आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समरसतेची नववर्ष स्वागत यात्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू समाज हा तसा उत्सवप्रिय आहे. विविध कारणांनी तो एकत्रित होत असतो; परंतु तो स्वत:च्या जातीचे, पंथाचे आलेख स्वतंत्र ठेवूनच. हा सर्व अभिनिवेश विसरून केवळ हिंदू म्हणून समाजाने एकत्र यावे यासाठी काय उपक्रम समाजाला देता येऊ शकेल या विचारातून नववर्ष स्वागत यात्रेची कल्पना डोंबिवलीतील काही कार्यकर्त्यांच्या मनात आली. ती पूर्ण करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला तर हा उपक्रम यशस्वी होऊ शकेल, असाही विचार आला. या चर्चेचे फलित म्हणून हिंदू नववर्ष म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याचे स्वागत सर्व समाजाने मोठ्या प्रमाणात करावे यासाठी प्रयत्न चालू झाले. गुढीपाडव्याला विविध आयाम आहेत. त्यामध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, पारंपरिक असे अनेक मुद्दे आहेत. मूलत: वसंत ऋतूची सुरुवात, सर्वत्र पालवी फुटलेली असते, थंडी जाऊन उन्हाला सुरुवात झालेली असते. निसर्ग नवीन रूप धारण करीत असतो, याच दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येस परतले होते इ. अनेक संदर्भ या दिवसासाठी आहेत. तेव्हा या दिवसाचे स्वागत मोठ्या प्रमाणावर करावे ही मूळ कल्पना. त्याचप्रमाणे 31 डिसेंबरच्या रात्री घडणार्‍या अनिष्ट घटनांच्या एक जानेवारीला वर्तमानपत्रात छापून येणार्‍या उद्वेगजनक बातम्यांना सकारात्मक उत्तर म्हणूनही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा. दारूचा महापूर, महिलांवर बलात्कार, हॉटेलमध्ये रात्रभर गाणी लावून घातला जाणारा धुडगूस, अमली पदार्थांच्या आहारी जाणारा तरुणवर्ग यातून बाहेर पडण्यासाठी दिलेले उत्तर म्हणजे हिंदू स्वागत यात्रा. या उपक्रमाचे नेतृत्व कोणी करावे तर त्या त्या गावातील अशा संस्था की ज्यांचा त्या शहरावर प्रभाव आहे व ज्याला काही नैतिक अधिष्ठान आहे. त्यामुळेच गणेश मंदिर संस्थानने बरोब्बर 15 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये नववर्ष स्वागत यात्रेची पहिली गुढी उभारली. डोंबिवलीच्या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करून हळूहळू विविध शहरांमध्ये या यात्रांचा विस्तार होऊ लागला. या उपक्रमाचे फलित म्हणजे महाराष्ट्रात जवळपास 150 पेक्षा जास्त शहरांमध्ये, इतकेच नाही, तर भारतात आणि परदेशातही नववर्ष स्वागत यात्रा सुरू झाल्या आहेत. गिरगावमध्ये ढोल पथक आणि ध्वज पथक अगोदरच सुरू झाले आहे. पुढील वर्षी दापोली, कुडाळमध्ये नववर्ष स्वागत यात्रा सुरू होत आहे. या वर्षी डोंबिवली प्रदूषणविरहित आकाशकंदील सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तो बघून बदलापूरमधील शोभायात्रांनीदेखील त्याच पावलावर पाऊल टाकले आहे. आवाजविरहित फटाक्यांची आतषबाजी हा डोंबिवलीचे खास वैशिष्ट्य ते आता पुढील वर्षापासून अन्य शहरांमध्ये सुरू होत आहे.
स्वागत यात्रांच्या निमित्ताने जाती, पंथ आणि धर्म व्यवस्था सोडून सामाजिक एकीकरणाच्या दृष्टीने काही विशेष उपक्रम डोंबिवलीत झाल्यानंतर त्याचा आता राज्याच्या अन्य भागात प्रसार होत आहे. विशेष म्हणजे ही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा असली तरी अन्य धर्मीयदेखील यामध्ये सहभागी होऊन आपल्या चित्ररथांनी यात्रेची शोभा वाढवत आहेत. मुख्य म्हणजे या स्वागत यात्रा ज्यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून असतात त्या नगरपालिकांच्या सफाई कामगारांची दखल कोणीच घेत नसते. आपल्या सफाई कामाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर यात्रेत सहभागी होणार्‍या या कामगारांच्या कामाची नोंद या निमित्ताने घेण्याची तयारीदेखील अन्य शहरांमध्ये होऊ लागली आहे.

सामाजिक अभिसरणाच्या दिशेने वाटचाल करीत असताना गणेश मंदिर संस्थानने राबवलेल्या आणखी एका संकल्पनेचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे रुखी समाज, नाभिक समाज, आग्री समाज, माहेश्वरी समाज, लेवा पाटील अशा विविध ज्ञाती संस्थांच्या दांपत्यांच्या हस्ते गणेश पूजन व अभिषेक करून सामाजिक समरसतेचा पायंडा पाडला. त्याचे अनुकरणही महाराष्ट्रातल्या अन्य शहरांमध्ये होऊ घातले आहे. या स्वागत यात्रांमधून एक मोठा विचार पुढे येत आहे, तो म्हणजे आपल्या गावाचा किंवा शहराचा विकास. केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता नागरिकांच्या सहभागातून तो करण्याचा विचार मोठ्या प्रमाणावर रूढ होत चालला आहे. वृक्ष संवर्धन, पाणी- वीज बचत, रक्तदान यांसारख्या समाजप्रबोधनपर घोषणा देतानाच त्याची अंमलबजावणी करण्याचे कामदेखील नववर्ष स्वागत यात्रेतील संस्था करीत असतात. गणेश मंदिर संस्थानने सौर ऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम गेल्या वर्षी राबवले. या सामाजिक उपक्रमांना मिळालेले यश लक्षात घेऊन आता अन्य शहरांमध्येदेखील अशाच प्रकारचे उपक्रम हाती घेण्याचा विचार सुरू असून कदाचित पुढील वर्षीच्या यात्रांमध्ये त्याला मूर्त स्वरूप मिळालेले दिसून येईल.

सामाजिक अभिसरणाबरोबरच सामाजिक जाण हेदेखील तमाम स्वागत यात्रांचे वैशिष्ट्य आहे. त्याचे उदहारण म्हणजे यंदाचा गुढीपाडवा दुष्काळाच्या काळ्या छायेत साजरा होत आहे. नवीन वर्षाचे स्वागत करून आपले तोंड गोड करताना राज्यातील आपल्या दुष्काळग्रस्तांचा घसा पाण्याअभावी कोरडा पडल्याची जाणीवदेखील या स्वागत यात्रांमध्ये सहभागी होणार्‍या संस्थांना आहे. त्याची परिणती म्हणून राज्यातल्या जवळपास सर्वच शोभायात्रांमधून दुष्काळग्रस्तांसाठी निधी संकलन व त्याचबरोबर काही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यंदा दुष्काळ पडला आहे म्हणूनच केवळ हे सामाजिक भान आहे, असे नाही तर गिरगावमधील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा भागातील कुपोषित आदिवासी मुलांसाठी सकस आहार योजना राबवत आहे. त्याचप्रमाणे रद्दी गोळा करून तो निधी आदिवासी भागातील कार्यावर खर्च करीत आहे. विशेष म्हणजे हे उपक्रम गुढीपाडव्यापुरतेच मर्यादित नाहीत, तर अनेक उपक्रम वर्षभर चालणारे आहेत.
नववर्ष स्वागत यात्रा ही एक केवळ सांस्कृतिक चळवळीपुरती मर्यादित राहिलेली नसून सामाजिक समरसता आणि आजच्या तरुण पिढीसमोर चांगला आदर्शांची गुढी उभारणारा हा पाडवा आहे हेच यानिमित्ताने सांगता येईल.