्क येत होता. कधी भाषेमुळे तर कधी व्यापारामुळे; तर कधी साम्राज्याच्या लालसेतून, धर्म-संस्कृतीच्या अभिनिवेशातून. मानवाने युद्ध, रोगराई, नैसर्गिक आपत्ती यांचा सामना करत पुढे विज्ञान-तंत्रज्ञान, साहित्य, संगीतात मोठी प्रगती केली. या प्रगतीला युरोपात रेनेसाँने (15 वे शतक) जसे वळण दिले तसे 20व्या शतकात विज्ञान-तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा गाभाच बदलून टाकला. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात तर इंटरनेटमुळे जग जवळ आले. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत व्यापार हा महत्त्वाचा मानला जायचा, पण इंटरनेटमुळे व्यापाराबरोबर मानवी संबंध महत्त्वपूर्ण ठरले. पण त्या वेळी इंटरनेट हेच आभासी जग असल्याची टीका केली जात असे. या आभासी जगातील मानवी संबंध फारच कमकुवत असतात, असेही म्हटले जात असे. अनोळखी व्यक्तीशी ई-मेल, गप्पांद्वारे बोलणे ही गंमत होती. तो वेगळा अनुभव होता. पण या संबंधांमध्ये उणीव होती ती एकमेकांना जाणण्याची, एकमेकांना ऐकून घेण्याची. ‘फेसबुक’ने ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला.

काल ‘फेसबुक’ने वयाची नऊ वर्षे पूर्ण केली व त्याने दहाव्या वर्षात पदार्पण केले. काही उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ असे सांगतात, मानवी मेंदूमधील सेरेब्रल निओकॉर्टेक्स व मानवी संबंध यांचा जवळचा संबंध असतो. म्हणजे एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 150 व्यक्तींना ओळखू शकते किंवा आपल्या आयुष्यात ती एवढ्या व्यक्तींशी कायमस्वरूपी संपर्क साधून असते. ‘फेसबुक’ने या गृहीतकाला धक्का दिला. उलट या तंत्रज्ञानाने मानवी संबंधांची कक्षा अधिक विस्तारित केली. मानवी मेंदूमधील सेरेब्रल निओकॉर्टेक्सची क्षमता अधिक आहे, असेही सिद्ध केले. एका अर्थी उक्रांतिवादात मानवी मेंदूची रचना बदलत चालली आहे, याचा हा पुरावा आहे. सध्या फेसबुकवर जगाच्या एकूण 7 अब्ज लोकसंख्येपैकी एक अब्ज लोकसंख्या आहे. म्हणजे सुमारे 100 कोटींचा एक भारत आहे. या 100 कोटी फेसबुक युजरकडून अब्जावधी फोटो, पोस्ट, मेसेज यांची देवाणघेवाण अहोरात्र होत असते. सोशल मीडिया साइटमध्ये सर्वात अधिक माहितीची देवाणघेवाण एकट्या फेसबुकवर असते व ही देवाणघेवाण थ्रीजी, फोरजीच्या जमान्यात अजून वेगाने होईल व त्यामध्ये यापेक्षा कित्येक पटींनी भर पडेल.

काही टीकाकार फेसबुक हे आभासी जग आहे असे म्हणतात, पण फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याच्या मते फेसबुक हे वास्तव आहे. या तंत्रज्ञानाचा हेतू मानवाचे सबलीकरण करण्याचा आहे. मानवी व्यवहारात पारदर्शकपणा, मोकळेपणा आणण्याचा प्रयत्न आहे. हे तंत्रज्ञान देश, धर्म, वंश, जात यांच्या पलीकडचे आहे. त्याला कोणत्या सीमारेषा नाहीत. त्याला जगामध्ये असंतोष किंवा अस्थिरता निर्माण करायची नाही, उलट मानवी संवादाचे नवे पूल बांधायचे आहेत. नात्यांमध्ये असलेला दुरावा नष्ट करायचा आहे. नवी नाती जोडायची आहेत. कालौघात संपुष्टात आलेली व विसरून गेलेली नाती पुन्हा जोडायची आहेत. मध्यंतरी ‘विकिलीक्स’चा निर्माता ज्युलियन असांजेच्या प्रकरणामुळे सोशल मीडिया आणि व्यक्तिस्वातंत्र्य असा वाद जगभर निर्माण झाला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य द्यायला हवे व त्याच्या जगण्याच्या आकांक्षांची पूर्ती करायला पाहिजे, असे असांजेचे मत होते. असांजे प्रस्थापित व्यवस्थेला आव्हाने देत होता. त्याच्या डोळ्यापुढे ‘व्यवस्था’ नावाचा अदृश्य शत्रू होता. या शत्रूला नामोहरम करण्याचे काम तो करत होता. झुकरबर्गने मात्र लोकशाही, समता, एकोपा या मूल्यांची कास धरत दबलेल्या, पीडितांचे आवाज जगापुढे आणले. त्यांचे हात बळकट करण्याचे प्रयत्न केले. म्हाता-या कोता-यांना तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास भाग पाडले. तसेच संपर्क क्रांतीचा अदमास घेत मोबाइल कंपन्यांना ‘फेसबुक अ‍ॅप्लिकेशन’ ठेवण्यास भाग पाडले.

जो मध्यमवर्ग 20 वर्षांपूर्वी ड्रॉइंगरूमच्या चर्चेत कॉम्प्युटरला नावे ठेवत होता (कारण त्याला त्या वेळी देशातील हिंदुत्ववादाविषयी आकर्षण वाटत होते) तोच मध्यमवर्ग आज ‘फेसबुक’वर चर्चा करत असतो. मानवी जीवन पालटणा-या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे वा ना करणे, हे राज्यकर्त्यांच्या द्रष्टेपणावर अवलंबून असते. तंत्रज्ञान स्वीकारण्याचे द्रष्टेपण 90च्या दशकात राजीव गांधी यांनी दाखवून दिले होते. त्यांच्या काळात ‘फेसबुक’ नव्हते वा आतासारखा सोशल मीडियाही अस्तित्वात नव्हता, पण माहिती तंत्रज्ञान क्रांतीची पहाट होत आहे याचे भान राजीव गांधींना होते. त्यांच्यामुळे आज मध्यमवर्गाची तंत्रज्ञानाविषयीची मानसिकता बदलताना दिसत आहे. या बदलत्या मानसिकतेत ‘फेसबुक’चाही वाटा आहे.