आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेका साहाय्य करू..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योग अथवा व्यवसाय याचा विचार फारच थोडे लोक करतात. असाध्य ध्येय साध्य करण्यासाठी कुठून तरी प्रेरणा जागृत व्हावी लागते. अमराठी मुले शाळा-कॉलेजपासूनच आपला अभ्यास सांभाळून फावल्या वेळेत तसेच सुटीत शिकवण्या, दुकान- हॉटेलमध्ये विक्रेता, मार्केटिंग, डॉक्टर, वकील, या व्यावसायिकांकडे सहायक म्हणून उपयुक्त असे व्यावसायिक अनुभव मिळवतात व शिवाय आर्थिक कमाईही होते. यामुळे पैशाचे महत्त्व त्या वयातच कळू लागते. उशिरा का होईना, मराठी मुलांनाही या ‘कमवा आणि शिका’ चे महत्त्व समजले आहे. अधिकाधिक मराठी विद्यार्थी-विद्यार्थिनी त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे उत्साहजनक चित्र प्रत्यक्षात दिसू लागले आहे, पण हे प्रयत्न आणखी व्हावेत ही काळाची गरज आहे. उद्योग-व्यवसायाची प्रेरणा सकारात्मक अथवा नकारात्मक आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळेही निर्माण होऊ शकते. बाह्यात्मक म्हणजे सामाजिक मंचांवरून अथवा अंतर्गत म्हणजे स्वयंप्रेरणेतून उद्योग-व्यवसायात झेप घेण्याची आकांक्षा बºयाच जणांत निर्माण होते. आर्थिकदृष्ट्या सुजाण होण्याच्या या प्रसववेदना मराठीजनांनी सहन करायलाच हव्यात.


मराठी उद्योजकांनी ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ या सूत्राने एकत्र यायला हवे. आपल्या उद्योग-व्यवसायातील अडचणींवर अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन घ्यावे, एकमेकांची उत्पादने तसेच व्यावसायिक सेवा घेऊन मराठी तरुणाने व्यावसायिक प्रगती करावी. ‘तमारे माटे एटला, मारे माटे केटला?’ हा प्रश्न मराठी तरुणाने विचारायला आता शिकायला हवे. स्वत: श्रीमंत होऊन दुसºयालाही श्रीमंत होण्याचा मार्ग आपण एकमेकांना दाखवायला हवा. संयम, योग्य निर्णय, बाजारपेठेची माहिती, आर्थिक उपलब्धीचे पर्याय आणि महत्त्वाचे म्हणजे, व्यवसाय करण्याची आत्मेच्छा असेल तरी कुणीही, कोणालाही लखपती बनण्यापासून रोखू शकत नाही. मराठी उद्योजकांपुढे अनेक आव्हाने आहेत. बाजारपेठेत जोमाने उभे राहणे, स्वत:तील उद्यमशीलता सतत जागती ठेवणे व त्यासाठी काय काय करावे लागेल याचे आर्थिक विश्लेषण करणे, या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. कोणत्याही उद्योगाचा आर्थिक ताळेबंद महत्त्वाचा नसतो तर त्यासाठी लागते ते कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग करून केलेली कोणतीही गोष्ट ही यशस्वीच होते. हा त्या उद्योगाचा पाया असतो. व्यवसायात उद्योजकांनी एकमेकांची मदत घेतल्यास आपल्या उद्योगासाठी लागणाºया वस्तू या कुठे व कोणाकडे मिळू शकतील, त्याचे भाव काय असतील, समोरची व्यक्ती त्या वस्तू किती प्रमाणात व किती वेळेत देऊ शकेल, आपणही आपले उत्पादन किती जणांना किती प्रमाणात किती वेळेत देऊ शकू, याची डोळस कल्पना चटकन येऊ शकते. बचत मग ती पैशाची असो, मनुष्यबळाची असो की बाजार शोधण्यातील असो, ती खूप महत्त्वाची असते. यालाच म्हणतात व्यापारी वृत्ती. व्यावहारिकता.


मराठी जनांत धनाबाबत संकुचित वृत्ती पाहायला मिळते. हाती असलेल्या धनाचा वापर उद्योग-व्यवसायात करायला अजून मराठी जन कचरतात. हाती असलेल्या धनाचा लाभ घ्यायला शिकायला पाहिजे. धन कुजवून ते खराब होते. ते वाढत नाही तर पडून राहते. केवळ कुबेराचे भांडार नको तर त्या भांडाराभोवती सरस्वतीचाही वास हवा. मराठी माणसांनी व्यवसायात मोठ्या प्रमाणात आले पाहिजे. त्यात यशस्वी झाले पाहिजे, भरपूर पैसे कमावले पाहिजे. हातात आर्थिक ताकद आल्याशिवाय आपल्या समाजाचे काहीही भले होणार नाही, ही बाब आपण आता तरी लक्षात घेतली पाहिजे. सहज, सुलभपणे वापरता येण्याच्या पद्धतीमुळे फेसबुक, ट्विटर, लिंकडीन यांसारख्या नव माध्यमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. ज्याचा लाभ व्यावसायिक संवाद साधण्यासाठी व्यावसायिकांनी घेणे, प्रयत्न करणे आजच्या काळाची नितांत गरज आहे. 21 व्या शतकात संवाद साधनांमध्ये झालेली क्रांती वेळ वाचवणारी आहे. ज्यामुळे नेटवर्किंग सहज सोपे झाले आहे. महाराष्‍ट्रातही व्यावसायिक पिढीचा जन्म होऊन महाराष्‍ट्रीय बिझनेसमन लॉबी देशात आणि विदेशात नावारूपास यावी, यासाठी आपण सर्वांना प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्‍ट्रात जन्म घेणारा, थोडीफार मराठी भाषा जाणणारा, महाराष्‍ट्राच्या प्रगतीसाठी झटणारा म्हणजे महाराष्‍ट्रीय होय. ज्यांच्या कल्पना-विचार सदैव तरुण असतात तो चिरकाल तरुण असतो, हा विचार मंत्र ध्यानात घेऊन माझ्या समकालीन उद्योजकांनी नव्या जोमाने व्यवसायात यायला हवे. तरुणांशी संवाद साधण्यास मला नेहमीच आवडते. आजचा तरुण हा हुशार आणि नवकल्पनांनी झपाटलेला आहे. धडपड्या, हरहुन्नरी व सळसळत्या रक्ताच्या नवनिर्माण घडवू पाहणाºया महाराष्‍ट्रीय तरुण उद्योजकाने व्यवसायात येण्यासाठी आज चांगली बाजार स्थिती आहे. सॅटर्डे क्लबच्या झेंड्याखाली सर्व जगातील महत्त्वाकांक्षेने श्रीमंत झालेले मराठी उद्योजक, महाराष्‍ट्रीय समाजाच्या औद्योगिक व व्यावसायिक प्रगतीकरिता आपल्या संपत्तीचा काही भाग देणारे व्यावसायिक-उद्योजक एकत्र येतील आणि ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ हा मंत्र व्यवहारात आणतील, अशी मला खात्री आहे.