आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्यासाठी सहकार्य चळवळ उभारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक समुदायाच्या सर्वसाधारण सभेने 2013 हे वर्ष पाण्यासाठी सहकार्य या संकल्पनेसाठी साजरे करण्यात येईल, असा ठराव केला. या वर्षाची सुरुवात 22 मार्च 2013 रोजी आंतरराष्ट्रीय जल दिनापासून झाली...

पाणी हा सर्वात महत्त्वाचा, मूलभूत घटक आहे. आज जगापुढे असलेल्या प्रमुख आव्हानांमागे पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. उत्तम जलव्यवस्थापनामुळे आपण दुष्काळ, गरिबी, पूर आदी संकटांवर मात करू शकतो. जगातील बहुतेक नद्यांची खोरी गावे, शहरे, राज्य, राष्ट्र यामध्ये विभागलेली आहेत. म्हणूनच जगाच्या शांततेकरिता पाण्याच्या सहकार्याची गरज आहे. युनेस्कोचे सहायक संचालक हॅन्स ओव्हील म्हणतात, आंतरराष्ट्रीय 2013 चा उद्देश आहे पाण्यासाठी सहकार्याचा समान अर्थ काढणे व त्याचे विश्लेषण करून त्यासाठी पुढाकार घेणे. पाण्यासाठी सहकार्य म्हणजे पाण्याचे शांततेच्या मार्गाने केलेले व्यवस्थापन व उपयोग समान उद्दिष्टांसाठी आणि परस्पर फायद्यासाठी कृती करणे म्हणजे पाण्यासाठी सहकार्य. गेल्या काही दशकांमध्ये पाणी हा विकासप्रक्रियेतील कळीचा मुद्दा ठरत आहे. युद्ध, वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, हवामानातील बदल, पाण्याचा अनिर्बंध वापर, पाण्याचे प्रदूषीकरण इ. कारणांमुळे जगातील मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळणे अवघड होत आहे. 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या 9 दशलक्ष होणार असून 70 टक्के लोक शहरी भागात राहणारे असतील. ताज्या पाण्यासाठी मागणी-पुरवठ्यामधील आज असणारी 20 टक्के तफावत 40 टक्के होणार आहे. अशा वेळेला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित सहकार्याने काम करणे अपरिहार्य आहे. म्हणूनच पाण्यासाठी सहकार्य ही संकल्पना जगभरातून पुढे येत आहे.
पाण्यासाठी सहकार्य म्हणजे - 1) पाण्याचे फायदे वाटून घेणे. 2) पाण्याच्या दृष्टीने सुरक्षित भविष्य निश्चित करण्याचा सुयोग्य व एकमेव मार्ग. 3) स्थानिक राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय सर्वच पातळ्यांवर अमलात आणू शकण्याची संकल्पना. 4) सर्व तज्ज्ञ एकत्र येऊन व आपापले कौशल्य वापरून पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करणे सहकार्यामुळे शक्य. 5) जल सहकार्य हे शांततेचे साधन आहे, ज्यामुळे सर्व मानव समूह एकत्र येऊ शकतो.
जल व्यवस्थापनामध्ये सर्व वापरदारांमध्ये सहकार्याची भावना रुजवणे, शांतता निर्माण करणे व सुरक्षित व शाश्वत आर्थिक विकास ही आज आंतरराष्ट्रीय समुदायासमोरील सर्वात मोठी आव्हाने आहेत. यादृष्टीने ‘पाण्यासाठी सहकार्य’ या संकल्पनेचे खालील विविध पैलू आहेत -
1. पाणी सहकार्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन - जलव्यवस्थापनाचे प्रश्न हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिले गेले पाहिजेत. सर्व संबंधित, जे सरकारमध्ये आहेत, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करत आहेत, जे खासगी संस्थांमध्ये काम करत आहेत, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, सर्वसाधारण लोक या सर्वांना चर्चेमध्ये सहभागी करून घेणे या संकल्पनेत अपेक्षित आहेत.
2. पाणी सहकार्यासाठी नवीन दृष्टिकोन - पाण्यासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे हे जगभरातील सर्वात मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर प्रगतिशील विचार आणि स्थानिक, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पाणी व्यवस्थापनाचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन दृष्टिकोन अंगीकारणे आवश्यक आहे.
3. पाणी सहकार्याचे फायदे - इतिहासाने हे दाखवून दिले आहे की, ताजे पाणी ही मानवी समुदायांमधील शांतता राखण्यासाठीची सर्वात मोठी प्रेरणा आहे. आज जरी असे सांगितले जाते की, पुढचे युद्ध पाण्यासाठी होणार आहे तरीही इतिहास असे सांगतो की, पाणी मानवी समुदायांना एकत्र आणते.
4. शांतता आणि सुरक्षिततेसाठी सहकार्य - सुदैवाने आपल्या या पृथ्वीवर सर्वांना पुरेल एवढे पाणी आहे, पण पाण्याची सुरक्षितता टिकवण्यासाठी जलव्यवस्थापनाच्या संकल्पनेचा मुळापासून परत विचार होणे आवश्यक आहे. शांतता, सुरक्षितता आणि राष्ट्रांचे स्थैर्य यासाठी पाण्याकरिता सहकार्य करणे आवश्यक आहे.
5. शाश्वत विकासासाठी सहकार्य - शाश्वत विकासाची किल्ली पाणी आहे. पाणी सामाजिक, आर्थिक व पर्यावरणाच्या दृष्टीने मौल्यवान आहे. म्हणूनच या सर्व दृष्टिकोनातून पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
गेल्या 50 वर्षांत पाण्यावरून झालेल्या संघर्षाच्या 50 घटना नोंदवल्या गेल्या, पण त्याचबरोबर 200 पाण्याचे करार यशस्वीपणे केले गेले. यातील सर्वात महत्त्वाचा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला सिंधू नदीचे खोरे करार. या दोन देशांतील तणाव व युद्ध यामध्ये हा करार दोन्ही देशांकडून पाळला गेला. या करारांवरून असे दिसून येते की, अगदी कट्टर शत्रूसुद्धा पाण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवत आहेत. पाण्यावरून तंटा करून हिंसेचा मार्ग अवलंबण्यापेक्षा सहकार्याने प्रश्न सोडवणे अधिक शहाणपणाचे व दीर्घकालीन उत्तर आहे. जेव्हा सहकार्य संपते तेव्हा सर्वच देशांची हानी होते आणि विशेषत: गरीब व दुबळ्या देशांना अधिक हानी पोहोचते. दुष्काळ, पूर इ. परिस्थितींमध्ये हिंसेपेक्षा सहकार्य अधिक महत्त्वाचे ठरते. यानिमित्तानेच महाराष्ट्रामध्येही अशी सहकार्याची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.